Bhandara : आकाशवाणीच्या ‘शाळेबाहेरची शाळा’ उपक्रमात जिल्ह्याला पहिल्यांदाच बहुमान…

जिल्हा परिषद पूर्व माध्यमिक शाळा, मांडवीच्या शिरपेचात मानाचा तुरा…

पाचवीतील विद्यार्थीनी अर्पिता व पालक राजेश मते यांची थेट मुलाखत प्रसारित

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री 

प्रथम एज्यूकेशन फाऊंडेशन, विभागीय आयुक्त, नागपूर व आकाशवाणी नागपूर केंद्राच्या संयुक्त विद्यमाने ‘शाळेबाहेरची शाळा’ हा बहूरंगी कार्यक्रम आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून आठवडयाच्या दर मंगळवार व शुक्रवारी सकाळी 10:35 वाजता प्रसारित करण्यात येत आहे. मांडवी शाळेतील इयत्ता 5 वी मध्ये शिकत असलेली अर्पिता व पालक राजेश मते यांची थेट मुलाखत शुक्रवारी (दि.22) सकाळी साडेदहा वाजता आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून प्रसारित करण्यात आली. भंडारा जिल्हाला पहिल्यांदाच हा बहुमान मिळवून देणाऱ्या मांडवी शाळेने शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला.

भंडारा जिल्ह्याच्या तुमसर तालुक्यातीत सिहोरा केंद्रांतर्गत मांडवी गावच्या जि.प.पूर्व माध्य. शाळेत गटशिक्षणाधिकारी विजय आदमने यांच्या प्रेरणेने, सरपंच सहादेव ढबाले, उपसरपंच राधेश्याम ढबाले व शाव्यस अध्यक्ष रवींद्रकुमार सरोदे यांच्या पुढाकाराने, केंद्रप्रमुख टी.ए. कटनकार यांच्या मार्गदर्शनात, प्रथम एज्यूकेशन फाऊंडेशनचे तालुका समन्वयक चंद्रशेखर मानकर यांच्या सहकार्याने तसेच उपक्रमशील शिक्षक दामोधर डहाळे यांच्या कल्पकतेने ‘शाळेबाहेरची शाळा’ हा अभिनव उपक्रम सुरू आहे.

याची व्याप्ती वाढली असून आकाशवाणीने मांडवी शाळेच्या या स्तुत्य उपक्रमाची दखल घेतली. कोवीड-19 या रोगामुळे यावर्षी शैक्षणिक सत्र पूर्ण होण्याआधीच शाळा बंद कराव्या लागल्या. भविष्यात शाळा सुरू होणार की नाही? झाल्या तर केव्हा? कशा? असे असंख्य प्रश्न विद्यार्थी, पालक, शिक्षक व प्रशासन या सर्वांनाच पडले आहेत. याच पार्श्वभूमीवर विद्यार्थी हित लक्षात घेता ‘शाळेबाहेरची शाळा’ हा उपक्रम सुरू करण्यात आला. या उपक्रमात छोट्या-छोट्या पण सहज व सोप्या उपक्रमांद्वारे विद्यार्थ्यांची सृजनशीलता जोपासली जाते.

यामध्ये एकदा मुलांना कागदाचे छोटे गोळे करायला सांगितले होते. तर एकदा आई भाकरी कसे करते याचे निरीक्षण करायला सांगितले गेले. हे निरीक्षण करून वहीवर लिहायला सांगितले. तर व्यावहारिक गणितही दिले जाते. या प्रक्रियेत पालक व मुले व समाज असे तिन्ही घटक एकत्र येतात. त्यामुळे शाळा बंद असल्या तरी शिक्षण बंद होत नाही. तसेच विद्यार्थ्यांचा उत्साह वाढतो आहे. पालकांना आपली मुलं काय शिकत आहे हे ही समजते. ग्रामीण भागात जिथे शिक्षण पोहोचवणे अवघड आहे. तिथे या उपक्रमाचा मोठा फायदा होत आहे. याचे महत्व लक्षात घेऊन हा कार्यक्रम नागपूर केंद्रावरून आठवड्याच्या दर मंगळवार व शुक्रवारी सकाळी साडेदहा वाजता प्रसारित करण्यात येणार आहे.

