Beed : मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल; बीडच्या कापूस खरेदी केंद्रावर नियुक्त केले ग्रेडर

माजीमंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्या प्रयत्नाला यश
बीड – तालुक्यातील कापूस उत्पादक शेतकर्‍यांचा कापूस खरेदी करण्यास सुरूवात करावी व जिनिंग चालू करून ग्रेडरच्या नियुक्त्या करण्यात याव्यात, असे निवेदन माजीमंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना मेलवर पाठवले होते. याची दखल घेऊन बीड तालुक्यातील जिनिंगवर ग्रेडरच्या नियुक्त्या करून कापूस खरेदी सुरू होत आहे मागणीची दखल घेतल्याबद्दल मुख्यमंत्री व जिल्हाधिकारी यांचे दिनकर कदम गणपत डोईफोडे, अरुण डाके यांनी आभार मानले आहेत.
माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी काही दिवसांपूर्वीच बीड तालुक्यातील व जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या कापूस खरेदीबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना तातडीने एक निवेदन मेलवर पाठवले. तसेच माजीमंत्री क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली बाजार समितीचे सभापती दिनकर कदम, उपसभापती गणपत डोईफोडे, माजी सभापती अरूण डाके व संचालकांनी जिल्हाधिकारी यांना मंगळवार दि.19 रोजी निवेदन दिले होते. यामध्ये बाजार समितीत नोंदणी झालेल्या सर्व कापसाच्या वाहनांचे मोजमाप सुरू करावे.
बीड तालुक्यातील 8 कापूस जिनिंगवर शासकिय कापूस खरेदीसाठी मान्यता देऊन सी.सी.आय.च्या सेंटरवरून 80 वाहनांची मापे सुरू करावी. प्रत्येक जिनिंगवर कमीत कमी 50 पासून 80 कापसाची वाहने मापासाठी घ्यावीत. कापूस जिनिंगवर चालू असलेल्या ग्रेडरच्या मनमानी कारभाराची दखल घ्यावी. शेतकर्‍यांना होणारा त्रास व खर्च या संबंधी तात्काळ कार्यवाही करावी. जिनिंगवर दररोज, सुट्टी न घेता कापसाचे माप करून पावसाळयापूर्वी सर्व शेतकर्‍यांचा कापूस खरेदी करावा तसेच कुठलेही कारण दाखवून शेतकर्‍यांच्या कापसाला नकार देऊ नये. शेतकर्‍यांच्या शेतात पिकलेला व उच्च प्रतिचा कापूस शासनाकडून घेतला जातो. परंतू नैसर्गिक कारणामुळे खराब, डागलेला व कवडीपासून वेगळा असलेला कापूस कमी दराने का होईना तो खरेदी करण्यात यावा.
खाजगी खरेदीदाराकडून शेतकर्‍यांची होणारी लूट थांबवावी, अशा मागण्या निवेदनात करण्यात आल्या होत्या. दोन दिवसांत कापसाची मापे न झाल्यास आपण अमरण उपोषणास बसू, असा इशारा निवेदनात देण्यात आला होता. मात्र, जिल्हाधिकारी राहूल रेखावार यांनी तात्काळ दखल घेऊन दोन दिवसांत 20 ग्रेडरच्या माध्यमातून शेतकर्‍यांचा कापूस खरेदी सुरू केली जाईल, असे आश्‍वासन दिले होते. तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही दखल घेऊन ग्रेडरच्या नियुक्त्या करून कापूस खरेदी सुरू करावी, असे आदेश दिले. त्यामुळे मुख्यमंत्री व जिल्हाधिकारी यांचे दिनकर कदम गणपत डोईफोडे व अरुण डाके यांनी आभार मानले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here