विखे_थोरातांच्या राजकारणात ‘साखर कामगार’ केंद्रस्थानी! विखे पाटलांनी देऊ केलेल्या सेवेमागील ‘गुपित’काय?

करण नवले । राष्ट्र सह्याद्री

श्रीरामपूर : राज्याचे माजी विरोधी पक्षनेते आमदार राधाकृष्ण विखे पाटील व विद्यमान महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्यातील राजकीय संघर्ष सर्वश्रुत आहे. श्रीरामपूर येथील साखर कामगार ट्रस्ट  आता या राजकीय संघर्षाचा केंद्रबिंदूठरू पाहत आहे. विखे पाटलांनी या रुग्णालयाला देऊ केलेल्या सेवेमागे वेगळेच ‘गुपित’ दडल्याचा संशय ट्रस्टी व्यक्त करत आहेत.

 साखर कामगार रुग्णालय हे कामगारांनी स्थापना करून चालविलेले आशिया खंडातील पहिले व एकमेव ट्रस्ट आहे. 55 वर्षांपासून साखर कामगारांनी मिळून चालविलेल्या या रुग्णालयाच्या कारभारात राजकीय ढवळाढवळ नको. वाटल्यास मदत करू नका, पण हस्तक्षेप नको असं म्हणण्याची वेळ विश्वस्त मंडळावर आली आहे.

‘महसूलमंत्री थोरात यांचे मेहुणे आमदार डॉ. सुधीर तांबे यांच्या रुग्णालयामार्फत साखर कामगार रुग्णालयात वैद्यकीय सेवा सुरू केली पण अडीच वर्षात त्यांनी येथील कारभारात ढवळाढवळ केली नाही. उलटपक्षी विखे पाटलांनी देऊ केलेली मदत म्हणजे ‘पुतना मावशीचे प्रेम’, अशी प्रतिक्रिया एका विश्वस्ताने ‘राष्ट्र सह्याद्री’शी बोलताना दिली.

विखेपाटील यांनी साखर कामगार रुग्णालयाच्या इमारतींचे आणि जागेचे मोजमाप केल्याने ते हे रुग्णालय ते ताब्यात घेणार, अशी चर्चा झडू लागली आणि साखर कामगार ट्रस्टच्या विश्वस्थांमध्ये अस्वस्थता पसरली. त्यातून विश्वस्त भीमराज देवकर यांनी जाहीर पत्रक काढून विखे पाटील यांच्या साखर कामगार मधील कथित हस्तक्षेपाल विरोध दर्शविला. देवकर यांनी केलेल्या दाव्याप्रमाणे साखर कामगारांनी मिळून हे ट्रस्ट स्थापन केले. स्व. गोविंदराव आदिक व स्व. जयंत ससाणे यांचा अपवाद वगळता अन्य कोणत्याही पुढाऱ्यांची मदत ट्रस्टला मिळाली नाही. ट्रस्टी गंगानाथ देशपांडे, उद्योजक श्याम चुग, दत्ता साबळे, रमेश लोढा आदींनी वेळोवेळी मदत केल्याने रुग्णसेवेला हातभार लागला.

विखे पाटील यांनी श्रीरामपूर येथे कार्यालय सुरू केले त्यावेळी त्यांनी “वैद्यकीय सुविधेसाठी आता बाहेर जावे लागणार नाही, श्रीरामपूर मध्येच ‘साखर कामगार’च्या माध्यमातून सुविधा देऊ” असे म्हटले होते. त्यावेळी कुणी फार लक्ष दिले नाही. आता त्यांनी थेट रुग्णालय व परिसराचे मोजमाप घेतल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या. विखे व माजी आमदार भानुदास मुरकुटे यांच्यात सध्या राजकीय सख्य आहे. दोघेही राजकीय व्यासपीठावर राष्ट्रवादीचे नेते शरद पवार व काँग्रेसचे महसूलमंत्री थोरात यांचे विरोधक आहेत. 

