प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री

लाॅकडाऊनमुळे झोपड्यांना कुलूप लावून गावाकडे गेलेल्या मजूरांच्या झोपड्यांना सायंकाळच्या सुमारास अचानक आग लागली. या आगीमध्ये तीन झोपड्यातील संसारोपयोगी वस्तू जळून नष्ट झाले आहे. ही आग विझवण्यासाठी अनेकांनी शर्थीने प्रयत्न केले.
कडा येथील बसस्थानकाच्या पाठीमागे हातावरचं पोट असलेल्या काही मजूरांच्या तात्पुरत्या स्वरुपात बांधलेल्या झोपड्या आहेत. या मजूरांचा मिळेल ते कामावर उदरनिर्वाह अवलंबून आहे. मात्र, सध्या कोरोनामुळे सगळीकडे लाॅकडाऊन आहे. त्यामुळे हे मजूर कुटूंबासह आपापल्या झोपड्यांना बंद करुन गावी गेले होते. बुधवारी सायंकाळच्या सुमारास तीन ते चार झोपड्यांना अचानकपणे आग लागली.
सुदैवाने या आगीत कुणी नसल्यामुळे कुठलीही जीवितहानी झालेली नाही. मात्र, मजुरांचे घरातील संसारोपयोगी साहित्य , कपडे आगीत पूर्णपणे जळून नष्ट झाल्याची माहिती मिळाली आहे. या आगीचे कारण मात्र अद्याप समजले नाही.