प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री

नंदूरबार : कोरोनामुळे गुजरातहून स्थलांतर केलेल्या 40 हजार मजुरांना मनरेगांतर्गत काम देण्यात आले आहे. स्थलांतरणानंतर त्यांच्यासमोर पोटापाण्याचा प्रश्न आ वासून उभा होता. परंतू मनरेगांतर्गत गाळ काढण्याचे काम मिळाल्याने त्यांच्या रोजगाराचा प्रश्न सुटला आहे. त्यामुळे मजुरांमधून समाधान व्यक्त केले जात आहे.
नंदुरबार जिल्ह्यात जॉब कार्ड धारकाची संख्या 3 लाख 6 हजार 539 एवढी असून 1 लाख 46 हजार 225 मजूर कामात कार्यरत आहेत. नंदुरबार जिल्ह्यात एकूण 597 ग्रामपंचायत असून त्यातील 500 पेक्षा जास्त ग्रामपंचायत क्षेत्रातील मजुरांना मनरेगा योजना अंतर्गत काम मिळाले आहे. या योजनेतील काम दोन महिन्यांपर्यंत काम चालू राहिल अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भारूड यांनी दिली. लघु व मध्यम प्रकल्पातील गाळ काढण्याचे काम त्यांना मिळाले आहे. यामुळे भूजल पातळी व पाणीसाठाही वाढणार आहे. तसेच हा गाळ शेतात टाकल्यामुळे शेतजमिनीही सुपीक होणार आहे.
दरम्यान गावातच रोजगार उपलब्ध झाल्याने स्थलांतरीत मजुरांमधील असंतोष कमी झाला आहे. पावसाळ्याच्या तोंडावर मजुरांना आर्थिक आवक होत असल्यामुळे शेतीकामासाठी निश्चितच मोलाची मदत होणार आहे. या मजुरांना 283 रुपये मजुरी दिली जात असून ती आठवड्याला त्यांच्या बँक खात्यात जमा होते.