Editorial : कोरोना माझा भला!

राष्ट्र सह्याद्री 25 मे

पुढच्यास ठेच मागचा शहाणा अशी आपल्याकडे एक म्हण आहे. तिचा एक अर्थ खाली पाहून चालावे, असा होतो. म्हणजे पायाकडे पाहून चालावे, असा होतो. पायाकडे पाहून चालावे, म्हणजे वर पाहून चालू  नये. तसे केले, तर कपाळमोक्ष होतो. या दोन्ही वाक्यांतून जो अर्थ ध्वनित होतो, तो फार व्यापक आहे. खालच्याकडे म्हणजे गरीबांकडे पाहून मध्यमवर्गाने आपले वर्तन ठेवावे, तर उच्चभ्रूंनीही तसेच करावे. तळागाळातील लोकांची काळजी करावी, असे त्यातून सूचित होते. आपल्याकडे मात्र उलटे होते. मोठ्यांकडे पाहून ते जसे वागतात, तसे वागण्याचा प्रयत्न खालचे लोक करतात. त्यातून मग गरीब अधिक गरीब व्हायला लागतो.

लग्न व अन्य समारंभात मोठे लोक जसे करतात, तसे मग गरीबही करायला लागतात. त्यांची तसे करण्याची ऐपत नसते. आयुष्यभर जमविलेली पुंजी लग्नासाठी खर्च केली जाते. प्रसंगी कर्जही काढले जाते. आयुष्यभर मग ते कर्ज फेडले जात नाही. आयुष्यभर केवळ मुलांच्या लग्नासाठीच झटायचे आणि घाम गाळून कमविलेले पैसे एकाच दिवसात उडवून टाकायचे. त्यातही मुलींच्या लग्नात हुंडा देण्याची कुप्रथा पडली. अजूनही ती आडमार्गाने चालू आहे. मध्यमवर्ग २०-२५ लाख रुपये खर्च करतात. श्रीमंतांच्या काही लग्नात तर कोट्यवधी रुपयांचा खर्च होतो. आठ आठ दिवस भोजनावळी उठतात. सांस्कृतिक कार्यक्रमांवर होणारा खर्च वेगळाच.

एकीकडे सुखासाठी होणारा खर्च, तर दुसरीकडे दुःखातही होणारा खर्च. म्हणजे दहावे, तेरावे, वर्षश्राद्धाच्या निमित्ताने होणारे खर्च चालू असतात. त्यासाठीही ऐपत नसताना काहींना खर्च करावे लागतात. लग्न आणि दहाव्यातील हजेरीवर काहींचे राजकारण अवलंबून असते. कामे केली नाहीत, तरी चालेल; परंतु लग्न, दहाव्यातील उपस्थितीवरून जनसंपर्क करून निवडून येता येते, असा एक समज नेत्यांत दृढ झाला आहे. इतरांच्या लग्नात आपण आयुष्यभर खाल्ले. आपल्या घरीही लोकांनी चार घास खाल्ले पाहिजेत, अशी काहींची भावना असली, तरी ऐपत नसताना पंक्ती उठविणे योग्य नसते. महाराष्ट्रातील बहुजन समाजाला त्याचे भान नसते. मोठेपणाच्या हव्यासापोटी खर्च करण्याची आणि राजकीय नेत्यांच्या उपस्थितीसाठी मुहूर्त चुकवण्याची त्याची तयारी असते. या सर्वांना गेल्या दोन महिन्यांतील कोरोनाने धक्का दिला, हे चांगले झाले. संकटातून चांगले कसे घडते, त्याचे हे उत्तम उदाहरण. आता फक्त हे पुढेही टिकले पाहिजे.

कोरोनाच्या संकटाच्या काळात कोण आप्तेष्ठ, कोण जवळचे, कोण दूरचे हे लोकांना चांगलेच कळले. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी सरकारने काही नियम घालून दिले. गर्दी जमवायची नाही, असे आदेश दिले. सामाजिक अंतर पथ्थ्याचा नियम मोडणा-यांना गजाआड व्हावे लागले. महाड येथे डामडाैलात विवाह करणा-या उद्योगपतीवर गुन्हा दाखल झाला. बीडमध्ये सरकारी नियम धाब्यावर बसविणा-या दीडशे लोकांवर गुन्हा दाखल करण्यात आला. पाथर्डी तालुक्यात नियम डावलून, चोरून दुकानात बस्ता बांधणा-या व्यापा-याला, नोकरांना आणि बस्ता बांधणा-यांनाही बेड्या पडल्या. हे सर्व लोकांना समजत होते. त्यामुळे विवाह करण्यावर आपोआप मर्यादा आल्या.

