Editorial : वीर वारीकर पंढरीचे

1

राष्ट्र सह्याद्री 31 मे

पांडुरंगाच्या आरतीत शेवटच्या कडव्यात “आषाढी कार्तिकी भक्त जन येती। चंद्रभागेमध्ये स्नान जे करिती। दर्शन हेळा मात्रा। तया होय मुक्ति। केशवासी नामदेव भावे ओवाळती।। असा उल्लेख सापडतो. याचा अर्थ वारी कधी काढावी, ती कुठं काढावी, असा स्पष्ट उल्लेख असला, तरी विठ्ठल काही पंढरपुरात बसलेला नाही. जगी सर्वंत्र तो आहे. मजल दरमजल करीत १८ दिवसांची वारी करून पंढरपूरला गेलेल्या वारक-यांना तरी कुठं विठ्ठल मंदिरात दर्शन घेता येतं? कळसाच्या दर्शनावर तो समाधान मानतो.

ज्ञानेश्वरीत वारी हा शब्द निरनिराळया अर्थानं घेतलेला आहे. उदाहरणच द्यायचं झालं तर, ‘तरी संकल्पाची सरे वारी, सरे अहंकाराची वारी, सारितसे वारी संसाराची, आता कर्मठा कैची वारी, मग रात्रीची वारी उरे या ठिकाणी वारी म्हणजे ’फेरा ’ अशा अर्थानी आलेला आहे. पंढरपूरला वर्षांतून अनेकदा फेरा मारणारे जसे आहेत, तसेच दोन एकादशीला जाणारेही आहेत. काही वर्षांतून एकदा जातात. त्या १८ दिवसांत मिळालेली सुखाची शिदोरी घेऊन ते वर्ष काढतात. काही लोक असे आहेत, की कळायला लागल्यापासून त्यांनी वारी केली. जेव्हा त्यांनी इहलोकी गमन केले, तेव्हाच त्यांची वारी थांबली. वारकरी हा शेतकरी आहे. तो शेतातल्या उभ्या पिकातही विठ्ठल पाहातो. काळया मातीला विठ्ठलाचे अभंग मानतो. संत सावता माळयाची परंपरा सांगतो.

कांदा मुळा भाजी । अवघी विठाबाई माझी

लसूण मिरची कोथिंबिरी । अवघा झाला माझा हरी

मोट नाडा विहीर दोरी । अवघी व्यापिली पंढरी

सावता म्हणे केला मळा । विठ्ठल पायी गोविला गळा

असं सावता माळी आपल्या अभंगात म्हणतात. या अभंगाचा बारकाईनं अर्थ घेतला, तर कांदा, मुळा, भाजीत ज्यांना विठ्ठल दिसतो, मोट, नाडा, विहीर आणि दोरीत ज्यांना पंढरी दिसते, त्यांना विठ्ठलाच्या दर्शनासाठी पंढरपूरला जाण्याची तितकीशी गरज नाही. आपल्या लाडक्या विठूरायाशी इतके एकरूप झाल्यानंतर आणि आपण दुसरे कोणी नाहीच, अशी तादात्म्याची भावना झाल्यानंतर

इतर कशाचं भान वारक-याला राहत नाही. त्यामुळं आता जेव्हा पंढरीची वारी रद्द करण्याचा आणि वारी प्रतिकात्मक करण्याचा निर्णय झाला, तेव्हा त्याला थोडं वाईट वाटलं असेल; परंतु मनी भाव असलेला हा समाज देवाला पाव म्हणण्याचं ओझंही टाकणार नाही आणि आपल्यामुळे इतरांना त्रास होईल, असे वर्तन करणार नाही. सरकारलाही याची खात्रीच आहे. गेल्या दोन महिन्यांत वारकरी पंढरीला गेले नाही, चैत्र वारी रद्द झाली, तरी त्यानं कुठंही नाराजीचा सूर उमटू दिला नाही.

मुळात विठ्ठलपंत आणि वारकरी संप्रदायही विद्रोही. अंधश्रद्धांवर प्रहार करून समाजाला तात्त्विक, वैचारिक आणि वैज्ञानिक दिशा देण्याचं काम या संप्रदायानं केलं. वारकरी संप्रदाय हा स्थितीवादी नाही. मूलतत्त्ववादी तर मुळीच नाही. काळानुरूप तो बदलतो. फक्त बदलत नाही, त्याची विठ्ठलावरची भक्ती. संत तुकारामांचे अभंग पाहिले, त्यांची गाथा वाचली, तर ते किती विज्ञानवादी होते, हे लक्षात येईल. संत ज्ञानेश्वरांनी तर विश्वकल्याणाची प्रार्थना केली. या पार्श्वभूमीवर कायद्याचे पालन करण्यात विठ्ठलभक्ती मानणारा वारकरी संप्रदाय आपल्यामुळे समाजाचे आरोग्य धोक्यात येणार नाही, यावर भर देणार याबाबत कोणताही प्रवाद नव्हता.

