Kolhapur : मूसळधार पावसाने झाड कोसळून वृत्तपत्र विक्रेत्याचा मृत्यू

0

प्रतिनिधी | आनिल पाटील | राष्ट्र सह्याद्री 

टाकाळा परिसरात हिंद कन्या छात्र कोरगावकर ट्रस्ट येथे घरावर झाड कोसळून एका वृत्तपत्र विक्रेत्याचा मृत्यू झाला. ही घटना संयकाळी पाच वाजण्याच्या सुमारस घडली. अग्निशामक दलाच्या जवानांकडून झाड हटविण्यात आले. 

सुरेश केसरकर, असे मयत वृत्तपत्र विक्रेत्याचे नाव आहे. अंगावर झाड पडल्याने गंभीर जखमी झालेल्या केसरकर यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचार सुरू असताना सुरेश यांचा मृत्यू झाला.

मान्सूनपूर्व पावसाने आज दुपारी जिल्ह्यात जोरदार हजेरी लावली. वादळी वाऱ्यासह बरसलेल्या पावसाने जिल्ह्यात काही ठिकाणी झाडे कोसळली. गेल्या चार दिवसांपासून कोल्हापूर जिल्ह्यातील उन्हाचा पारा ३९ अंशांवर पोहोचला होता. मान्सून पूर्व पावसाच्या हजेरीमुळे हवेतील उष्मा कमी झाला आहे. तर टाकाळा परिसरात घरावर झाड कोसळल्याने एकाचा मृत्यू झाला आहे. गेल्या आठवडाभरात तापमानात वाढ झाल्याने कोल्हापूर जिल्ह्यात उष्मा वाढला होता. उन्हाचा पारा ३९ अंशांवर पोहोचल्याने नागरिकांची तगमग वाढली होती.

रविवारी सकाळपासून ढगाळ वातावरणासह हवेत उष्माही होता. दुपारी तीनच्या सुमारास शहरात ढगांच्या गडगडाटासह जोरदार पावसाला सुरुवात झाली. सुमारे तासभर बरसलेल्या पावसाने शहरात सखल भागात पाणी साचले. लक्ष्मीपुरी परिसरात भाजीविक्रेत्यांची तारांबळ उडाली. काही ठिकाणी वादळी वाऱ्यामुळे झाडे कोसळल्याने वाहतूक खोळंबली होती.

शहरातील राजारामपुरी, बागल चौक, परिख पूल, लक्ष्मीपुरी, नागाळा पार्क, या परिसरात रस्त्यांवर पडलेल्या झाडांच्या फांद्या हटवून महापालिका प्रशासनाने वाहतूक सुरळीत केली. वादळी वारा आणि झाडांच्या फांद्या पडल्याने शहरात वीज पुरवठ्याचा लपंडाव सुरू होता. जिल्ह्यातही अनेक ठिकाणी वादळी वाऱ्याचा तडाखा बसला. हातकणंगले, शिरोळ, कागल आणि करवीर तालुक्यात जोरदार पावसाने हजेरी लावली. खरिपाच्या पेरणीसाठी मान्सूनपूर्व उपयुक्त असल्याने शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here