‘या’ वाडीतील शेतात सापङले गूप्तधन..!

सापडलेले गुप्तधन लोखंडी पेटीत सीलबंद

‘कार्बन डेटिंग’च्या माध्यमातून होणार तपासणी : जिल्हाधिकारी देसाई

कोल्हापूरःआनिल पाटील

 शाहूवाडी तालुक्यातील मौजे अणुस्कुरा येथे जेसीबीच्या सहाय्याने शेत जमिनीचे सपाटीकरण करीत असताना 716 नाण्यांचे गुप्तधन सापडले. उपकोषागार अधिकाऱ्यांकडे सुरक्षा कक्षामध्ये ही नाणी ठेवली असून, पुरातत्व विभागाच्या सहायक संचालकांशी याबाबत पत्र व्यवहार केला आहे, अशी माहिती शाहूवाडीचे तहसिलदार गुरू बिराजदार यांनी दिली.

जमीन मालक विनायक बापुसो पाटील हे गट क्र. 186 आपल्या शेत जमिनीमध्ये 25 मे पासून विकास पाटील, उत्तम पाटील यांच्या समवेत जेसीबीच्या माध्यमातून जमिनीचे सपाटीकरण करत होते.

 यावेळी जमिनीत असणारे मडके फुटून आतमधील असणारी नाणी सापडली. ही नाणी पाटील यांनी शेतामधील घरात असणाऱ्या लोखंडी कपाटात नायलॉन पोत्यामध्ये आणि टी शर्ट मध्ये मातीच्या मडक्याचे तुटलेले तुकडे ठेवले होते. याबाबत पाटील यांनी काल सायंकाळी ८ वाजण्याच्या सुमारास जिल्हाधिकारी दौलत देसाई यांची कार्यालयात समक्ष भेट घेवून त्यांना सापडलेल्या गुप्तधनाबाबत माहिती दिली.

त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी तात्काळ दिलेल्या आदेशानुसार काल रात्री उपविभागीय अधिकारी, तहसिलदार, पोलिस निरीक्षक, करंजफेणचे मंडळ अधिकारी, अणुस्कुराचे तलाठी, तीन पंच आणि जमीन मालक यांच्या समवेत रात्री ३ वाजेपर्यंत गुप्तधन सापडलेल्या ठिकाणाची पाहणी करून पंचनामा केला व नाणी ताब्यात घेतली.

सापडलेले गुप्तधन व मातीचे तुटलेले तुकडे याची मोजमाप करण्यात आले. त्यामध्ये अंदाजे 2 सें.मी. व्यासाची व 2 मि.मी. जाड अशी एकूण 716 नाणी आणि मडक्याचे 19 तुकडे असल्याचे दिसून आले. हे गुप्तधन लोखंडी पेटीमध्ये सिलबंद करण्यात आले आहे. याबाबत अधिक चौकशी करण्यात येत असून, सापडलेले मडके व नाणी यांचे आयुष्यमान व कालावधी कार्बन डेटींगच्या माध्यमातून करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी देसाई यांनी दिले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here