Daily Rashtra Sahyadri

साखर कामगारमध्ये विखे यांचे समर्थक ज्ञानदेव आहेर कार्यकारी मंडळाचे प्रमुख असले तरी आतापर्यंत थेट विखे यांचा हस्तक्षेप नाही. दुसरे विश्वस्त अविनाश आपटे कामगार नेते आहेत. त्यांच्यासह इतर विश्वस्थांचाही विखे पाटील यांच्या हस्तक्षेपाला विरोध आहे. शिवाय शरद पवार यांचे नातेवाईक डॉ. रवींद्र जगधने व्यवस्थापनात प्रमुख पदावर आहेत. अशोक कारखान्याच्या वतीने विश्वस्त असलेले माजी आमदार भानुदास मुरकुट हे विखे यांच्या भूमिकेशी सहमत असू शकतील, अशी चर्चा इतर विश्वस्थांमध्ये आहे. विखे पाटील कारखान्याच्या वतीने खासदार डॉ. सुजय विखे हे सदस्य असून नुकत्याच झालेल्या निवडणुकीनंतर नूतन अध्यक्ष आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नावाचा ठराव ट्रस्टकडे पाठविण्यात आला आहे. आहेर यांनी अद्याप आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही. इतर विश्वस्त यांचीही भूमिका महत्त्वाची असेल.

गेल्या 55 वर्षात साखर कामगार ट्रस्टच्या कारभारात राजकीय हस्तक्षेप झाला नाही, व्यावस्थान पाहणाऱ्या कामगार प्रतिनिधींनी तो होऊ दिला नाही. साखर कामगार ट्रस्टचे गंगाधर ओगले रुग्णालय अविरत रुग्णसेवा देत आहे. यापुढेही रुग्णसेवेत राजकारण नको, अशी अपेक्षा सामान्य श्रीरामपूरकारांमधून व्यक्त होत आहे. 

पूर्वीही झाला होता प्रयत्न!

सन 1965 साली स्थापना झालेल्या या ट्रस्टसाठी अशोक कारखाना, प्रवरा कारखाना, महाराष्ट्र शुगर मिल, बेलापूर शुगर इंडस्ट्री व शेती महामंडळाच्या कामगारांनी योगदान दिले. 1986 साली गंगाधार ओगले यांच्या कार्यकाळात रुग्णालय बंद पडले. त्यावेळी नगरपालिकेला रुग्णालय चालवायला देण्याचा ठराव झाला पण कामगार संघटनांनी तो प्रयत्न हाणून पडला. तेव्हापासून आजतागायत ज्ञानदेव आहेर, अविनाश आपटे, महाराष्ट्र आरोग्य मंडळाचे डॉ.दादा गुजर यांनी यात राजकारण येऊ दिले नाही. 

कार्यकारी मंडळ

स्वतंत्र कारभार असलेल्या साखर कामगार ट्रस्टवर कुठलेही कर्ज नाही. रुग्णालय व नर्सिंग कॉलेज असे सुमारे शंभर कर्मचारी व शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी सुसज्ज इमारती असा विस्तार आहे.कार्यकारी विश्वस्त – ज्ञानदेव आहेर, विश्वस्त – अविनाश आपटे, अशोक पाटील, भीमराज देवकर, अण्णा कुडके, गंगाधर देशपांडे, शेखर ओगले, भानुदास मुरकुटे, डॉ. सुजय विखे व महाराष्ट्र आरोग्य मांडळाचे प्रतिनिधी.

मुळा प्रवराची पुनरावृत्ती?

दहा वर्षांपूर्वी विखे-पवार वादात आशिया खंडातील एकमेव सहकारी वीज वितरण संस्था मुळा-प्रवराचा बळी गेला. त्यावेळी माजी आमदार भानूदास मुरकुटे यांची भूमिका निर्णायक होती. आता ‘साखर कामगार’च्या निमित्ताने पुनरावृत्ती होण्याचा धोका आहे. विखे-पवार-थोरात या राजकीय त्रिकोणात अडकलेल्या संस्थेला वाचविण्यासाठी विश्वस्त काय भूमिका घेतात, हे पाहणे औत्सुक्याचे!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here