Shrirampur: श्रीरामपुरात गोळी झाडून तरुणाची हत्या

3

जागेच्या वादातून हत्या झाल्याची चर्चा

प्रतिनिधी । राष्ट्र सह्याद्री

श्रीरामपूर ः तालुक्यातील निपाणी वाडगाव परिसरातील रेल्वे चौकी जवळ गावठी कट्ट्यातून गोळी झाडून तरुणाची हत्या करण्यात आली. गणेश गवळीराम साळवे (वय 28, रा. जोशी वस्ती, निपाणीवाडगाव) असे या घटनेत मृत झालेल्या तरुणाचे नाव आहे. जागेच्या वादातून ही हत्या झाल्याचे बोलले जात आहे. 
गणेशच्या कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, आज रात्री आठ वाजण्याच्या सुमरास ही हत्या झाली. गणेशला उपचारासाठी साखर कामगार रुग्णालयात आणले असता तो मृत झाल्याचे स्पष्ट झाले. 
पोलिसांच्या माहितीनुसार, अशोकनागर फाट्याजवळील लोटीवस्ती परिसरातील जागेवरून वायकर व साळवे यांच्यात वाद होता. या कारणावरून त्यांच्यात आज सायंकाळी सात ते साडेसात वाजेच्या सुमारास पुन्हा वाद झाले. राजू गांगुर्डे, डॅडी वायकर, राजू वायकर, शरद वायकर यांच्यासह दहा ते बारा जण तलवार, गावठी कट्ट्यासह साळवे यांच्या अंगावर धावून गेले. त्यावेळी गावठी कट्ट्यातून गोळीबार करण्यात आला. साळवे यांच्या छातीत गोळी घुसल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.
तेथील काही तरुणांनी त्याला तातडीने साखर कामगार रुग्णालयात आणले. परंतु उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डाॅक्टरांनी सांगितले. यावेळी रुग्णालयात मोठी गर्दी जमली होती. पोलिसांचा फौजफाटा बंदोबस्तासाठी तेथे तैनात करण्यात आला होता. रात्री उशीरापर्यंत याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. 

3 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here