तबलिगींच्या धार्मिक प्रशिक्षणाच्या वेळी कोरोनाचा पहिलाच टप्पा होता. देशात कोरोनाच्या रुग्णांचे प्रमाण आताच्या तुलनेत एक टक्काही नव्हते. आता देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या दीड लाखांच्या आसपास तर महाराष्ट्रातील रुग्णसंख्या साठ हजारांच्या आसपास आहे. त्यात आषाढी वारी होऊ दिली असती, तर जूनच्या दुस-या आठवड्यापासून पालखी सोहळा निघाला असता. त्या काळात कोरोनाचा प्रसार आणखी कितीतरी पटीने झालेला असेल. या पार्श्वभूमीवर विषाची परीक्षा राज्याला नक्कीच परवडणारी नाही. संत ज्ञानेश्वर व संत तुकारामांच्या पालख्या ज्या मार्गाने जातात, त्या मार्गावरील पुणे शहर आणि सोलापूर जिल्हा सध्याच लाल क्षेत्रात आहे. पालख्या पुण्यात ज्या ठिकाणी मुक्कामी असतात, तो परिसर तर अति संक्रमित क्षेत्रात येतो. त्यामुळे वारक-यांच्या जीविताला धोक्यात घालणे योग्य नाही.

दिल्लीत तबलिगींनी भरवलेले मरकज या वेळी वादग्रस्त ठरलं. त्यांनी सुरुवातीच्या काळात देशभर कोरोना पसरविला. रुग्णालयात, विलीगीकरण कक्षात त्यांचं वर्तन आणि त्यांचा उद्दामपणा यामुळं ते वादग्रस्त ठरलं. पर्यटन व्हिसावर देशात आलेल्या तबलिगींनी देशात धर्मप्रसाराचं काम केलं. त्यामुळं त्यांच्याविरोधात न्यायालयीन प्रकरणं चालू आहेत. तबलिगीत सहभागी झालेले लोक अल्लाहमुळं आम्हाला काही होऊ देणार नाही, अशा वल्गना करीत होते. वारकरी संप्रदाय त्या वृत्तीचा नाही. तो कोरोनासारख्या जीवघेण्या आजारातून बाहेर काढण्याचं ओझं विठ्ठलावर सोडणार नाही तसंच त्याला या आजारावर वैद्यकीय उपचार हाच अक्सीर इलाज आहे, हे माहीत आहे.

कोरोनाचं संकट प्रत्येक वारकऱ्याच्या वाटेत आडवं येणार असून सध्या सुरू असलेली जिल्हाबंदी आणि संचारबंदीच्या काळात वारकरी एकत्र येणं किंवा दिंड्या पालखी सोहळ्यानं पंढरीकडं निघणं केवळ अशक्य गोष्ट बनली आहे. त्याची पालखी सोहळ्याच्या आयोजकांना कल्पना होतीच. त्यामुळं सुरुवातीपासून त्यांनी राज्य सरकारच्या निर्णयाला मान्यता देण्याचं ठरविले होतं. पाच मानाच्या पालख्यांनी वारी रद्द करण्याचा निर्णय घेतला होता. वारकरी संप्रदाय सहिष्णू असल्यानं तो कधीच समाजाला आपल्यामुळं त्रास होईल अशी गोष्ट स्वीकारणार नाही आणि कृतीतही आणणार नाही.

पंढरीची वारी हे एक वारकऱ्यांचं व्रत आहे व त्यात ते खंड पडू देत नाहीत. हे खरं असलं, तरी राष्ट्रीय संकटाच्या काळात त्यात खंड पडणार असेल, तर त्याबाबत ते विरोध करीत नाहीत. यापूर्वी १८९६ च्या प्लेगमध्ये वारी खंडीत करण्यात आली होती. पंढरीची वारी आहे माझे घरी । आणिक न करी तीर्थव्रत ।। हे तुकाराम महाराजांनी सांगूनच ठेवले आहे. पांडुरंग हा पतितपावन आहे .. लहान थोर, भलते याती, नारी नर , त्यामध्ये अगदी चांडाळ व वेश्याही अधिकारी ठरवल्या आणि ही मोठी सामाजिक क्रांती या वारकरी संतांनी केली.

