Shevgaon : शहरटाकळीत महिला कोरोनाबाधीत

संपर्कातील १४ नागरिकांना पाठवले तपासणीला; शहरटाकळी व आंत्रे गावठाण संपूर्ण लॉकडाऊन व सीमाबंद

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री 

शेवगाव तालुक्यात ढोरजळगाव पाठोपाठ शहरटाकळी येथील ६० वर्ष वयोमान असलेली महिला कोरोना बाधीत निघाली असून तालुक्यातील कोरोना बाधितांची संख्या आता दोन झाली आहे.

शहरटाकळी येथील विलगीकरणातील महिला ही मुंबई (विक्रोळी) येथून सहपरिवार आली होती. त्यातील पुरुष व्यक्तिला त्रास होऊ लागल्याने उपचारासाठी त्यास रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्याबरोबर संपर्कातील इतर चार व्यक्तिचे स्त्राव तपासणीसाठी घेतले होते. त्यात संशयित व्यक्तीचा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आला होता. तर संपर्कात असलेल्या महिलेचा रिपोर्ट मात्र पॉझिटिव्ह निघाला आहे. याने शहरटाकळी परिसरात घबराहट पसरली असून सोमवार रोजी शहरटाकळी येथे कुठलाही आदेश नसताना येथील एकही व्यावसायिक दुकान उघडण्यात आले नव्हते.

स्वत:हून व्यावसायिकांनी सर्व व्यवहार बंद ठेवले असून शेवगाव तहसीलदार अर्चना भाकड यांनी १ जून ते १० जूनपर्यंत शहरटाकळी लॉकडाऊन व सिमाबंदचे आदेश दिले आहेत. तर या बाधीत महिलेच्या संपर्कात असलेल्या विलगीकरणातील ८ तर बाहेरच्या ५ नागरिकांना पुढील उपचारासाठी नगर येथील शासकीय रुग्णालयात सोमवार रोजी दाखल करण्यात आले आहे. रात्री साडेबारा वाजता भर पावसात वैद्यकीय अधिकारी डॉ. कैलास कानडे यांनी विलिनीकरणातील महिला बाधित असलेल्या संपर्कातील चार व्यक्तीला रात्रीच १०८ रूग्ण वाहिकेतून नगरला हलविण्यात आले होते.

सोमवार सकाळी शहरटाकळी येथील विलगीकरण कक्षाला पोलीस उपअधीक्षक मंदार जवळे, तहसीलदार अर्चना भाकड, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सलमा हिराणी, नायब तहसीलदार मयुर बेरड, गटविकास अधिकारी महेश डोके, यांनी तातडीने भेट देऊन संपर्कातील व्यक्तीचा शोध घेऊन त्यांना जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी पाठवून पुढील उपाययोजना याविषयी स्थानिक आपत्ती व्यवस्थापन समिती व पदाधिकारी यांचेबरोबर चर्चा केली. यावेळी दहिगावने प्राथमिक आरोग्य केंद्र वैद्यकीय अधिकारी डॉ. कैलास कानडे, डॉ. श्रावणे, सरपंच अलकाबाई शिंदे, आपत्ती व्यवस्थापन समिती सदस्य, पोलीस कर्मचारी हजर होते.

3 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here