Ahmednagar : खोट्या माहितीवर मांजरसुंभ्याला दहा लाखांचा पुरस्कार!

गावापेक्षा वनक्षेत्रपालांचा दोष; वनमंत्री राठोड यांच्याकडे तक्रार

नगरः संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान, संत तुकाराम वनग्राम, यशवंत ग्रामसमृद्धी योजनेच्या पारितोषिकांसाठीच्या निकषांत एक समान मुद्दा असतो, तो म्हणजे गावात अतिक्रमण आहे, की नाही. गावात अतिक्रमणे, थकबाकी असली, तर त्या गावांचा पुरस्कारासाठी विचार होत नाही. या पार्श्वभूमीवर नगर तालुक्यातील मांजरसुंभा या गावाला राज्यातील पहिला वनग्राम पुरस्कार मिळाला; परंतु पुरस्काराबाबतची माहिती भरून देताना गावात अतिक्रमणे नाहीत, अशी चुकीची माहिती देऊन राज्य सरकारची दिशाभूल केली, असे आता उघड झाले आहे.

मांजरसुंभा या गावाला राज्यातील पहिला संत तुकाराम वनग्राम पुरस्कार मिळाला. दहा लाख रुपयांचा हा पुरस्कार आहे. गावात वनांची केलेली जोपासना हा जरी पुरस्कारामागचा हेतू असला, तरी त्यात अतिक्रमणाचा मुद्दा आहे. गावाने कितीही चांगले काम केले, तरी अतिक्रमणे असतील, तर काही गुण कमी होतात. सरकार पुरस्कार निवडताना भेटी आणि कागदोपत्री दिलेली माहिती याचा विचार करीत असते. त्यात गावापेक्षा जास्त दोष अधिकारी आणि पदाधिका-यांचा असतो. मांजरसुंभ्याबाबतही तसेच घडले. साहेबराव कोकाणे यांनी माहितीच्या अधिकारातून मागविलेल्या माहितीतून त्यावर प्रकाश पडला. त्यानंतर आता कोकणे यांनी थेट वनमंत्री संजय राठोड यांच्याकडे याबाबत तक्रार केली आहे.

कोकणे यांनी गावाला पुरस्कार मिळाल्यानंतर त्याबाबतची माहिती मागविली. शिवाय गावात जाऊन केलेल्या कामाची छायाचित्रे काढली. गावातील नागरिकांशी चर्चा केली. मांजरसुंभा हे गावच वनविभागाच्या जागेत अतिक्रमण करून वसले आहे. स्मशानभूमीही अतिक्रमणात आहे. वनक्षेत्रपाल रमेश देवखिळे आणि भास्कर शिंदे यांनी वेगवेगळ्या वेळी दिलेल्या अहवालात गावात अतिक्रमण असल्याचे अहवाल दिले आहेत. उपवनसरंक्षकांनीही वनविभागाच्या जागेत अतिक्रमण झाले असल्याचे मान्य केले आहे. वनविभागाच्या गट क्रमांक २३२ मध्ये अतिक्रमण झाल्याचे त्यातून स्पष्ट झाले.  देवखिळे यांची नंतर सहायक वनसंरक्षक अधिकारीपदी निवड झाली. शिवाय ते संत तुकाराम महाराज वनग्राम अभियान समितीच्या उपाध्यक्षपदी तर शिंदे यांची सदस्य म्हणून निवड करण्यात आली. गावात अतिक्रमण असल्याचा अहवाल वनसरंक्षकांना देणारे देवखिळे व शिंदे यांनी मांजरसुंभ्याच्या पारितोषिकासाठीच्या शिफारशीत मात्र अतिक्रमण झाले नसल्याचा अभिप्राय दिला. त्यामुळे सरकारने चुकीच्या माहितीच्या आधारावर मांजरसुंभ्याला राज्यातील पहिल्या क्रमांकांचा दहा लाख रुपयांचा पुरस्कार मिळाला. त्याची आता चाैकशी करण्याची मागणी कोकणे यांनी केली आहे.

वर्षानुवर्षे एकाच जिल्ह्यात

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्यामुळे राज्य सरकारने बदल्यांचा कायदा केला. एका अधिकारी, कर्मचा-याला एका जिल्ह्यात तीन वर्षांहून अधिक काळ राहता येत नाही. तरीही देवखिळे नगर, संगमनेर, टाकळी ढोकेश्वर भागात गेल्या १९ वर्षांपासून कार्यरत आहेत. त्यामुळे त्यांचे हितसंबंध तयार झाले असून त्यांनी पदाचा दुरुपयोग केला आहे, अशी तक्रार वनमंत्र्यांकडे करण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here