पिंपळगाव पिसासह बेलवंडी, विसापूर परीसरातील गावावर प्रथमच कोरोना विषाणूची दहशत…
केशव कातोर । राष्ट्र सह्याद्री

उक्कडगाव : श्रीगोंदा तालुक्यातील कोडेगव्हाण या छोट्याशा खेडेगावात मुंबई च्या गोवंडी भागातून नुकत्याच कोडेगव्हाण या गावात आलेली 85 वर्षाची महिला कोरोना पॉझिटिव्ह आढळली. पिंपळगाव पिसा प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अंतर्गत येणाऱ्या कोडेगव्हाण या गावात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्याने परीसरात कोरोना विषाणूची एकप्रकारची दहशतच निर्माण झाली आहे.
श्रीगोंदा तालुक्यातील प्रशासकीय अधिकार्यानी अतिशय कसोशीने प्रयत्न करत आतापर्यंत श्रीगोंदा तालुक्यातील कोरोना विषाणू चा पादुर्भाव रोखण्याचा प्रयत्न केला. परंतु मुंबईसह रेडझोन परीसरातुन श्रीगोंदा तालुक्यातील खेडेगावात येणाऱ्याची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. लोक आल्यानंतर प्रशासनापासून माहिती लपवतात त्यामुळे अडचणीत वाढ होताना दिसून येत आहे.
श्रीगोंदा तालुक्याचे तहसीलदार महेंद्र माळी व पिंपळगाव पिसा प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ पुजा देशमुख यांनी दिलेल्या माहितीनुसार संबंधित महिलेला कोविड सेंटर श्रीगोंदा येथे पाठवण्यात आले.
तपासणी अहवाल आज पॉझिटिव्ह प्राप्त झाल्याने त्या महिलेला पुढील उपचारासाठी अहमदनगर येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठविण्यात आले आहे. आजपासूनच कोडेगव्हाण या गावाला कंटेन्मेंट झोन म्हणून घोषित करण्यात आले, काही काळ या गावातील दैनंदिन व्यवहारवर काही निर्बंध घालण्यात येणार आहे.
आरोग्य विभागाच्या वतीने या गावची येणाऱ्या काळात काळजी घेण्यात येणार आहे. त्यामुळे नागरिकांनी घाबरून न जाता प्रशासनाला सहकार्य करावे, व वैयक्तीक आरोग्याची काळजी घ्यावी असे आव्हान पिंपळगाव पिसा प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ पुजा देशमुख यांनी केले आहे.