Newasa : Corona : स्थानिक प्रशासनाच्या गलथानपणाचा फटका ; तुटलेली साखळी परत जुळण्याची भीती वाढली

0
प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री 
नेवासा – तालुका प्रशासनाच्या अथक परिश्रमानंतर नेवासा तालुका कोरोनामुक्त झाल्याचा आनंद अल्पायुषी ठरला असून तालुक्यातील नेवासा बुद्रुक स्थानिक प्रशासनाच्या गलथान व बेजबाबदार कारभारामुळे ही तुटलेली साखळी परत जुळून सक्रिय होण्याच्या भीतीने तालुकावासीयांसह प्रशासनाच्या तोंडाचे पाणी पळाले आहे. 
याबाबत समजलेली माहिती अशी की, उल्हासनगर येथून एक साठ वर्षीय महिला तिच्या मनोरुग्ण मुलासह रिक्षाने नेवासा बुद्रुक येथे आलेली आहे. ही महिला संवेदनशील भागातून आलेली असल्याने तिला नेवासा बुद्रुक ग्रामपंचायत तसेच कोरोना दक्षता कमिटी व आरोग्य विभागाने विलगिकरण कक्षात ठेवले होते. मात्र याकाळात तिचा वेडसर मुलगा विलगिकरण कक्षात नेमणुकीस असलेल्या स्वयंसेवकांना धक्काबुक्की करून ‘शाळा सुटली’ म्हणत गावात जात होता, अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे. नेवासा बुद्रुक ग्रामपंचायत प्रशासनाने याबाबत आरोग्य व पोलीस विभागाला कळवून या मुलाची व्यवस्था करण्याची विनंती कागदावरच राहिली. स्थानिक प्रशासनाच्या या बेजबाबदार तसेच गलथानपणाचा केवळ या गावालाच नव्हे तर तालुक्याला धोका निर्माण झाल्याचे पुढे आले असून तालुका प्रशासनाचे कोरोना मुक्तीसाठीचे अहोरात्र दिलेले योगदान पाण्यात गेल्याची चीड व्यक्त होऊ लागली आहे.
या महिलेला त्रास जाणवू लागल्याने तिने गावातील शासकीय आरोग्य केंद्रात उपचारासाठी धाव घेतली. मात्र या महिलेची लक्षणे संशयास्पद वाटल्याने तेथील आरोग्य अधिकाऱ्यांनी तिला नेवासा फाट्यावरील ग्रामीण रुग्णालयात जाण्याचा सल्ला दिला. प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी या महिलेस ग्रामीण रुग्णालयात जाण्यासाठी ‘108’ रुग्णवाहिका उपलब्ध करून दिली. या परिसरातील फारशी माहिती नसल्याने या महिलेने गावातील काही ग्रामस्थ महिलांना सोबत घेऊन ग्रामीण रुग्णालय गाठले. ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी या महिलेची तपासणी केली असता तिच्यात ‘कोविड – 19’ या आजाराची संपूर्ण लक्षणे आढळून आली आहेत.
दरम्यान, अथक परिश्रमानंतर नेवासा कोरोनामुक्त झाल्याच्या खुशीत तालुका प्रशासनाबरोबरच नागरिक असताना नेवासा बुद्रुकमध्ये कोरोना बाधित महिला आढळल्याने तुटलेली ही साखळी परत सक्रिय होण्याच्या आशंकेने तालुका प्रशासनाची झोप उडाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here