Maharashtra : Congress : बाळासाहेबांना प्रदेशाध्यक्षपदाच्या जबाबदारीतून मुक्त करणार? नाना पटोले होऊ शकतात नवीन प्रदेशाध्यक्ष?

पृथ्वीराज चव्हण होणार विधानसभा अध्यक्ष?

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री

सध्या महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये काँग्रेसचं पारडं हलकं होत आहे, अशी चर्चा सुरू असून लवकरच काँग्रेसमध्ये बदल केले जाणार आहे, अशी चिन्हे आहेत. सुत्रांच्या माहितीनुसार प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात हे मंत्रिमंडळात असून महसूल मंत्रीपद त्यांच्याकडे आहे. त्यामुळे त्यांना प्रदेशाध्यक्ष पदाच्या जबाबदारीतून मुक्त करण्यात येणार असून नाना पटोले हे नवे प्रदेशाध्यक्ष होऊ शकतात, अशी माहिती मिळत आहे. 

याविषयी नाना पटोले म्हणतात पक्ष जी जबाबदारी देईन ती पार पाडणार. सध्या ते दिल्लीत असून त्यांच्या दिल्ली दौ-यामागे प्रदेशाध्यक्षपद हे कारण असल्याची चर्चा सुरू आहे.

याबाबात माहिती घेण्यासाठी अद्याप बाळासाहेब थोरात यांच्याशी कोणताही संपर्क होऊ शकला नाही.

पृथ्वीराज चव्हण होणार विधानसभा अध्यक्ष?

विधानसभा अध्यक्षपदी पृथ्वीराज चव्हाणांना आणण्याच्या हालचाली सुरु असल्याची सूत्रांची माहिती आहे. विधानसभा अध्यक्ष निवडीला अजून वर्षही पूर्ण झालेलं नाही. मग हा अचानक बदल कशासाठी हा प्रश्न साहजिकच उपस्थित होतो. पण या बदलासाठीची अनेक सबळ कारणं काँग्रेसमध्ये सांगितली जातायत, त्यामुळे तो लवकरच होण्याची शक्यता आहे. अर्थात विधानसभा अध्यक्षपद स्वीकारायला पृथ्वीराज चव्हाण फारसे उत्सुक नसल्याचं त्यांच्या निकटवर्तुळातून सांगितलं जातं आहे.

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री असलेले दोन चव्हाण. एका चव्हाणांचा मंत्रिमंडळात समावेश झाला पण दुसऱ्या चव्हाणांना अद्याप कुठलंच मोठं पद मिळालं नाही. महाविकास आघाडीच्या समन्वय समितीचं अध्यक्षपद स्वीकारण्यास पृथ्वीराज चव्हाण उत्सुक होते. पण मुळात ही समितीच सध्या आस्तित्वात येण्याची शक्यता नाही. त्यांचा मूळचा पिंड दिल्लीच्या राजकारणाचा, पण लोकसभा लढवण्याऐवजी त्यांनी विधानसभाच लढवण्यास प्राधान्य दिलं. त्यामुळे सध्या त्यांच्याकडे कुठलंच मोठं जबाबदारीचं पद नाहीय. म्हणूनच अध्यक्षपदाचा प्रस्ताव पुढे आणला जातोय, अशी माहिती आहे.

महाविकास आघाडीच्या तीन पक्षांमध्ये काँग्रेस कमजोर पडत असल्याची चर्चा अधूनमधून सुरु होते. भविष्यातल्या निवडणुकांचाही विचार पक्षाला करायचा आहे. त्याच अनुषंगानं आता या बदलाची चर्चा जोरात सुरु आहे. विधानसभा अध्यक्षपदासाठी पुन्हा निवडणूक करावी लागणार असली तरी सध्याच्या एकजुटीच्या स्थितीत तीही गोष्ट अवघड नाही असं काँग्रेस नेते सांगतायत. त्यामुळे काँग्रेसच्या या खांदेपालटाला कधी ग्रीन सिग्नल मिळतो हे पाहणं औत्सुक्याचं असेल.

4 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here