Editorial : इथे ओशाळले मृत्यू!

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री 

कोरोनामुळे लागू करण्यात आलेल्या टाळेबंदीचा सर्वाधिक फटका हातावर पोट असणा-यांना जसा बसला, तसाच तो मध्यमवर्गीयांनाही बसला. गरीबांना तरी किमान रांगेत उभे राहून अन्नधान्य घेता येते. मोफत धान्याचा फायदा घेता येतो; परंतु मध्यमवर्गीयांना तर तेही करता येत नाही. खोटया प्रतिष्ठेच्या आड लपून अनेक मध्यमवर्गीय सध्या काहीच बोलत नाहीत. कर्जाच्या अन्य हप्त्यांत ते अडकले आहेत. राहणीमान सुधारण्याच्या नावाखाली बचतीकडे केलेले दुर्लक्ष आता भोवते आहे. त्यातही सर्वाधिक हाल ज्यांच्याकडे कोणतीची कागदपत्रे आणि शाश्वत रोजगार नाही, त्यांचे झाले.

दोन महिन्यांच्या टाळेबंदीमुळे हातावर पोट असणा-यांचा रोजगार गेला. लाखो लोकांना दीर्घकाळ अन्नाचा पुरवठा करणे कोणत्याही यंत्रणेला शक्य नसते. तसेच स्थलांतरितांबाबतचे झाले. स्वयंसेवी संस्थांनाही मर्यादा आल्या. महाराष्ट्रात तरी किमान स्थलांतरित मजुरांचे हाल कमी झाले. काम गेले, जवळची पुंजी संपली. त्यामुळे अनेकांनी पायीच गावी जाण्याचा निर्णय घेतला. रस्त्याने जाणारे अशा लोंढ्यावर नजर टाकली, तरी मुले, महिला कुपोषणग्रस्त असल्याचे जाणवते. त्यांना शेकडो किलोमीटर पायी चालणे कठीणच होते. त्यातील काही मुली, महिला घरी जाण्याअगोदरच देवाघरी गेल्या.

वाहतुकीची साधने बंद, पैसा नाही अशा काळात तर स्थलांतरितांचे जास्त हाल झाले. पुण्यातून परभणीला निघालेल्या एका मजुराचा रस्त्यात काही खायला मिळाले नाही आणि पुरेसे पाणीही मिळाले नाही, म्हणून गाव दोनशे किलोमीटरवर आले असताना रस्त्यातच मृत्यू झाला. तेलंगणातून कुटुंबासोबत झारखंडला गेलेली मुलगी घरी पोचलीच नाही. घर १४ किलोमीटरवर असताना तिचा भूकबळी गेला. कोरोनाने देशात झालेल्या एकूण मृत्यूइतकीच कुपोषणामुळे या काळात झालेल्या मृत्यूंची संख्या असावी. माध्यमांना जे कळले नाहीत, असे कितीतरी मृत्यू आहेत.

संकटाच्या काळात माणसे अन्नधान्यावरचा खर्चही कमी करतात. मिळेल ते निकृष्ट खातात. त्याचा परिणाम मुलांवर आणि महिलांवर अधिक होत असतो. स्थलांतरितांच्या परतपाठवणीवरून आणि विशेष श्रमिक गाड्या पुरवण्यावरून वाद घालणा-या राजकारण्यांना हे दिसत नाही. महाराष्ट्रात स्थलांतरितांचे हाल करण्यात आले, असा आरोप करणा-या योगी आदित्यनाथ यांच्या सरकारला आपल्या बुडाखाली काय जळते आहे, याचा पत्ताच लागला नाही. जणू कोणी मुद्दाम स्थलांतरितांचे हाल करीत आहे, असा त्यांच्या वक्तव्याचा अर्थ होता; परंतु त्या राज्यात गेल्यानंतरही स्थलांतरितांचे कसे हाल झाले, त्यांना जेवण दिले नाही आणि दिले, तर पाच दिवसांच्या पु-या दिल्या. असे होत असेल, तर घराअगोदर लोकांसाठी ‘उघडले स्वर्गाचे दार’ चे प्रयोग पाहणेच वाट्याला येणार हे ठरलेले.

