Education: पहिली ते दहावीपर्यंत मराठी विषय सक्तीचा..!

शासन निर्णय जारी

कोल्हापूरः

महाराष्ट्रातील सर्व माध्यमांच्या सर्व व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये मराठी विषय 2020-21 या शैक्षणिक वर्षापासून सक्तीचा करण्यात येणार आहे. याबाबत शासन निर्णय जारी करण्यात आला असून यंदापासून अंमलबजावणी केली जाणार आहे, अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी ट्विटरवर दिली आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील सर्व शाळांमध्ये मराठी विषय आता सक्तीचा असेल.


महाराष्ट्र शालेय शिक्षण विभाग टप्प्याटप्प्याने मराठी सक्ती करणार आहे. शिक्षण विभाग यंदापासून प्रत्येक शैक्षणिक वर्षात दोन इयत्तांना मराठी विषयाची सक्ती करणार आहे. यावर्षी पहिली आणि सहावीसाठी मराठी विषय सक्तीचा असेल. 2021-22 या शैक्षणिक वर्षापासून दुसरी आणि सातवीसाठी, 2022-23 या शैक्षणिक वर्षात तिसरी आणि आठवीसाठी, 2023-24 साली चौथी आणि नववीसाठी, तर 2024-25 या शैक्षणिक वर्षापासून पाचवी आणि दहावीसाठी मराठी विषय सक्तीचा करण्यात येणार आहे.

मराठी भाषेचं संवर्धन व्हावं यासाठी राज्यातील प्रत्येक शाळांमध्ये मराठी विषयाची सक्ती केली जावी, अशी मागणी गेल्या कित्येक दिवसांपासून केली जात होती. याबाबत राज्य सरकारकडूनही प्रयत्न सुरु होते. अखेर दोन्ही सभागृहांमध्ये मराठी भाषा अनिवार्यचा कायदा एकमताने मंजूर करण्यात आला होता. काही दिवसांपूर्वी या संदर्भातील कार्यवाहीचा आढावा मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई आणि शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांच्या उपस्थितीत घेण्यात आला होता.
शिक्षण विभागाने सर्व अभ्यासक्रमांच्या शाळांसाठी मराठी सक्तीने शिकविण्यासाठी केलेल्या पूर्वतयारीबद्दल मराठी भाषा मंत्री देसाई यांनी शालेय शिक्षणमंत्री आणि अधिकाऱ्यांचे आभार मानले होते. तसेच आगामी शैक्षणिक सत्र सुरु होण्यापूर्वी मराठी भाषेचा वर्गवार अभ्यासक्रम, इयत्ता पहिली ते सहावीसाठी पाठ्यपुस्तकं आणि प्राशिक्षण साहित्य, तयार करण्याबाबत विनंती केली होती.
सुभाष देसाई यांनी 2020-21 च्या प्रथम सत्रापासून सर्व माध्यमांच्या शाळांनी मराठी विषय सक्तीने शिकवण्याच्या कायद्याचे पालन करण्यासाठी शालेय शिक्षण विभागाने अधिसूचना काढावी, असंही सुचवलं होतं. अखेर याबाबत आता शालेय शिक्षण विभागाकडून शासन निर्णय जारी करण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here