प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री

कोरोना महामारीचा फटका संपूर्ण जगभरात होत आहे. संपूर्ण देश लॉकडाऊन करण्यात आला आहे. याचा फटका सर्वच विभागांना बसत असून इलेक्ट्रॉनिक आणि प्रिंट मीडियातील क्षेत्राला मोठा आर्थिक फटका बसला आहे. लोकशाहीच्या या चौथ्या खांबाला टिकवण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारने विशेष पॅकेजद्वारे सहकार्य करणे गरजेचे आहे, अशी भूमिका महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ केंद्र आणि राज्य शासनाच्या दरबारी प्रखरपणे मांडणार असल्याचे प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे यांनी मराठवाड्यातील पत्रकारांची व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधताना भूमिका स्पष्ट केली.
कोरोना महामारीमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत माध्यमांची परिस्थिती या संदर्भात महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे यांनी मराठवाड्यातील पत्रकारांचे व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधला. पत्रकार संघाचे मराठवाड्याचे प्रभारी संघटक वैभव स्वामी यांनी या सुसंवादाचे आयोजन केले. यावेळी मराठवाड्यातील जालना, हिंगोली, औरंगाबाद आणि बीड जिल्ह्यातील पत्रकारांनी प्रत्यक्ष सहभाग घेऊन निर्माण झालेल्या समस्यावर चर्चा केली. प्रामुख्याने लॉकडाऊन परिस्थितीमुळे इलेक्ट्रॉनिक आणि प्रिंट मीडियावर मोठे आर्थिक संकट कोसळत आहे.
बहुतांश वृत्तपत्र बंद आहेत जे वृत्तपत्र प्रसिद्ध होत आहेत. त्या वृत्तपत्रांना जाहिरातीचा व्यवसाय राहिलेला नाही. शिवाय जाहिरातींच्या थकबाकी वसूलीवर मोठा फटका बसत आहे. अशा परिस्थितीत स्थानिक आणि मोठे वृत्तपत्र हतबल झाल्याने इलेक्ट्रॉनिक आणि प्रिंट मीडियातील कर्मचाऱ्यांवर कपातीचे संकट कोसळत आहे. अनेकांच्या नोकऱ्या गेल्या असून काहीजणांच्या धोक्यात आलेल्या आहेत. जे कर्मचारी कार्यरत आहेत त्या कर्मचाऱ्यांवर पंचवीस ते साठ टक्केपर्यंत पगार कपातीचे संकट ओढवलेले आहे. एकीकडे केंद्र आणि राज्यशासन कोणत्याही कंपन्यांनी, संस्थेने कर्मचाऱ्यांची कपात करू नये, अशा भीषण संकटात आपल्या कर्मचाऱ्यांचे पगार वेळेवर आणि पूर्ण देऊन त्यांना सहकार्य करावे अशी भूमिका स्पष्ट केलेली असताना सुद्धा वृत्तपत्र व्यवसायातील मालक आणि संपादक मंडळी मोठ्या प्रमाणात नोकर कपात करत आहेत.