बिहारसारख्या राज्याने गेल्या पंधरा वर्षांत प्रगती केल्याचा दावा केला जातो; परंतु तिथे तर कुपोषणाची समस्या अधिक आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांच्या राज्यात काम करणा-या स्थलांतरित महिलेचा मृत्यू हृदयाला पाझर फोडणारा आहे; परंतु राजकीय आरोप-प्रत्यारोपात गुंतलेल्यांना तो दिसणार नाही. मागच्याच आठवड्यात बिहारमध्ये एकाच स्थानकावर एक दिवस थांबलेल्या नागरिकांना  साध्या भोजनाची व्यवस्था करता आली नाही. त्यामुळे स्थलांतरितांनी नितीशकुमार यांच्या निषेधाच्या घोषणा दिल्या. नितीशकुमार यांचे सरकार भाजपच्या पाठिंब्यावर आहे आणि स्थलांतरित मजूर गुजरातमधून बिहारमध्ये गेले होते. महाराष्ट्राच्या नावाने शिमगा करणा-यांना ते कळले नाही. टाळेबंदीच्या काळात

स्थलांतरित मजुरांना अनेक संकटांचा समाना करावा लागत असल्याचे धक्कादायक व्हिडिओ व्हायरल  होत आहेत. असाच एक हृदयद्रावक व्हिडिओ सध्या चर्चेत आहे. व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये एका महिलेचा मृतदेह रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्मवर पडल्याचे दिसते आहे. या मृतदेहावरील चादर खेचून या महिलेचा लहान मुलगा तिला उठवण्याचा प्रयत्न करत आहे. हा मुलगा तिच्या अंगावर चादर खेचून काढतो; मात्र त्या महिलेकडून काहीच प्रतिसाद मिळत नाही. महिलेचा मृत्यू झाल्यानंतर काही मिनिटांनी हा व्हिडिओ चित्रित करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.

महिलेच्या कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार या महिलेचा मृत्यू उपासमारीमुळे झाला आहे. भूकेबरोबरच प्रचंड उष्णता आणि शरीरामध्ये पाण्याचे प्रमाण कमी झाल्यामुळे रेल्वे स्थानकातच या महिलेने प्राण सोडले. हा सर्व धक्कादायक प्रकार बिहारमधील मुज्जफरपूर रेल्वे स्थानकात घडला आहे. मरण पावलेली २३ वर्षीय महिला ही श्रमिक विशेष ट्रेनने सोमवारी बिहारमध्ये दाखल झाली होती. याच स्थानकावर अन्य एका घटनेत एका लहान मुलाचाही मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. पुरेसे अन्न न मिळाल्याने आणि उष्णतेच्या त्रासामुळे या मुलाचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. मृत मुलाचे कुटुंबीय रविवारी दिल्लीवरून आलेल्या ट्रेनने बिहारमध्ये दाखल झाले होते.