वारकरी म्हणजे नुसते हातात टाळ, पताका घेऊन पायी जाणारे पर्यटक नाहीत तर ते ‘आले आले रे हरीचे डिंगर … वीर वारीकर पंढरीचे’ असे नामदेवराय उत्साहानं म्हणतात. हे संत जसे वारकरी आहेत तसेच सामाजिक क्रांतिकारकसुद्धा आहेत. ‘नाचू कीर्तनाचे रंगी । ज्ञानदीप लावू जागी ।। नाम ।।’ ही त्यांची प्रतिज्ञा आहे. कर्मकांडाकडं आणि अंधश्रद्धेकडं जाणारा समाज थोपविला हे वारीचं फार मोठं फलित आहे. वारी म्हणजे आनंदाचा सोहळावारी म्हणजे वैष्णव भक्तांचा महामेळावारी म्हणजे विठ्ठल भक्तीचा लळा! असं वारीचे वर्णन केलं जातं. ती एक वर्ष रद्द झाली, तरी एकादशीच्या दिवशी घरातच अभंग, पारायण, हरिनाम करून भक्तीत दंग होईल. पंढरपूरला न जाताही त्याचा विठूराया त्याला दर्शन देईल.

पंढरपूरच्या वारीला सरासरी दहा लाख वारकरी येतात. एवढ्यांचं जीवित धोक्यात आणणं सरकारला परवडणारं नाही. त्यामुळं पालखी (पादुका) या हेलिकॉप्टर, विमान किंवा बसनं दशमीच्या दिवशी पंढरपूरला नेण्यात येणार आहेत. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. यंदाची आषाढी यात्रा प्रतिकात्मक असेल असे स्पष्ट संकेत आहेत. ऐतिहासिक वारीची परंपरा खंडित होऊ नये, म्हणून पादुका नेण्यासाठी अन्य पर्यायांचा विचार झाला.

कोरोनाचं संकट संपूर्ण देशभर पसरलं आहे. पालख्या ज्या मार्गावरून जातात, त्या पुणे, सातारा आणि सोलापूर या जिल्ह्यात अति संक्रमित क्षेत्र आहे. तीच परिस्थिती त्र्यंबकेश्वर, सासवड, पैठण, मुक्ताईनगरमधून येणा-या पालख्यांची. पुण्यात तर पालख्या जिथं मुक्कामी असतात, तिथंच संचारबंदी. त्यामुळं यंदा आषाढीला एकही दिंडी काढली जाणार नसून मानाच्या सात संतांच्या पादुकांना परवानगी देण्यात आली आहे. या पादुका आणताना प्रत्येक पालखी सोहळ्यातील पाच ते सात भाविकांना परवानगी मिळण्याची शक्यता आहे. ही परवानगीदेखील संबंधित जिल्ह्याचे जिल्हाधिकारी व पोलिस अधीक्षक ठरवणार आहेत.

सध्या जिल्हाबंदी असल्याने कोणत्याही वारकऱ्याला पंढरपुरात प्रवेश असणार नाही. याशिवाय कौंडिण्यपूर येथून येणारी रुक्मिणी मातेची आणि सासवड येथून येणारी चांग वटेश्वर यांच्या पादुकांनाही परवानगी दिली असून अजून एखाद दुसऱ्या पादुकांना सरकारकडून परवानगी मिळण्याची शक्यता आहे. गेली जवळपास आठशे ते साडेआठशे वर्ष पंढरपूरच्या वारीची प्रथा वारकरी समाजाने जपली आहे. फक्त महाराष्ट्रच नाही, तर कर्नाटक आणि आंध्र प्रदेशातूनही लोक नेमानं वारीत सहभागी होण्यासाठी येतात. पण लॉकडाऊनमुळे अनेकांना पायवारी करणं शक्य होणार नाही. अशावेळी व्हर्च्युअल वारीचा पर्याय आहे. राज्यभरातल्या इतर सर्व यात्रा सरकारनं आधीच रद्द केल्या आहेत. जगण्यातील विहित कर्तव्यं पार पाडताना पांडुरंगाशी एकरुप व्हावं, नामस्मरण करावं असा साधा सोपा परमार्थ वारकरी संप्रदायानं सांगितला आहे. तोच एकादशीच्या दिवशी अंगीकारला जाईल.

1 COMMENT

  1. This blog is definitely rather handy since I’m at the moment creating an internet floral website – although I am only starting out therefore it’s really fairly small, nothing like this site. Can link to a few of the posts here as they are quite. Thanks much. Zoey Olsen

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here