Shrigonda : उपेक्षितांच्या व्यथा समाजासमोर मांडणारा निर्भीड पत्रकार भरत दरेकर यांचे निधन

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री 

श्रीगोंदा – तालुक्यातील हिरडगाव येथे वास्तव्यास असणारे व अनेक राज्यव्यापी वृत्तपत्रांचे तालुका प्रतिनिधी म्हणून, कार्यक्षेत्रात काम करणारे भरत दरेकर यांचे ३९ व्या वर्षी दुःखद निधन झाले आहे. त्यांचे पश्चात आई – वडील , पत्नी, मुलगा, मुलगी, भाऊ असा परिवार आहे. दरेकर हे काही दिवसांपासून एका दुर्धर आजाराने पीडित होते. या आजाराशी संघर्ष करत असताना, त्यांचे निधन झाले आहे. वृत्तपत्र क्षेत्रात अनेकांनी भरत दरेकर यांच्या निधनावर दुःख व्यक्त केले आहे.

सर्वसामान्य उपेक्षित, वंचित घटकांची बाजू निर्भीडपणे आपल्या वृत्तपत्रांच्या माध्यमातून मांडताना, त्यांनी कधीही कोणत्याही विरोधाची तमा बाळगली नाही. आपल्या विचारांशी अनुकूल असणाऱ्या सामाजिक स्त्रोतांशी ते जोडून राहिले. दलित, आदिवासी, कष्टकरी, शेतकरी व वंचित घटकांच्या व्यथा तसेच त्यांवरील अन्याय अत्याचार व सामाजिक धोरणासंदर्भात असलेल्या योजना त्यांनी त्यांच्या लेखणीतून जगासमोर मांडल्या.

सामाजिक, राजकीय, शैक्षणिक क्षेत्रासह पत्रकारीता या विषयांसंदर्भात विचार मांडणे हा त्यांच्या लिखाणाचा गाभा होता.दैनिक सार्वमत, दैनिक देशदूत, दैनिक भास्कर, दैनिक लोकमंथन, दैनिक एकमत यांसह विविध वृत्तपत्रांमधून त्यांनी लिखाण केले आहे. त्यांच्या अकस्मित जाण्याने पत्रकारिता सह राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रामध्ये दुःख व्यक्त केले जात आहे. सामाजिक भान जपत सर्वसामान्यांच्या व्यथा जगासमोर निर्भिडपणे मांडणारा पत्रकार काळाच्या पडद्याआड गेल्याने, सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

3 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here