Kada : धग वाढली : आष्टी तालुक्यात 66 टॅंकर्सद्वारे पाणीपुरवठा

0
44 गावे व 37  वाड्यांच्या घशाला कोरड, टॅंकर मागणीचे 19 प्रस्ताव नव्याने दाखल
तालुक्यात पाणीटंचाईने आणखीच उग्र रूप धारण केले असून भीषण पाणीटंचाईमुळे जवळपास निम्म्या गावांना टॅंकर्सद्वारे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा सुरू आहे. 10 दिवसांत 51 असलेली टॅंकर्सची संख्या 66 वर पोहोचली असून आठ विहिरी व बोअरवेलचे अधिग्रहण करण्यात आले आहे. उपविभागीय अधिकारी कार्यालयाकडे आणखी 11 गावांचे प्रस्ताव मंजुरीसाठी पाठविण्यात आले असून, 19 गावांनी नव्याने टॅंकर सुरू करण्याबाबत पंचायत समितीमध्ये प्रस्ताव दाखल केले आहेत. 
मोसमी पावसाबरोबरच परतीच्या पावसानेही गतवर्षी हुलकावणी दिल्याने तालुक्यातील भूजल पातळीमध्ये वेगाने घट होत असल्याने पाणीटंचाईचे संकट अधिक गडद होत आहे. फेब्रुवारीतच अनेक गावांतून टॅंकर्सची मागणी पुढे येऊ लागली. सध्या तालुक्यातील मेहकरी, जांभुळडोह प्रकल्प (धामणगाव), सावरगाव व लिंबोडी या चार प्रकल्पांतच पाणीसाठा शिल्लक आहे. या पाणीसाठ्यातही झपाट्याने घट होत असून आगामी महिनाभरात पुरेसा पाऊस न झाल्यास तेथील पाणीसाठाही संपुष्टात येऊन परिस्थिती आणखी गंभीर होण्याची शक्यता आहे.
नगर जिल्हा सरहद्दीवरील सीना प्रकल्पातूनही काही टॅंकर्सना पाणी भरण्यासाठी उदभव देण्यात आला आहे. 15 मे पर्यंत तालुक्यातील 32 गावांसाठी 52 टॅंकर्सना प्रशासनाने मंजुरी दिली होती. मात्र, यानंतर 10 दिवसांतच संख्येत 15 ने वाढ होऊन एकूण टॅंकर्सचा आकडा 66 वर पोहोचला आहे. सध्या 44 गावांना टॅंकरचे पाणी देण्यात येत असून आठ खासगी विहिरींचेही प्रशासनाकडून अधिग्रहण करण्यात आले आहे.
हिंगणी, बांदखेल, बावी-दरेवाडी, धनगरवाडी, पिंपरखेड-कुंभारवाडी, तिरमलवस्ती (डोईठाण), भाळवणी, मंगरूळ, खानापूर, केळसांगवी, नांदा, कापसी, केळ, हातोला, पोखरी, मांडवा, पिंप्रीघाटा, घाटापिंप्री, भवरवाडी, पांगुळगव्हाण या 19 गावांनी नव्याने टॅंकरसाठीचे प्रस्ताव दाखल केले आहेत. तर बाळेवाडी, सोलेवाडी, देसूर, दादेगाव, खरडगव्हाण, कुंबेफळ, वाळुंज, तवलवाडी, दैठणा, पिंपळसुटी व देऊळगाव घाट या 11 गावांचे प्रस्ताव उपविभागीय अधिकारी कार्यालयाकडे मंजुरीस्तव पाठविण्यात आले आहेत.
उद्भव –   टॅंकर्स संख्या
सीना – 5
मेहकरी – 14
जांभुळडोह तलाव (धामणगाव) – 21
सावरगाव – 3
लिंबोडी – 1

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here