Analysis: भास्करायण :६!!
गड्या आपला गाव बरा….

0

Rashtra Sahyadri Special:


जागतिकीकरणाचे वारे सुसाट सुटले. त्याच्या जोडीला भौतिक सुखाचे चक्रिवादळ घोंघावू लागले.या वादळवा-यांत माणसे माणसांपासून दुरावली.जगायचं विसरुन गेली.वास्तव दुनियेतली माणसे आभासी दुनियेत रममाण झाली. आपण चालती बोलती माणसे आहोत, हेच विसरली. खरंंतर, माणूस हा चराचरातला
नशिबावान प्राणी. कारण त्याला संवादाची, हसण्याखेळण्याची अनमोल देणगी लाभली. जोपर्यन्त भौतिक आभासी दुनिया नव्हती,तोवर माणसे ‘बोलकी’होती. माणसे एकमेकांची सुखदुःख वाटून घ्यायची.

गावाच्या पारावर, ठरलेल्या कट्ट्यांवर मिञांचे फड जमायचे. गप्पागोष्टी झडायच्या.हास्यविनोदांचे फवारे उडायचे. यात दिवसभराचा शिणभार, मानसिक थकवा कुठल्याकुठे निघून जायचा. एकमेकांची आस्थेवाईक चौकशी, हालहवाल पूसले जायचे. माणसेही आपलं मन मोकळं करुन हलकी व्हायची.यात ना स्वार्थ ना मतलब!
गावात एखादं मंगलकार्य असेल, तर अवघं गाव दिमतीला हजर असायचं.स्वयंपाक पाणी, पंगती वाढणेपासून तर थेट मुलगी वाटे लावेपर्यन्त गाव उभा असायचा.जसं आपल्या घरचं कार्य आहे असा ठाम उभा राहायचा. दुःखद प्रसंग असला वा एखादी आपत्ती आली तर गावकरी एकमेकांच्या मदतीला धावायचे.आपल्यापरीनं जे शक्य असेल तेवढा वाटा उचलायचे.मैत असेल तर जणू आपल्या घरातला कुणी गेला असं गावाचं वातावरणं असायचं
काळ बदलला.नवयुग अवतरलं.तंञज्ञानाने आधुनिक सुख साधने आणली. माणूस या सुखसाधनांमुळे सुखासिन बनला. तितकाच ख-या सुख समाधानापासून दुरावला. त्यात संवादाची साधने आली.”कर लो दुनिया मुठ्ठी मे”म्हणत जग खरंच मोबाईलमुळं मुठीत आलं. पण खरी जितीजागती दुनिया मुठीतून कधी निसटून गेली , हे आभासी दुनियेत रमलेल्या माणसाला समजलंच नाही. संवादासाठी आसुसलेला माणूस नावाचा प्राणी जनावराःसारखा मुका बनला!

आभासी दुनियेत टि.व्ही नावाचा ‘इडियट बाॕक्स’ घरात प्रवेशला. गावभर, रानावनात, नदीच्या काठाने हुंडारणारा माणूस घरकैदी झाला. मालिकांच्या विळख्यात अडकला. घरातल्या जित्या माणसांपेक्षा, कृञिम पडद्यावरची बेगडी माणसे त्याला आपली वाटू लागली. मालिकांमधील नात्यांच्या इस्कोटाने कुटुंबव्यवस्था, नाती उध्वस्त केली. ठाराविक आध्यात्मिक व काही ऐतिहासिक मालिकांचा अपवाद वगळता, तथाकथित कौटुंबिक मालिकांनी नात्यानात्यातील भावभावना, नैतिकता संपवून, नातीच अनैतिक करुन टाकली!

भौतिकतेच्या सुखाने झपाटलेली माणसं सैरभैर झाली. गावाच्या तरुणाईला शहरांची भूरळ पडली. गाव, घर, नाते, सवंगडी सोडून तरुणाई शहरांकडे निघाली. कालपर्यन्त माणसांनी गजबजलेली गावे, भकास झाली. पारावरच्या, कट्यावरच्या गप्पांचा फड इतिहासजमा झाला.. गावांना स्मशानकळा आली. माणसे शहरी गेली पण, सोबातीला बकालपण घेवून गेली. दररोज सणवार, याञा असल्यासारखी उत्साहाने जमणारी माणसे, सणावाराला कशीबशी जमू लागली. पण त्यात ना पूर्वीचा ओलावा ना माया!
सण म्हणाजे एक सोपस्कार बनला.त्यात ना पूर्वीचा उत्साह ना आनन्द!

गावातली तरुणाई गेली ती उदर्निवाहासाठी, हे खरे. माञ जाताना ती रिती होवून गेली. शहरी माणूसाचा तिटकारा करणा-या फ्लॕट संस्कतीने, तरुणाईतील मानवी संस्कृती सपाट केली! घर ते आॕफिस आणि पुन्हा घर. विकएंडला जमलंच तर हाॕटेलिंग, सईट सिईंग वा माॕल्समध्ये खरेदी. घरी आलं की बोलणं नाही,विचारपूस नाही. घरात मुलंबाळं आहेत त्याचंही अस्तित्व जाणवत नाही. ज्याच्या त्याच्या हाती अॕण्ड्राॕइड नावाचं वैज्ञानिक कार्ट! कोणाचंं कोणाशी नातं आहे की नाही, असा प्रश्न पडावा.शहरात माणूस इतका कप्पेबंद झालाय की बस्स! अनेकांना आपला शेजारी कोण हे देखिल ठावूक नसते. मग सुखदुःख वाटणी तर दूरच. जमलिच माणसे तर वाढदिवसाला,एखाद्या पार्टिला,फंक्शानला, तर त्यात गर्दी असते,पण संवाद नसतो. असतो तो झगमगाट, दिखाऊपणा. असं असेल तर जमायचं कशासाठी? केवळ औपचारिकता म्हणून? दुःखाच्या प्रसंंगात “व्हेरी सॕड” या दोन शब्दात व्यक्त व्हायचं. अशावेळी बा.सी.मर्ढेकर यांच्या बेगडीपणावरच्या पंक्ती आठवतात……
“उगाच आम्ही फोडतो
माणुसकीचा टाहो,
काल भुकेने मेले
नाव त्याचे कळले काहो! “

कोरोनाच्या आपत्तीने माणसे गावाची वाट धरु लागलीत.शहरातील बेगडीपणा त्याला आता जिवघेणा वाटू लागला. लाख कोटी माणसांच्या गर्दितलं एकाकीपण बोचायला लागलंय. भौतिक साधने आणि मालिकांमधील नात्यांतील फोलफणा त्याच्या ध्यानी येवू लागलाय. कोरोनाच्या आपत्तीने कां होईना माणसाला माणूसपणाची जाण झाली. शहरांत गुदमरलेलंं मन सांगू लागलं,” गड्या आपला गाव बरा………”

भास्कर खंडागळे ,बेलापूर
(९८९०८४५५५१ )

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here