Karjat : सिद्धटेकला आढळला कोरोना रुग्ण, तालुक्यातील कोरोनाग्रस्त रुग्णाची संख्या तीन, तिन्ही रुग्ण मुंबई येथील

0

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री दि २४

कर्जत : सिद्धटेक ता. कर्जत येथे तुर्भे (मुंबई) येथून आलेल्या ६० वर्षीय महिलेचा रविवारी कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याने कर्जत तालुक्यातील कोरोनाग्रस्त रुग्णाची एकूण संख्या तीन झाली असून यापैकी एक रुग्ण मयत असल्याची माहिती प्रांताधिकारी अर्चना नष्टे यांनी दिली. राशीन पाठोपाठ सिद्धटेक येथे पण कोरोना रुग्ण आढळल्याने कर्जत तालुक्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मात्र, नागरिकांनी घाबरून जाता कामा नये, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
मुळची तुर्भे मुंबई येथील आलेल्या ६० वर्षीय महिलेला सिद्धटेक ता. कर्जत येथे क्वारंटाईन करण्यात आले होते. मात्र शनिवारी तिला त्रास जाणवत असल्याने तसेच कोरोना सदृश्य लक्षणे जाणवत असल्याने तिचा स्वॅब घेण्यात आला होता. रविवारी सदर महिलेचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने कर्जत तालुक्यातील कोरोनाग्रस्त रुग्णाची संख्या तीन झाली आहे. यापैकी राशीन येथे आपल्या सुनेकडे आलेल्या वाशी मुंबई येथील महिलेचा बुधवारी मृत्यू झाला आहे. तर तिच्या सहा वर्षाच्या नातीचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह निघल्याने तिच्यावर नगर येथे उपचार सुरू आहे.
त्यामुळे मागील सव्वादोन महिन्यांपासून कोरोनामुक्त असणाऱ्या कर्जत तालुक्याला आता बाहेरून आलेल्या व्यक्तींनी चांगलेच घेरले आहे. बाहेर गावाहून आलेल्या व्यक्तींनी आपली माहिती कोरोना पार्श्वभूमीवर नेमलेल्या ग्राम समितीकडे द्यावी जेणेकरून भविष्यात कर्जतकरासमोर मोठा प्रसंग उभा राहता कामा नये याची खबरदारी घ्यावी, असे आवाहन स्थानिक प्रशासनाकडून करण्यात आले आहे. तसेच बाहेरून आलेल्या व्यक्तींना प्रत्येक ग्रामपंचायत निहाय भागात क्वारंटाईन करण्यात आले आहे. त्यांनी प्रशासनास सहकार्य करत आपल्यासह आपल्या गावाची, परिसराची आणि ग्रामस्थांची काळजी घ्यावी असे म्हंटले. सिद्धटेक गावाचा सर्वे सुरू करण्यात आला असून त्यासाठी सात पथकाद्वारे तपासणी करण्यात येणार आहे. नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता प्रशासनास सहकार्य करीत माहिती द्यावी असे आवाहन महसूल, पोलीस आणि आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे.
नुतन तहसिलदार नानासाहेब आगळे कर्जतला रुजू
कर्जतचे तहसिलदार सी एम वाघ यांची काल विनंती बदली झाल्याने त्यांच्या जागी पदोन्नती बढतीवर चाळीसगाव येथील नायब तहसिलदार नानासाहेब आगळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. आगळे हे शनिवारी संध्याकाळीच कर्जतला हजर झाले आहेत. नुतन तहसिलदार यांच्यासमोर कोरोना परिस्थिती उभी राहिली असून निश्चित ते कर्जतकरांच्या पसंतीस उतरतील अशी अपेक्षा आहे.  

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here