Karjat : कर्जत शहर आणि तालुक्यात रमजान ईद साधेपणाने साजरी

2
फोटोओळी - घरातच ईदची नमाज अदा केल्यानंतर सोशल डिस्टन्स ठेवत आणि तोंडाला मास्क बांधत दोन चिमकुले एकमेकांना सलाम करताना (छाया : डॉ अफरोजखान पठाण, कर्जत)

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री दि २५

कर्जत – कर्जत शहर आणि तालुक्यात ईद उल फित्र (रमजान ईद) अत्यंत साधेपणाने साजरी करण्यात आली. कोरोनाच्या अनुषंगाने यंदा प्रथमच सर्व मुस्लिम बांधवांनी आपल्या घरातच ईदची नमाज अदा केली. यावेळी प्रत्येकाने संपूर्ण विश्वशांतीसाठी तसेच कोरोना सारख्या महामारी पासून सर्व मनुष्य जातीचे संरक्षण व्हावे आणि कोरोना हद्दपार व्हावा यासाठी दुवा मागितली.

रविवारी संध्याकाळी चंद्रदर्शन झाल्यानंतर रमजान ईद सोमवारी साजरी होणार होती. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कर्जत शहर आणि तालुक्यातील मुस्लिम बांधवांनी यंदाची सामूहिक नमाज ईदगाह मैदानावर न पडण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे प्रत्येक मुस्लिम बांधवांनी आपआपल्या घरातच खुदबा पठण करीत नमाज अदा केली. यावेळी अखंड विश्वशांतीसाठी तसेच कोरोना सारख्या महामारीपासून सर्व मनुष्य जातीचे संरक्षण व्हावे आणि कोरोना हद्दपार व्हावा. यासाठी अल्लाह चरणी दुवा मागण्यात आली. जगावर आणि भारत देशावर कोरोनाच्या संकटाने हाहाकार माजवला आहे. त्यामुळे कसलाही डामडौल न करता अत्यंत साधेपणाने ईद साजरी झाली. यंदा प्रथमच ईदगाह मैदान ईदच्या दिवशी सुनसान दिसले. ईदनिम्मित शुभेच्छा देण्यासाठी येणारे अधिकारी, राजकीय पदाधिकारी आणि सामाजिक कार्यकर्ते यांनी वैयक्तिक शुभेच्छा देण्यावर भर दिला.

शिरखुर्मा आणि गुलगुळेचे अप्रूप गायब

कोरोनामुळे यंदा ईदला कपडे, अत्तर आणि इतर गोष्टीची खरेदी करता आले नाही. तसेच देश आणि राज्य संकटात असताना ईद साधीच साजरी करण्याचा निर्णय घेतला गेला. त्यामुळे सर्वांनाच रमजान ईदच्या दिवशी शिरखुर्मा आणि गुलगुळे यांचे असणारे अप्रूप आणि त्याचा स्वाद घेता आले नाही. याची सल मात्र सर्व मुस्लिम समाज आणि मित्र परिवारास जाणवत होती.

2 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here