Karjat : कोरोना विषाणू पसरविण्यास कारणीभूत ठरणा-या ‘त्या’ व्यक्तीवर गुन्हा दाखल

जिल्हाधिकारी अहमदनगर यांच्या आदेशाचा भंग करून केला राशीन पुणे राशीन प्रवास

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री 

कर्जत : राशीन येथील ५३ वर्षीय कोरोना बाधित व्यक्तीने स्थानिक प्रशासनाची कोणतीही परवानगी न घेता तसेच बेकायदेशीररित्या राशीन ते पुणे आणि पुणे ते राशीन प्रवास करून कोरोना पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी अहमदनगर यांच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी कर्जत पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
पोलीस सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अहमदनगर जिल्हाधिकारी यांनी खबरदारीचा उपाय म्हणून दि १७ ते ३१ मे पर्यंत कोणत्याही व्यक्तीने जिल्हाधिकारी अथवा त्यांनी नियुक्त केलेल्या सक्षम अधिका-याच्या परवानगी शिवाय जिल्हाबाहेर अथवा जिल्ह्यामध्ये प्रवेश करता येणार नाही, अशा स्पष्ट सूचना आणि आदेश दिले होते. यासह सदर आदेशाचा प्रचार व प्रभाव स्थानिक वर्तमानपत्र आणि कर्जत पोलीस स्थानक अंतर्गत राशीन ग्रामपंचायतीचे ध्वनीनिक्षेपक यातून केला होता.
तरीही राशीन येथील ५३ वर्षीय इसम याने विना-परवाना आणि विना पास लपून-छपून  बेकायदेशीररित्या १६ मे रोजी सकाळपासून राशीन ते पुणे प्रवास केला. आपल्या पुणे येथील पत्नीस भेटून पुन्हा १९ मे रोजी संध्याकाळपर्यंत राशीन जिल्हा अहमदनगर येथे प्रवेश केला. तसेच राशीन येथे आपल्या कुटुंबियासोबत १९ ते २५ मे पर्यंत निष्काळजीपणाने राहिला. यासह सदरची माहिती कोरोना ग्रामसुरक्षा समिती राशीन यांच्यापासून लपवून ठेवली. त्यास २५ मे रोजी सर्दी, ताप आणि खोकल्याचा त्रास होऊ लागला असता प्राथमिक आरोग्य केंद्र राशीन येथे उपचाराकामी गेला असता वैद्यकीय अधिकारी डॉ. दिलीप व्हरकटे यांनी त्यास नगर येथे रेफर केले होते. दि २९ मे रोजी तो ५३ वर्षीय इसम कोरोना पॉझिटिव्ह निघाला असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ संदीप पुंड यांच्याकडून समजली.
तद्नंतर त्याच कुटूंबातील आणखी दोन व्यक्तीचा या इसमाशी संपर्क आल्याने कोरोना अहवाल पॉझिटिव्ह निघाला. त्यामुळे सदर इसम हा बेकायदेशीररित्या जिल्हाधिकारी अहमदनगर यांच्या आदेशाचा भंग करून अहमदनगर जिल्ह्याबाहेरील पुणे जिल्ह्यात जाऊन आणि पुन्हा राशीन जिल्हा अहमदनगर येथे आला. तसेच जिल्ह्याबाहेर प्रवास केल्याची माहिती जिल्हा प्रशासन आणि कोरोना ग्रामसुरक्षा समिती राशीन यांच्यापासून लपवून कोरोना विषाणू प्रादुर्भाव पसरविण्यास कारणीभूत झाला आहे असा त्याच्यावर ठपका ठेवण्यात आला आहे. पोलीस कर्मचारी गणेश ठोंबरे यांच्या फिर्यादीनुसार सदर ५३ वर्षीय इसमाच्या विरोधात भादवी कायदा कलम १८८ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कर्जत तालुक्यातील कोणत्याही व्यक्तीने विनापरवाना जिल्ह्याबाहेर प्रवास करू नये. तसेच प्रवास करून आल्यानंतर आपल्या प्रवासाची संपूर्ण माहिती स्थानिक प्रशासनास द्यावी ती लपवून ठेवू नये, असे प्रशासनामार्फत सूचित करण्यात येत आहे. अन्यथा संबंधित त्या व्यक्तीवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, अशी प्रतिक्रिया प्रांताधिकारी अर्चना नष्टे यांनी आमच्या प्रतिनिधींशी बोलताना दिली. 

3 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here