Shrigonda : कोरोनाबाधीत महिलेला भेटलेला, शहरातील एक इसम होम क्वारंटाईन

2

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री

श्रीगोंदा – ठाणे भाईंदर येथून श्रीगोंदा तालुक्यातील चिखली येथे आलेल्या महिलेचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. तालुका आरोग्य विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, नमूद महिलेच्या पतीचा ८ मे रोजी कोरोणामुळे दुर्दैवी मृत्यू झाला होता. अंत्यसंस्कार झाल्यानंतर सदर महिलेचे स्त्राव नमुना चाचणीसाठी घेण्यात आले होते. यानंतर त्या महिलेने रीतसर स्थानिक प्रशासनाकडे गावी जाण्यासाठी अर्ज केला व तो मंजूर झाल्यावर ती आपल्या गावी आली.

इथे आल्यावर तिला ठाणे येथील नॅशनल कॉविड – १९ (सि.आर.वाडिया) या सरकारी लॅब मधून फोन आला. कोरोना पॉझिटिव असल्याने जवळच्या सरकारी रुग्णालयात दाखल होण्यास संदर्भात त्यांना सूचना करण्यात आल्या. तसेच, जिल्हा प्रशासन व आरोग्य विभागासह यासंदर्भात माहिती देण्यात आली. त्यानुसार स्थानिक प्रशासनाने पुढील कारवाई करण्यास सुरुवात केली आहे.

या महिलेच्या घरातील इतर तीन सदस्य व महिला अशा चौघांना अहमदनगर येथील बुथ हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आल्याचे समजते आहे.विशेष म्हणजे श्रीगोंदा शहरातील एक इसम या पीडित महिलेचा नातेवाईक असून, तो चिखली या ठिकाणी जाऊन या कोरोना पीडित महिलेला सुरक्षित अंतरावरून भेटला असल्याने, त्यालाही श्रीगोंदा शहरामध्ये होम क्वारंटाईन करण्यात आले आहे.

श्रीगोंदा तालुक्याचे इन्सिडेंट कमांडर महेंद्र माळी, तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर नितीन खामकर, डॉक्टर राजुळे व पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव सह त्यांच्या सर्व कर्मचाऱ्यांनी कोरोना आपत्तीला रोखण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले आहेत. शहरातील व तालुक्यातील परिस्थिती नियंत्रणात आहे.यातच तालुका बाहेरील लोक तालुक्यात येत असल्याने, तेथील स्थानिक आरोग्य विभाग व प्रशासनाने योग्य ती खबरदारी घेत त्यांच्या तपासण्या करणे गरजेचे आहे. नमूद प्रकरणी ठाणे येथील आरोग्य यंत्रणेच्या ढिसाळ कारभारामुळे तालुक्यामध्ये कोरोनाचा शिरकाव झाला असल्याचे अनेकांचे म्हणणे आहे.

श्रीगोंदा तालुक्यातील आरोग्य विभागामार्फत तसेच श्रीगोंदा तहसीलदार यांच्या सूचनेनुसार बाहेरून आलेले ११९७ जण होम क्वारंटाईन करण्यात आले आहेत. त्यातील ५९१ लोकांना घरी सोडण्यात आले आहे. आज तालुक्यामध्ये संशयित ३ लोक श्रीगोंदा ग्रामीण रुग्णालयात निरीक्षणा खाली आहेत. यामध्ये मुंबई येथील दोन व काल महाराजांची तपासणी केलेल्या लॅबचा चालक यांचा समावेश आहे.

2 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here