Shrirampur : सर्जिकल साहित्यांच्या किमती भिडल्या गगनाला

प्रातिनिधिक छायाचित्र

 प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री 

कोरोनाचा प्रादूर्भाव सुरु झाल्यापासून सर्जिकल साहित्यांच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. डॉक्टरांनी एकदाच वापरण्याच्या अत्यावश्यक साहित्यांच्या किंमती दुप्पट ते दहापट वाढल्या. दवाखान्यातील कर्मचाऱ्यांचे वेतन व स्वच्छता खर्च स्थिर आहे. परंतु, लॉकडाऊनमुळे आजारांचे प्रमाण नियंत्रित झाले. रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात घटली. त्यामुळे, ग्रामीण भागात दवाखान्यांच्या दैनंदिन खर्चाचा ताळमेळ हुकला आहे. ‘आमदनी अठन्नी; खर्चा रुपय्या’ अशी परिस्थिती असल्याचे डॉक्टर सांगतात.

मार्च महिन्यात लॉकडाऊन सुरू झाले. कोरोना संक्रमणाच्या भीतीने काही डॉक्टरांनी ओपीडी बंद केल्या. प्रशासनाने आवाहन केल्यानंतर डॉक्टरांनी दवाखाने सुरू केले. उपचार घेतलेला रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह ठरल्यानंतर काही दवाखाने सील झाले. डॉक्टरांसह कर्मचारी क्वारंटाईन झाले.जागतिक आरोग्य संघटनेने जाहीर केलेल्या कोरोना महामारीत वैद्यकीय सेवा चालू ठेवणारे डॉक्टर रुग्णांसाठी देवदूत ठरत आहेत. डॉक्टरांनी मानवसेवा करावी. ही समाजाची अपेक्षा रास्त आहे. परंतु, कोरोनामुळे डॉक्टरांनाही अनेक समस्यांनी ग्रासले आहे. विशेषतः दवाखाना चालू ठेवण्याचा दैनंदिन खर्च भागविणे कठीण होऊ लागले आहे.

ग्रामीण भागातील डॉक्टरांनी रुग्णांच्या तपासणी शुल्कात, शस्त्रक्रिया व आंतररुग्ण खर्चात वाढ केली नाही. लॉकडाऊनमुळे नागरिक घरात अडकले. उन्हात फिरणे, हॉटेलिंग, उघड्यावरचे खाद्यपदार्थ खाणे बंद झाले. त्यामुळे, बहुतांश उन्हाळ्यातील थंडी-ताप, जुलाब व इतर आजार नियंत्रित झाले. शस्त्रक्रिया व दुर्धर आजारावर व्यतिरिक्त किरकोळ आजाराचे रुग्ण कमी झाले. परंतु, रोज वापरण्याच्या सर्जिकल साहित्यांच्या किमती भडकल्या. त्यामुळे, ग्रामीण भागात डॉक्टरांना दवाखाने चालू ठेवणे जिकिरीचे झाले आहे.

सर्जिकल साहित्यांच्या भडकलेल्या किमती नियंत्रणासाठी केंद्र सरकारने हस्तक्षेप करावा. केंद्राचे औषध नियंत्रक यांनी DPCU (Drugs under price control) मध्ये रोज वापरण्याच्या अत्यावश्यक सर्जिकल साहित्यांचा समावेश करावा. उत्पादन खर्च व नफ्याचे प्रमाण ठरवून, विक्रीची किंमत निश्चित करावी. सद्यस्थितीत शासनातर्फे मेडिकल कौन्सिलकडे नोंदणीकृत डॉक्टरांना नियंत्रित दरात सर्जिकल साहित्य उपलब्ध करून द्यावे.

– डॉ. प्रमोद गाडे ,एम एस ,स्ञी रोगतज्ञ गाडे हॉस्पिटल, श्रीरामपूर

काही सर्जिकल साहित्यांची लॉकडाऊनपूर्वीची व नंतरची किंमत (रुपये)

अशी : (एजन्सी निहाय किमतीत बदल शक्य)
‌1) फेस मास्क (प्रति नग) 2.00 … 25.00
2) सर्जिकल कॅप (प्रति नग) 2.50 … 40.00
3) एक्झामिनेशन ग्लोज. 223.00 … 380.00
(100 नग – जीएसटी सोडून)
4) सर्जिकल ग्लोज (प्रति नग) 13.50 … 19.75
5) स्पिरिट (650 मिली लिटर) 45.00 … 60.00
6) एन 95 मास्क. 30.00 … 150 ते 200.00
7) पीपीई किट 350.00 … 1200.00 ते 1800.00

2 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here