Karjat : राशीनकरांना मोठा दिलासा १३ पैकी ११ जणांचा अहवाल निगेटीव्ह तर मयत आजीमुळे नातीचा अहवाल पॉझिटिव्ह, एक अहवाल राखीव

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री दि २२

कर्जत : राशीन ता कर्जत येथे मुंबई वाशीहून सुनेच्या घरी आलेल्या महिलेचा बुधवारी रात्री कोरोनाने मृत्यू झाला होता. त्यानंतर तिच्या संपर्कात आलेल्या १३ जणांना कोरोना चाचणी स्वॅब घेण्यासाठी शुक्रवारी नगरला नेण्यात आले होते. शुक्रवारी रात्री उशिरा त्यांचे अहवाल प्राप्त झाले असून सदर महिलेच्या सहा वर्षांची नातीचा अहवाल पॉझिटिव्ह आला असून मुलाचा अहवाल राखीव ठेवण्यात आला आहे. उर्वरित अकरा जणांचे अहवाल निगेटीव्ह आल्याने कर्जत तालुक्यातील लोकांनी सुटकेचा निश्वास टाकला. मात्र, नागरिकांनी विनाकारण बाहेर पडू नये, असे आवाहन स्थानिक प्रशासनाने केले आहे.

बुधवारी रात्री सुनेकडे आलेल्या मुंबई (वाशी) येथील क्वारंटाईन महिलेला अचानक त्रास झाल्याने पुढील उपचारासाठी नगरला नेत असताना तिचा वाटेतच मृत्यू झाला. सदर महिलेला कोरोना सदृश्य लक्षणे आढळल्याने स्वॅब घेण्यात आला होता. तो गुरुवारी रात्री पॉझिटिव्ह आल्याने कोरोनामुक्त कर्जत तालुक्यात कोरोनाची एन्ट्री धडकली होती. मयत क्वॉरंटाईन महिलेचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने तिच्या संपर्कात आलेल्या १३ व्यक्तींना कोरोना चाचणीसाठी शुक्रवारी नगरला हलविण्यात आले होते. त्याचा अहवाल शुक्रवारी उशिरा जिल्हा रुग्णालयास प्राप्त झाला. सदर १३ जणांच्या कोरोना अहवालामध्ये मयत महिलेच्या सहा वर्षाच्या नातीचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह निघाला तर तिच्या मुलाचा अहवाल राखीव ठेवण्यात आला असून त्याचा स्वॅब पुन्हा घेण्यात येईल, असे समजते.

उर्वरित ११ जणांचे अहवाल निगेटीव्ह आल्याने कर्जतकरांनी सुटकेचा निश्वास सोडला. राशीन येथील संपर्कात असणाऱ्या सर्वच स्थानिक व्यक्तीचा अहवाल निगेटीव्ह निघाल्याने राशीनकरांना मोठा दिलासा मिळाला. मात्र, सध्या चौथ्या लॉकडाऊनमध्ये अनेक नियम शिथील करीत व्यवसाय आणि दुकाने सुरू करण्यास मुभा दिल्याने अनेक ठिकाणी सोशल डिस्टन्सचे नियम पायदळी तुडवत सर्वसामान्य नागरिक बाहेर पडताना दिसत आहे. वास्तविक पाहता कोरोनाची लढाई अजून सुरूच आहे. त्यामुळे नागरिकांनी विनाकारण बाहेर न पडता स्वतासह आपल्या परिवाराची, परिसर आणि गावाची काळजी करावी, असे आवाहन प्रांताधिकारी अर्चना नष्टे यांनी केले आहे.

नागरिकांनी आवश्यक कामासाठी बाहेर पडले असता तोंडाला कायमस्वरूपी मास्क वापरावा. शक्यतो अनावश्यक गर्दी टाळावी. सॅनिटायजर वापरत हात धुण्याची सवय कायम बाळगावी. तसेच खबरदारीचा उपाय म्हणून परिसरात बाहेरील व्यक्ती आल्यास तिची माहिती स्थानिक गावात गठीत केलेल्या कोरोना बचाव समितीस द्यावी जेणेकरून पुढील सुरक्षिततेसाठी महत्वाची ठरू शकते. यासह स्थानिक प्रशासनास नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन पोलीस उपअधीक्षक संजय सातव यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here