Kolhapur: कोल्हापूर, सांगली जिल्ह्याला पून्हा महापूराचा धोका ?

0

विविध धरणांमधून 4 हजार

क्सूसेक पाण्याचा विसर्ग

अनिल पाटील। राष्ट्र सह्याद्री

कोल्हापूरः

कोल्हापूरःआनिल पाटील

गतवर्षी आलेल्या महापुरामुळे कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात हाहाकार माजवला. कोट्यवधींचे आर्थिक नुकसान झाले. काही लोकांना प्राणही गमवावे लागले. हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार यंदाही पावसाचे प्रमाण अधिक राहणार असल्याने पुन्हा एकदा कोल्हापूर आणि सांगली या जिल्ह्यांना पुराच्या संकटाला सामोरे जावे लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
कर्नाटकातील अलमट्टी धरणाची उंची वाढवल्यामुळे व त्या धरणातून विसर्ग योग्य वेळी न झाल्याने त्याची फूग सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यापर्यंत आल्याने गतवर्षी महापूर आला. आता मागील दोन दिवसापासून जिल्ह्यात जोरदारपणे कोसळणाऱ्या मान्सूनपूर्व पावसामुळे जिल्ह्यातील धरण क्षेत्रातून विसर्ग करण्यात आला. राधानगरी धरणातून ८००, काळम्मावाडी धरणातून १७०० तर वारणा धरणातून १५०० क्युसेक्सचा असा एकूण ४००० क्युसेक्सने विसर्ग झाला आहे. अतिक्रमण, अलमट्टी धरणाची वाढवलेली उंची, शहरातील गटारे साफ-सफाईची अपूर्ण कामे यामुळे हवामान खात्याच्या अंदाजानुसार पावसाचे प्रमाण वाढल्यास पुन्हा दोन्ही जिल्ह्यांना पूरपरिस्थितीचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे.

कोल्हापूर शहरात गटार, नालेसफाईचे व पाणी निचऱ्याचे काम गतीने झाले नाही. पंचगंगा नदीच्या आजूबाजूला अनेक बांधकाम व्यावसायिकांनी कवडीमोल दराने जमिनी विकत घेऊन त्यावर टोलेजंग इमारती बांधल्या. कोल्हापुरात वाढलेली अतिक्रमणे, शहरातील जयंती नाल्याचा निर्माण झालेला व अस्वच्छतेचा प्रश्न, पाणी निचरा होण्यासाठी केल्या जाणाऱ्या उपाययोजना याकडे कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे थोडेसे दुर्लक्ष झाले आहे.
पंचगंगा नदी किनारी असलेल्या आंबेवाडी, चिखली, प्रयाग, वरणगे, पाडळी या गावांना तर पुराचा फटका नेहमी बसतो. पुराचा संभाव्य धोका ओळखून आपत्तीकालीन व्यवस्था निर्माण करण्याची सोय जिल्हा प्रशासनाने केलेली आहे. कोल्हापूर व सांगली जिल्ह्यात यातील नदीकाठावर असलेल्या गावांतील नागरिकांचे स्थलांतर करावे लागणार आहे.
अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे केरळच्या धर्तीवर महाराष्ट्रातही या चार-पाच दिवसांत मोठ्या प्रमाणात पाऊस होण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कर्नाटकातील मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून त्यांना अलमट्टीतून मोठ्या प्रमाणात विसर्ग करण्याची आग्रही भूमिका घ्यावी लागेल. अन्यथा, मागील वर्षाप्रमाणे याही वर्षी दोन्ही जिल्ह्यांमध्ये महापुरामुळे प्रचंड नुकसान व्हायची शक्यता आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here