या उपक्रमांतर्गत गेल्या शुक्रवारी (दि.22) मांडवी शाळेतील इयत्ता 5 वी मध्ये शिकत असलेली अर्पिता व पालक राजेश मते यांची थेट मुलाखत प्रसारित करण्यात आली. ही मुलाखत गावच्या मंदिरातील लॉऊडस्पीकरने गावाला ऐकवण्यात आली. तर काहींनी त्यांच्याकडील प्रथमच्या ‘Staying In Touch’ या अॅप वरुन ऐकली. यानिमित्त अर्पिता व पालक दोघांचाही ग्रामपंचायत कार्यालय, मांडवी येथे मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

हा नाविन्यपूर्ण उपक्रम यशस्वीरित्या राबवित असल्यामुळे मांडवी शाळेचे पालक, ग्रामस्थ तसेच सर्वच स्तरातून अभिनंदन होत आहे. या बहुमानासाठी पी.डी.राऊत(मुअ), कु.के.डी.पटले (पशि), एन.जी.रायकवार(सशि), योगेश्वरी तुरकर (स्वयंसेविका) तसेच संतोष इलमे यांचे सहकार्य लाभले.

मनोगत –

1) सध्याच्या कालावधीत विद्यार्थ्यांनी घरी राहून Study from Home नुसार पालकांच्या सहाय्याने विविध Activities पूर्ण कराव्यात. नावीन्यपूर्ण कल्पना व विचार केवळ मुलांसाठीच नव्हे तर शिक्षक,पालक, शाळा व समाजासाठी देखील आनंददायक कशा बनू शकतील यासाठी कृती करण्याची गरज आहे. प्रत्येक शिक्षक व पालकांनी विद्यार्थ्यांना प्रेरणा देऊन दिशा देण्याचे कार्ये करावे.

विजय आदमने, गट शिक्षण अधिकारी

2) शाळा बंद असल्यामुळे केंद्र सिहोरा अंतर्गत सर्व विद्यार्थ्यांना अध्ययनाची संधी पुरवणे याकरिता पालकांच्या मदतीने नवचेतना निर्माण करण्यासाठी निरंतर प्रयत्न सुरू आहेत. शिक्षक व पालकांचे सहकार्य लाभत आहेत.

– टी.ए.कटनकार,केंद्र प्रमुख

3) आमच्या जि.प.पूर्व माध्य. शाळेने मांडवी गावाला संपूर्ण महाराष्ट्रात बहुमान मिळवून दिल्याबद्दल मला माझ्या शाळेचा अभिमान आहे. यानिमित्त मी अर्पिता, तिचे पालक व सर्व शिक्षकांचे अभिनंदन करतो. यापूढेही शाळेची प्रगती करण्यास मी सदैव तयार आहे.
– सहादेव ढबाले, सरपंच

4) मांडवी शाळेत शाव्यस, पालक व शिक्षकांच्या एकत्रित सहकार्याने लॉकडाऊनच्या काळातही विद्यार्थी हिताचे विविध अभिनव उपक्रम सुरू आहेत. यात सर्व पालकांनी सक्रिय राहून पाल्यांच्या माध्यमातून सहभागी व्हावे.
– रवींद्रकुमार सरोदे,अध्यक्ष,शाव्यस

5) डहाळे सरांनी मला व माझ्या मुलीला आकाशवाणीच्या मुलाखतीसाठी प्रेरित करून मार्गदर्शन केले व आमचा सत्कार केला त्याबद्दल सर्वांचे आभार मानतो.
– राजेश मते, पालक

6) मला माझ्या शाळेचा सार्थ अभिमान आहे.यापूढेही सतत आपल्या सर्वांच्या सहकार्याने शाळेची सर्वांगीण प्रगती करूया.
– दामोधर डहाळे, उपक्रमशील शिक्षक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here