Editorial : सामान्यातील असामान्य

0

राष्ट्र सह्याद्री 28 मे

व्यक्ती किती मोठी, तिच्यापेक्षा तिचे कर्तृत्त्व काय, संकटातून ती कशी मार्ग काढते यावर तिचे नेतृत्त्व अवलंबून असते. जगातील कोणताही देश असो, त्याचे नेतृत्त्व कोण करते, याला फार महत्त्व असते. महिलांकडे देशाचे नेतृत्त्व असले, तर संकटाच्या काळात त्या धीरोदात्तपणे वागतील का, याबाबत शंका घेतल्या जात असतात; परंतु ज्यांनी ज्यांनी जगात आतापर्यंत नेतृत्त्व केले, त्यापैकी काहींचा अपवाद सोडला, तर त्यांनी पुरुषांपेक्षाही देशाला पुढे नेले, अशी कितीतरी उदाहरणे आहेत. त्यातही दक्षिण आशियातील नेपाळ आणि चीन वगळता बहुतांश देशात महिलांनी नेतृत्त्व केले आहे.

आतापर्यंत जगातील अनेक देशांचे नेतृत्त्व महिलांनी केले असले, तरी त्यातही इंदिरा गांधी, मार्गारेट थॅचर यांची नावे जगाच्या इतिहासात कणखरपणा, धीरोदात्तपणा, मुत्सद्दीपणा आणि देशाची अचूक माहिती याबाबत नोंदविली गेली आहेत. महिला असूनही त्यांना पोलादी म्हटले गेले. इंदिरा गांधी यांची गणना तर देशातील एकमेव पुरुष अशी झाली होती. सध्याही जर्मनीत अंजली मर्केल यांचे नेतृत्त्व जागतिक पातळीवर गाजत होते; परंतु  त्यावरही आता न्यूझीलंडच्या पंतप्रधान जेसिंडा अर्डर्न यांनी कडी केली आहे. धीरोदात्तपणा, जनमाणसांत मिसळण्याची वृत्ती, जनतेपेक्षा आपण कोणी वेगळे नाही, हे वागणुकीतून दाखवण्याची कृती पाहिली, तर त्यांचे वर्णन सामान्यातील असमान्य अशी केले जाते. आपत्कालीन व्यवस्थापनात आणि कणखरपणात त्या किती उच्चकोटीच्या आहेत, हे त्यांच्या वागणुकीतून दिसले. 

न्यूझीलंडची राजधानी वेलिंग्टनमध्ये सोमवारी सकाळी पाच-सहा रिश्टर स्केल तीव्रतेचे भूकंपाचे धक्के बसले. त्या वेळी जेसिंडा अर्डर्न एका टीव्ही चॅनेलला मुलाखत देत होत्या. भूकंपामुळे त्या इमारतीतील वस्तू हलत होत्या. अशा वेळी दुसरा एखादा देश असता, तर तेथील सुरक्षा व्यवस्थेने सर्वांत अगोदर काय केले असते, तर पंतप्रधानांना बाहेर काढले असते; परंतु तिथे तसे काहीच घडले नाही. जेसिंडा अर्डर्न या जराही हलल्या नाहीत. त्यांनी संयम राखत आपली मुलाखत सुरूच ठेवली. मुलाखत घेणाऱ्या पत्रकाराला मध्येच थांबवत राजधानी वेलिंग्टन परिसरात काय घडत आहे, याची माहिती दिली.

न्यूझीलंड पोलिसांनुसार या घटनेत कोणतेही नुकसान झाले नाही व त्सुनामीचीही शक्यता नाही, अशा शब्दांत नेत्याने तातडीने धीर दिल्यामुळे जनतेतही घबराट निर्माण झाली नाही. किती रिश्टर स्केलचा भूंकप झाला, तर किती नुकसान होते आणि आपण ज्या इमारतीतून ही मुलाखत देत आहोत, ती किती भक्कम आहे, याची अचूक माहिती त्यासाठी असावी लागते. ती जेसिंडा अर्डर्न यांच्याकडे होती. भूकंपाचे झटके बसत असताना पंतप्रधान जेसिंडा या संसदेच्या बिल्डिंगमध्ये मुलाखत देत होत्या. मुलाखती दरम्यानच त्यांनी पत्रकाराला सांगितले, की रयान येथे भूकंप आला आहे. याचे झटके जाणवत आहेत. आजूबाजूच्या गोष्टीदेखील हलत आहेत, असे म्हणत त्यांनी मुलाखत सुरू ठेवली. त्यानंतर त्या म्हणाल्या, की भूकंप थांबला आहे. आता कोणताही धोका नाही. मला वाटत आहे, की मी एका मजबूत इमारतीत आहे. या एकाच घटनेतून अर्डार्न जेसिंडा यांचे मोठेपण, धीरोदात्तपणा, कणखरपणा, अभ्यासूवृत्ती दिसत नाही, तर त्यासाठी गेल्या एक-दोन वर्षांतील अनेक उदाहरणांतून त्यांचे नेतृत्त्व कसे आहे, याची प्रचिती आल्याशिवाय राहत नाही.

