Jalna : मनरेगा अंतर्गत फळबाग लागवडीची तरतूद करावी 

0

माजी मंत्री अर्जुनराव खोतकर यांची मागणी

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री 

जालना जिल्ह्यात शेतकऱ्यांचा कल हा फळबाग लागवडीकडे वाढला असून मजूरही मोठ्या संख्येने उपलब्ध आहेत. या मजुरांना कामे मिळावी. यासाठी शेतकऱ्यांना फळबाग लागवडीची तरतूद मनरेगा मार्फत करावी, अशी मागणी शिवसेना नेते माजी मंत्री अर्जुनराव खोतकर यांनी कृषी तसेच  फलोत्पादन व रोहयो मंञ्यांकडे केली.
जालना जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले असता कृषी मंत्री दादाजी भुसे व रोहयो मंत्री संदिपान भुमरे यांनी बुधवारी ( ता. २७) सायंकाळी भाग्यनगर परिसरातील माजी मंत्री अर्जुनराव खोतकर यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. यावेळी खोतकर यांनी जालना जिल्ह्याच्या रखडलेले  प्रकल्प, कामांची प्रलंबित देयके व शेतकऱ्यांच्या समस्यांबाबत महत्त्वपूर्ण चर्चा करून लेखी स्वरूपाचे निवेदन सादर केले. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख भास्करराव आंबेकर, ए. जे.बोराडे, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अनिरुद्ध खोतकर, पंडित राव भुतेकर, युवा सेना राज्य विस्तारक अभिमन्यू खोतकर, जिल्हाप्रमुख भाऊसाहेब घुगे यांची उपस्थिती होती.
मनरेगा अंतर्गत कामे घेण्यास यंत्रणेत उदासीनता दिसून येत असून यामुळे रखडलेली कामे मनरेगाअंतर्गत घ्यावी. तसेच  रोहयोअंतर्गत जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या विहिरींचे अनुदान रखडले असून ते तातडीने वितरित करण्यात यावे, असे नमूद करत अर्जुनराव खोतकर पुढे म्हणाले, चालू खरीप हंगामात शेतकऱ्यांना ठिबक सिंचन योजनेचा पुरेपूर लाभ मिळवून द्यावा. यासाठी शेतकऱ्यांना नव्वद टक्के सबसिडी देण्यात यावी. फळबाग लागवडीचे उद्दिष्ट काढून मागेल त्या शेतकऱ्यास तातडीने फळबाग लागवडीस परवानगी द्यावी.
असे लेखी निवेदनात नमूद करून अर्जुनराव खोतकर म्हणाले, जालना जिल्ह्यात मजुरांची संख्या मोठ्या प्रमाणात असून कामांची मागणी ही ग्रामपंचायतींकडून केली जात आहे. या मजुरांना काम मिळण्यासाठी नाला खोलीकरण, सरळीकरण, बांध बंदिस्त, अशी कामे मनरेगा अंतर्गत घेण्यात यावी.
यापूर्वी मनरेगा अंतर्गत रखडलेल्या रस्त्यांची कामे पूर्ण करून त्यांची प्रलंबित देयके दिली जावी, पानंद रस्ते करण्याबाबत  ग्रामपंचायतींकडून मागणी होत आहे. त्यांना तातडीने मंजुरी द्यावी, असे अर्जुन राव खोतकर यांनी नमूद केले.
जिल्ह्यातील रेशीम उत्पादक शेतकऱ्यांना रेशीम उत्पादनासाठी मनरेगाअंतर्गत मंजूरी मिळाली असून लागवड केलेल्या शेतकऱ्यांना प्रलंबित असलेली देयके तातडीने दिली जावी, तसेच नवीन रेशीम उत्पादक शेतकऱ्यांना रेशीम उत्पादनासाठी मंजुरी दिली जावी.
शेततळे खोदकामाची मनरेगा मार्फत मान्यता मिळाली आहे. अस्तरीकरणाची पन्नीसाठी तरतूद करण्यात यावी,
सामाजिक वनीकरण विभागामार्फत जिल्ह्यात दरवर्षी मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करण्यात येते. मात्र, लागवड केल्यानंतर या वृक्षांचे संगोपन होत नाही, परिणामी वृक्ष तसेच राहतात. या वृक्षांचे संगोपन होण्यासाठी मनरेगा मार्फत स्वतंत्र निधीची तरतूद करण्यात यावी. अशा महत्त्व पूर्ण मागण्या माजी मंत्री अर्जुन राव खोतकर यांनी लेखी निवेदनात केल्या.
तथापि खोतकर यांनी केलेल्या मागण्यांबाबत सकारात्मक दृष्टीने विचार करून निधीची तरतूद केली जाईल आणि जालना जिल्ह्यात झुकते माप देण्यात प्राधान्य राहील, असे कृषी मंत्री दादाजी भुसे व संदिपान भुमरे यांनी यावेळी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here