Shrirampur : नदीम पठाण आत्मदहन प्रकरण : पोलिसांच्या दमबाजीमुळेच केली आत्महत्या! कुटुंबियांचा आरोप

दमबाजी करणा-या त्या पोलिसावर गुन्हा दाखल झाल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेणार नसल्याची नातेवाईकांची भूमिका; 24 तास उलटूनही मृतदेह रुग्णालयात पडून; मृतदेहाची विटंबना; वाचा सविस्तर, नेमके काय आहे प्रकरण
श्रीरामपूर : शहरानजीकच्या दत्तनगर येथील नदीम पठाण या तरुणाने एमआयडीसी रस्त्यावरील पोलीस चौकी समोर पेटवून घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी संबंधित पोलिसांवर गुन्हा दाखल करावा, तरच आम्ही मृतदेह ताब्यात घेऊ, असा पवित्रा नदीमच्या नातेवाइकांसह सामाजिक कार्यकर्त्यांनी घेतला आहे. त्यामुळे 24 तास उलटूनही मृतदेह रूग्णालयात तसाच पडून राहिल्याने मृतदेहाची विटंबना झाली असल्याचे बोलले जात आहे.
शहर पोलीस ठाणे अंतर्गत एमआयडीसीसाठी स्वतंत्र पोलिस चौकी आहे, दत्तनगर परिसरातील लोकांसाठी ही व्यवस्था करण्यात आली आहे. मात्र, या ठिकाणी अनेकदा वेगळ्या प्रकरणामुळे पोलीस चर्चेत आलेले आहेत. त्यातच दि 25 मे रोजी नदीम अन्सार पठाण याने पोलीस चौकी समोर अंगावर पेट्रोल ओतून घेत आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. त्यामध्ये काल दुपारी उपचारादरम्यान त्याचा लोणी येथे रुग्णालयात मृत्यू झाला. मृत्यूनंतर त्याच्या नातेवाईकांनी नदीमच्या मृत्यूची चौकशी करून त्याच्या मृत्यूस कारणीभूत असलेल्या पोलिसांवर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनात नदीमच्या नातेवाईकांनी म्हटले आहे की नदीम पठाण यांची पत्नी हिना हिच्याबरोबर नदीमचे कौटुंबिक वादाचा खटला न्यायालयात प्रलंबित आहे. याप्रकरणी पोलिसांकडून नदीमला अनेक वेळा दमबाजी करण्यात येत असे. तसेच दिनांक 25 मे रोजी रमजानचा उपवास सोडून नदीम हा मित्रांबरोबर एमआयडीसी येथे गेला असता त्याला पोलीस चौकीतून फोन करून पुन्हा दम देण्यात आला. या दमबाजीला वैतागून नदीमने पोलीस चौकी समोर जाऊन अंगावर पेट्रोल ओतून घेत आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. असा आरोप नदीमच्या कुटुंबियांनी केला आहे.
दरम्यान, त्याला उपचारासाठी लोणी येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. काल दुपारी उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. मृत्यू झाल्यानंतर नातेवाईकांसह आ.लहू कानडे उपनगराध्यक्ष करण ससाने, ज्ञानेश्वर मुरकुटे ,सचिन गुजर, शेतकरी संघटनेचे अहमद जहागीरदार, माजी जिल्हा परिषद सदस्य बाबासाहेब दिघे, राहुरी पालिकेचे माजी उपनगराध्यक्ष इस्माईल सय्यद, रिपाईचे भिमराज बागुल, राजाभाऊ कापसे, सरपंच सुनील शिरसाठ माजी उपसरपंच नानासाहेब शिंदे, चांगदेव ढोकचौळे, पोलीस पाटील सुनील गायकवाड, कृष्णा अभंग प्रेमचंद कुंकलोळ, समाजवादी पार्टीचे शोएब इनामदार यांनी नदीमच्या घरी भेट देऊन चौकशी करून कारवाई करण्याची मागणी पोलिसांकडे केली आहे.
मात्र, नातेवाईकांच्या म्हणण्यानुसार पोलीस कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल करून त्याला निलंबित केल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचे निवेदनात सांगितले आहे.
सोशल डिस्टनसिंगचा फज्जा
मयताच्या घरी गेलेल्या पोलीस अधिकाऱ्यांसह सामाजिक कार्यकर्त्यांकडून सोशल डिस्टनसिंगचे कसल्याही प्रकारचे नियम पाळले जात नसल्याचे दिसून आले यामध्ये लोकप्रतिनिधीसह पोलिस अधिकारी उपस्थित होते

2 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here