गेल्या वर्षीच्या मार्चमध्ये न्यूझीलंडच्या ख्राईस्ट चर्च शहरात अल् नूर या मशिदीत गोळीबार झाला. त्यात ५१ लोक मारले गेले. नेमका त्याच वेळी श्रीलंकेतही असाच हल्ला झाला होता. तेथील मृत्यूची संख्या जास्त होती. श्रीलंकेचे सरकार हादरून गेले. तसे न्यूझीलंडच्या सरकारबाबत झाले नाही. या हल्ल्याला उत्तर देताना जेसिंडा हल्लेखोराला उद्देशून त्याचे नाव न घेता म्हणाल्या, की तू आमच्यावर हल्ला करायचे ठरवलेस; पण आम्ही तुझा हेतू साध्य होऊ देणार नाही. आम्ही तुझ्या नावालाही किंमत देत नाही. नंतर पीडित कुटुंबांना भेटायला जाताना त्या स्वत: बुरखा घालून गेल्या. ज्या कुटुंबातील व्यक्ती गेल्या, त्या कुटुंबातील महिलांच्या गळ्यात पडून त्यांनी त्यांना आश्वस्त केले. त्याबाबतचे जे छायाचित्र प्रसिद्ध झाले, ते जगभर गाजले.

या हल्ल्याला उत्तर म्हणून त्यांनी संपूर्ण देशात एवढया मोठया प्रमाणात हत्यांना कारणीभूत ठरलेल्या सर्व शस्त्रास्त्रांवर बंदी घातली. न्यूझीलंडच्या लोकांना जेसिंडाबद्दल विचारले, तर त्यांच्यांशी आम्ही सहज बोलू शकतो, त्या आम्हाला आमच्यातलीच एक वाटतात, असे जे सांगतात, ते जास्त महत्त्वाचे. जेव्हा पंतप्रधान आपल्यातील एक वाटतात, तेव्हा त्यांच्यावर शंभर टक्के डोळे झाकून विश्वास टाकायला जनताही तयार होते. जगाच्या पाठीवरच्या एका लहानशा देशातील पंतप्रधानांवर जगातील अनेक भाषिक वृत्तपत्रांना लेख, अग्रलेख लिहावेसे वाटतात, यावरून त्यांची कीर्ती कशी वृद्धींगत होत आहे, हे दिसते.

फक्त ४८ लाख इतकी लोकसंख्या असणाऱ्या न्यूझीलंड या छोट्याशा देशाने याबाबत केलेले काम सर्वश्रेष्ठ म्हणून ओळखले जात आहे. जगात दररोज लाखोंच्या संख्येने भर पडत असताना आजघडीला संपूर्ण न्यूझीलंडमध्ये फक्त दीड हजारच्या आसपास कोरोना रुग्णांची संख्या आहे, तर २० जणांचे मृत्यू झाले आहेत. देशात कुठेही समुदाय संसर्ग होत नाही आणि गेल्या काही दिवसांत एकही नवीन रुग्ण आढळून आला नाही. न्यूझीलंडपेक्षा लहान आकाराच्या इटली, स्पेनसारख्या देशांत कोरोनाग्रस्तांचा आकडा लाखोंच्या घरात असताना ऑस्ट्रेलियन खंडातील या देशाने नेमक्या काय उपाययोजना केल्या, याबाबत संपूर्ण जगाला आश्चर्य वाटत आहे.