सामाजिक अंतर पथ्थ्याचा नियम पाळून विवाह व्हायला लागले. व-हाडी नाहीत, वाद्ये नाहीत, मंगल कार्यालये नाहीत, भोजनावळी नाहीत, तरी विवाहाचा आनंद कमी झाला नाही. या सर्वांवर अनेक लोकांचा संसार चालू असतो, हे मान्य; परंतु काही लोकांचा संसार चालण्यासाठी अनेकांचे संसार उद्ध्वस्त होत असतील, काहींना कायमचे कर्जबाजारी व्हावे लागत असेल आणि त्या कर्जबाजारीपणातून नंतर काही आत्महत्या करीत असतील, तर हवा कशाला हा बडेजाव? साध्या पद्धतीने केलेला विवाहही आनंद देतोच, हा नवा मंत्र सापडल्याने त्यातून लाखो रुपयांची बचत झाली. कोरोनामुळे अर्थचक्र बिघडल्याने आता खर्च करण्याचीही तशी ऐपत राहिलेली नाही; परंतु त्यामुळे एका वाईट प्रथेतून बाहेर पडत आहोत, ही गोष्टही चांगलीच आहे. राजकीय नेत्यांशिवाय आणि आप्तेष्टांशिवाय विवाह होतो, त्यात काहीच विघ्न येत नाही. नाही तरी हजारो पत्रिका वाटूनही लग्नानंतर रोष राहतोच. कुणी तरी राहतोच. त्यातून नाराजी निर्माण होते.

आता अवघ्या मूठभर लोकांत विवाह होऊनही कुणाची नाराजी नाही, की रुसवे फुगवे नाहीत. कोरोनाने सर्वांचा आर्थिक डोलारा कोसळला आहे. तरीही साधेपणाने विवाह करताना अनेकांनी सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून मुख्यमंत्री साह्यता निधी आणि पंतप्रधान निधीला मदत केली. केंद्र सरकारने पूर्वी पाच हजारांपेक्षा जास्त लोकांच्या उपस्थितीत केलेल्या विवाहांतील खर्चावर कर लावला होता. सरकारने आताही डामडाैलाने विवाह करणा-यांवर कर लावला पाहिजे. त्यामुळे संपत्तीचे हिडीस प्रदर्शन करणा-यांना आळा बसेल. गोरगरीबही त्यातून धडा घेतील. सामाजिक स्थित्यंतराचा हा काळ आहे. वाईटातून चांगले होते म्हणतात, ते यापेक्षा वेगळे काय असू शकते.

कोरोनाची धास्ती किती असते, याचा प्रत्यय लोकांना आला. कोरोनाग्रस्तांच्या अंत्यसंस्काराला उपस्थित राहिल्याने अनेकांना कोरोना झाला. त्यामुळे कुणाचेही निधन झाले, की लोक दूरच राहायला लागले. काही ठिकाणी तर अंत्यसंस्काराला जवळचे नातेवाइक येऊ शकले नाहीत. मुले, मुली, सुनाही येऊ शकल्या नाहीत. खांदेकरी व्हायला कुणी तयार नव्हते. अंत्यसंस्कार करायला काही ठिकाणी पैसे नव्हते. जवळचे लोकही मदतीला तयार नव्हते. अशा वेळी पोलिसांनीच मानवतेच्या भावनेतून अंत्यसंस्कार केले. काही ठिकाणी मुस्लिमांच्या दफनविधीला हिंदूंनी मदत केली, तर काही ठिकाणी मुस्लिम खांदेकरी झाले. अग्नी मुखाग्नी देण्याचे कामही मुस्लिमांनी केले. सामाजिक भिंती त्यामुळे मोडून पडल्या.

सोलापूरमध्ये तर आप्तेष्ट असूनही ते अंत्यसंस्कारापासून दूर राहिल्याने परधर्मातील लोकांनी अंत्यसंस्कार केले. जवळचे लोक दूर गेले असताना धार्मिकतेच्या भिंती पाडून अन्य धर्मिय जवळ आले. त्यातून आपले कोण आणि दूरचे कोण हा नवा साक्षात्कार अनेकांना झाला. विवाहासारखेच अंत्यसंस्कारातही सामाजिक अंतराचे पथ्थ्य न पाळणा-यांवर गुन्हे दाखल झाले. त्यामुळे तिथेही गर्दीविनाच अंत्यसंस्कार पार पडायला लागले. प्रत्येक भेटायला येणा-यांना तेच तेच दुःखाचे कढ उगाळत सांगण्याची वेळ टळली. कोरोनाचा प्रसार त्यामुळे टळला.

धार्मिक विधीवर अंधश्रद्धेच्या पगड्यातून खर्च करण्याची वृत्ती आहे. आता आपोआप हे विधी टळले. ते केले नाहीत, तरी काही फरक पडत नाही, हे बहुजनांना आतापर्यंत सांगूनही पटत नव्हते, कोरोनामुळे ते पटायला लागले. सुखाच्या आणि दुखाच्या प्रसंगातही कर्जबाजारी होण्याची जी वेळ यायची, ती कोरोनामुळे तरी टळली. आताच्या या प्रसंगातून काही बोध घेऊन समाज पुढे असाच वागत राहिला, तर अनाठायी होणारा खर्च टळून त्यातून काैटुंबिक गरजा किंवा मुलांच्या शिक्षणाचा खर्च भागू शकेल. सरकारने अंत्यसंस्कारासाठी वीस लोकांची घालून दिलेली मर्यादा आणि विवाहासाठी जास्तीत जास्त पन्नास लोकांची घातलेली मर्यादा कोरोना प्रसाराला अटकाव घालण्यास कारणीभूत ठरली, तशीच ती सामाजिक स्थित्यंतराला जबाबदार ठरली. हीच मर्यादा सरकारने यापुढेही कायम ठेवली, तर ते सामाजिक सुधारणेचे आणखी एक पाऊल असेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here