व्हायरल व्हिडिओमध्ये दिसणा-या २३ वर्षीय महिलेने शनिवारी गुजरातमधील अहमदाबाद रेल्वे स्थानकातून श्रमिक विशेष ट्रेन पकडली होती; मात्र प्रवासादरम्यान पुरेशा प्रमाणात पाणी आणि अन्न न मिळाल्याने या महिलेला बरे वाटत नव्हते. अखेर रेल्वे मुज्जफरपूर रेल्वे स्थानकात पोहचल्यानंतर खाली उतरल्यावर या महिलेला चक्कर आली आणि ती खाली पडली. काही जणांनी या महिलेला प्लॅटफॉर्मवरील एका ब्रिजखाली ठेवले तिथेच तिचा मृत्यू झाला. ही महिला ट्रेनमध्ये बसली तेव्हाच तिला बरे वाटत नव्हते. या महिलेचा मृत्यू झाल्याने तिचे कुटुंबीय मुज्जफरापूर रेल्वे स्थानकामध्ये उतरल्याची माहिती रेल्वे मंत्रालयाने दिली आहे. ही महिला आधीपासूनच आजारी होती, असे तिच्या कुटुंबीयांनी स्पष्ट केले आहे. २३ मे रोजी अहमदाबादवरून कटिहारला जाण्यासाठी त्यांनी ट्रेन पकडली होती. २५ मे रोजी या महिलेचा मृत्यू झाल्यानंतर कुटुंबीय मुज्जफरपूर रेल्वे स्थानकात उतरले. चुकीची माहित पसरवू नका,  असे ट्विट रेल्वेच्या प्रवक्त्यांनी केले आहे. असे असले, तरी महिलेला पुरेसे अन्न आणि पाणी प्रवासात मिळाले नाही, ही कुटुंबीयांची तक्रार आहे. त्याबाबत रेल्वे काहीच सांगायला तयार नाही.

२५ मार्चपासून देशभरामध्ये सुरू असणाऱ्या टाळेबंदीमुळे देशभरातील मजुरांचे हाल झाले आहेत. अनेकजण हातचे काम गेल्याने शेकडो किलोमीटरचा पायी प्रवास करून आपल्या मूळ राज्यात पोहचण्याचा प्रयत्न करत आहेत. याचदरम्यान झालेल्या काही अपघातांमध्ये स्थलांतरित मजुरांचे प्राण गेल्याच्या घटनाही घडल्या आहेत. टाळेबंदीच्या काळात स्थलांतरित मजूर आणि कामगारांच्या सुरू झालेल्या आणि अजूनही होत असलेल्या हालअपेष्टांची स्वाधिकारात (सुओ मोटो) दखल सर्वोच्च न्यायालयाने घेतली असून, या संदर्भात केंद्र आणि राज्य सरकारांकडे उपायांबाबत विचारणा केली आहे. दोन महिन्यांत केंद्र व राज्यांत केवळ वाद सुरू असताना स्थलांतरितांना घरी पोचण्यात जशी अडचण येत आहे, तशीच अडचण त्यांना भोजन आणि पाणी मिळण्यातही येत आहे. देशात टाळेबंदीच्या काळात लोकांकडील रोख पैसा संपत चालला आहे. लोक अन्न विकत घेऊ शकत नाहीत.

टाळेबंदीमुळे लोक अडकून पडले आहेत. त्यांच्याकडे पैसा नाही व अन्नही नाही. गरीब लोकांना सरकारने पुरवलेले मोफत अन्न घेण्यासाठी मोठया रांगा लावाव्या लागत आहेत. ऐन उन्हाळ्यात लोक अन्नासाठी वणवण भटकत आहेत.  सरकारी व खासगी संस्था त्यासाठी कितीही काम करत असल्या तरी मोफत अन्नाचे वितरण कधीच अचूक नसते. या अन्नाचे प्रमाण अपुरे असते. वृद्ध लोक व लहान मुले असतील तर ते अन्नासाठी रांगेत उभे राहू शकत नाहीत. त्यासाठी कुटुंबातील अन्य व्यक्तींना भिकाऱ्यासारखे हात पसरावे लागतात. या परिस्थितीमुळे रांगेत उभे राहून अन्न नको, अशी मानसिकता तयार झाली आहे. देशातील धान्याची गोदामे भरलेली आणि लोकांची पोटे मात्र रिकामीच असे चित्र देशात तयार झाले आहे. गेल्या ४५ वर्षांत अन्नधान्यांवरचा नागरिकांचा खर्च कमी झाला असून हे लक्षण कुपोषणवाढीचे आहे. लाखो कोटी रुपयांच्या पॅकेजच्या गप्पा मारणारे त्यावर काय करणार, की नुसतेच कुरघोडीचे राजकारण करणार, हा प्रश्न अनुत्तरीत आहे.

3 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here