न्यूझीलंडच्या यशाचे रहस्य त्यांच्या ‘इराडिकेशन स्ट्रॅटिजी’ म्हणजेच निर्मूलन धोरणात आहे. या धोरणांतर्गत जगात सर्वप्रथम टाळेबंदीची अंमलबजावणी करणाऱ्या देशांमध्ये न्यूझीलंडचा समावेश होता. न्यूझीलंडनेच सर्वात आधी आंतरराष्ट्रीय विमान उड्डाणे थांबवली तसेच परदेशातून येणाऱ्या प्रवाशांना सक्तीने क्वारंटाईन करण्यास सुरुवात केली. अर्थात यासाठी न्यूझीलंडला आपल्या भौगोलिक रचनेचाही फायदा झाला. न्यूझीलंड हे एखाद्या बेटाप्रमाणे असल्यामुळे त्यांच्या सर्व दिशांच्या सीमा अतिशय टाईट आहेत. इतक्या उपाययोजना करूनही न्यूझीलंडमध्ये कोरोनाचे रुग्ण आढळून येऊ लागल्यामुळे किवी सरकारने संसर्ग टाळण्यासाठी रुग्णांच्या संपर्कात आलेल्यांचे अतिशय ॲग्रेसिव्ह काँटॅक्ट ट्रेसिंग सुरु केले. यासाठी एका दिवसात हजारो फोन कॉल्स केले जात होते. मार्च महिन्यातील पहिल्या आठवड्यापासून चार टप्प्यात अतिशय कठोरपणे टाळेबंदीची अंमलबजावणी करण्यात आली. कोरोनाचा संसर्ग आता जवळपास थांबला आहे, असे लक्षात आल्यानंतरच न्यूझीलंडने टप्प्याटप्प्याने टाळेबंदी मागे घेण्यास सुरुवात केली.

न्यूझीलंडमधील टाळेबंदीचे वैशिष्टय म्हणजे त्यांनी आपल्या चार टप्प्यांची तीव्रता वाढवत नेली. उलट भारतात टाळेबंदीचे नियम शिथील करण्यात आले. त्यामुळे रुग्णांची संख्या वाढत गेली. टाळेंबदी आपल्या हिताची आहे याची जण असलेल्या तेथील नागरिकांनीही जबाबदारीने त्याला प्रतिसाद दिला. न्यूझीलंडमध्ये दिवसाला सुमारे आठ हजार टेस्ट केल्या जात आहेत. कोरोनावर नियंत्रण मिळवले असले, तरी त्याच्यावर अजून विजय मिळवला नसल्याची आणि हा अदृश्य शत्रू कधीही उभारी घेऊ शकत असल्याची जाणीव ३९ वर्षीय पंतप्रधान जेसिंडा आर्डर्न यांना आहे. त्यांनी आपल्या नागरिकांना या विश्वव्यापी संकटाशी सामना करण्याची उमेद मिळवून दिली आहे. फक्त अडीच वर्षांपूर्वी पंतप्रधान बनलेल्या जेसिंडा यांनी गेल्या वर्षी ख्राइस्टचर्चमधील अतिरेकी हल्ला, भूकंप, ज्वालामुखी विस्फोटनंतर आता कोरोनाचे संकटही प्रभावीपणे हाताळले आहे.

आपत्ती व्यवस्थापनात त्या माहीर असल्याचे त्यांनी कृतीतून दाखवून दिले आहे. टाळेबंदी उठल्यानंतर त्या मित्रासोबत एका हाॅटेलात भोजनाला गेल्या, तर त्यांच्याच आदेशाप्रमाणे सामाजिक अंतर पथ्याचे पालन करीत तिथे काही टेबल मोकळे सोडून लोक भोजन करीत होते. गर्दी असल्याने पंतप्रधानांना बाहेर थांबावे लागले. कोणताही लवाजमा न घेता त्या तिथे गेल्या होत्या. हाॅटेलमध्ये जागा मिळत नाही, म्हणून त्या मित्रासोबत दुसरीकडे जायला निघाल्या, तेवढ्यात एक टेबल मोकळा झाला. त्यानंतर शांतपणे त्या भोजनाला गेल्या. हाॅटेल चालकाने दिलगिरी व्यक्त केली, तर त्यांनी उलट, त्याची आवश्यकता नाही, तुम्ही नियमांचे पालन केले, असे सांगत त्याला आश्वस्त केले. संसदेत आपल्या तीन महिन्यांच्या मुलाला घेऊन जाणा-या आणि त्याचे अजिबात भांडवल न करणा-या जेसिंडा म्हणूनत वेगळ्या ठरतात.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here