Karjat : कुकडी आवर्तनावर आमदार रोहित पवारांकडून जनतेची दिशाभूल – राम शिंदे

रोहित पवार यांनी शेतकऱ्याची दिशाभूल आणि खोट्या बातम्या प्रसिद्ध करणे थांबवावे

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री 

कर्जत – कर्जतला कुकडीचे तीन आवर्तन मिळणार असे आश्वासन विद्यमान आमदार रोहित पवार यांनी दिले होते. ते त्यांना पाळता आले नसून खोटे आश्वासन देत सर्वसामान्य शेतकऱ्यांची दिशाभूल केली. वास्तविक पाहता ६ जूनला कुकडी आवर्तन मिळणार नसल्याची कबुली स्वत: कुकडीच्या अधिका-यांनी दिली असून जनतेची दिशाभूल आणि खोट्या बातम्या प्रसिद्ध करणे आमदारांनी थांबवावे असा गंभीर आरोप माजी पालकमंत्री राम शिंदे यांनी केले.
सोमवारी ते कर्जत तहसील कार्यालयात उन्हाळी कुकडी आवर्तन उपोषण प्रसंगी बोलत होते. यावेळी अहमदनगरचे भाजपा जिल्ह्याध्यक्ष अरुण मुंढे यांच्यासह विविध पदाधिकारी सोशल डिस्टन्सचे नियम पाळत सहभागी झाले होते. २९ मे रोजी कर्जत भाजपाच्या वतीने माजी पालकमंत्री राम शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली कुकडीचे उन्हाळी आवर्तन मिळणेबाबत उपोषण करण्याचा इशारा दिला होता. यावेळी कर्जत जामखेडचे विद्यमान आमदार रोहित पवार यांनी तात्काळ राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पुणे येथे बैठक घेत दि ६ जूनपासून कुकडीचे आवर्तन मिळणार असल्याची माहिती दिली आणि आज तो सुद्धा फसवा ठरला आहे.
त्या अनुषंगाने आज दि १ जून रोजी कर्जत तहसील कार्यालयासमोर कर्जत भाजपाने राम शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये उपोषण सुरू केले होते. यावेळी तहसिलदार नानासाहेब आगळे आणि कुकडीचे अभियंता रामदास जगताप यांनी राम शिंदे यांच्यासह उपोषणकर्ते यांच्याशी चर्चा केली. यावेळी राम शिंदे अनेक महत्वपूर्ण प्रश्न उभे करत कुकडीच्या अधिका-याची बोलती बंद केली. आपण कुकडी कालवा सल्लागार समितीचे अध्यक्ष होतो. किती पाणी उपलब्धता आहे ते कसे दिले जाते, किती दिवसात प्रत्यक्ष पाणी कर्जतला उपलब्ध होते. या विषयाची जंत्रीच उपस्थित अधिका-यासमोर मांडली. कुकडीच्या जबाबदार अधिकाऱ्याने अभ्यास न करता बोलू नये. यामुळे शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण होत असून त्याची फसवणूक केली जात आहे. समन्वय आणि पाण्याचे नियोजन न झाल्याने त्याचे परिणाम शेतकऱ्यांना भोगावे लागत आहे, असे राम शिंदेनी स्पष्ट केले. कुकडीच्या अधिका-याच्या सदरची चूक लक्षात येताच त्यांनी तांत्रिक गोष्टीचा अभ्यास करीत आपण आपल्या मुद्द्यावर चर्चा करीत लेखी आश्वासन देण्याची तयारी दर्शवली.
कुकडी प्रकल्प उन्हाळी आवर्तन क्रमांक दोनसाठी झूम अँपद्वारे दि २९ एप्रिल रोजी कालवा सल्लागार समितीची बैठक पार पडली होती. याबाबतचे सर्वाधिकार अध्यक्ष तथा जलसंपदा मंत्री यांना देण्यात आले होते. लाभक्षेत्रातील तीन जिल्ह्यातील सात तालुक्याच्या लोकप्रतिनिधीची सहमती घेत दि २९ मे रोजी उन्हाळी अवर्तनासाठी मान्यता दिली आहे. त्यानुसार पिंपळगाव जोगे धरणाच्या मृत साठ्यातून ३.५० टीएमसी पैकी ३ टीएमसी आणि डिंभे व माणिकडोह धरणातून प्रत्येकी ०.५० टीएमसी असे एकूण ४ टीएमसी पाणी जमा करण्याचे निर्देश देण्यात आले असून येडगाव धरणात पुरेसे पाणी साठल्यानंतर दि १० जूनपासून कुकडीच्या डाव्या कालव्यात पाणी सोडण्यात येईल.
सदरचे आवर्तन कर्जत तालुक्यात पाच ते सहा दिवसानंतर म्हणजेच १५ जुनच्या आसपास पोहचणार असल्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर राम शिंदे यांनी आपले उपोषण स्थगित केले. यावेळी भाजपाचे तालुकाध्यक्ष डॉ सुनील गावडे, माजी तालुकाध्यक्ष अशोक खेडकर, उपनगराध्यक्ष नामदेव राऊत, जिल्हासरचिटणीस प्रसाद ढोकरीकर, अजय काशीद, अल्लाउद्दीन काझी, शांतीलाल कोपनर, सचिन पोटरे, सुनील यादव, काकासाहेब धांडे, स्वप्नील देसाई, उमेश जेवरे, अमृत काळदाते, अनिल गदादे आदी उपस्थित होते.
विद्यमान आमदार सर्वसामान्य जनतेची फसवणूक करीत आहे – राम शिंदे

आपण कुकडीच्या आवर्तनाचे उत्तम नियोजन केले असून नियमित आवर्तन केल्याचे सोशल मीडियातून सांगणारे आमदार रोहित पवार यांनी वास्तविक पाहता एक उन्हाळी आवर्तन गायब करण्याचा प्रकार केला आहे. त्यांनी सर्वसामान्य जनता आणि शेतकऱ्यांची शुद्ध फसवणूक केली आहे. आजपर्यंत कुकडीचे उन्हाळी आवर्तन जून महिन्यात कधी ही सोडण्यात आले नाही. कर्जत तालुक्यातील सोशिक जनतेचा आमदार पवार गैरफायदा घेत आहे. वरील जिल्ह्यातील लोक बैठक न घेता आपल्या पदरात कुकडीचे पाणी घेत आहे, असे गंभीर आरोप उपोषणा दरम्यान राम शिंदे यांनी रोहित पवारांवर केले.

कुकडीच्या पाण्यावरून पवारांची बनवा-बनवी

भाजपा कुकडीच्या पाण्यासाठी आंदोलन करणार असल्याने आमदार पवार यांनी घाईघाईने बैठक घेत सहा जुनला आवर्तन सोडणार असल्याच्या खोट्या बातम्या प्रसिद्ध केल्या. सत्य पाहता धरणात पुरेसा पाणीसाठा उपलब्ध नाही आणि आर्वतन सोडणे शक्य नसताना केवळ राजकीय फायदा घेण्यासाठी आमदार रोहित पवार हे सर्वसामान्य जनतेशी बनवा-बनवी करीत आहे, असा आरोप राम शिंदेनी केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here