Shirurkasar : कमळेश्वर धानोरा नदीपात्रात दोन गटात राडा; हवेत गोळीबार?

पथकाची कुणकुण लागताच वाळू उपसा करणारे फरार; तक्रार केल्याच्या संशयावरून झाला वाद 

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री | जगन्नाथ परझणे

तालुक्यातील कमळेश्वर धानोरा येथील नदीपात्रात मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीर वाळू उपसा सुरू आहे. सोमवारी मध्यरात्रीच्या दरम्यान तहसीलचे पथक आल्याची कुणकुण लागताच एक जेसीबी आणि काही ट्रॅक्टरसह वाळू माफियांनी पळ काढला. शिवाय वाळू उपसा करणाऱ्या माफियांनी तहसीलच्या पथकाला माहिती दिल्याच्या संशयावरून दोन गटात राडा झाल्याचा प्रकार देखील घडला असून हवेत गोळीबार झाल्याची चर्चा आहे.

सोमवारी मध्यरात्री साडेअकराच्या सुमारास नायब तहसीलदार किशोर सानप हे दोन कोतवालांसमवेत तहसीलदार श्रीराम बेंडे यांच्या आदेशानुसार कमळेश्वर धानोरा येथे बेकायदेशीर वाळू उपसा करणाऱ्या वाळू माफियांवर कारवाई करण्यासाठी गेले होते. नदीपात्रापासून काही अंतरावर पौंडूळ येथील दोन तरुण उभे होते. वाळू माफियांच्या संबंधातील काही लोकांनी नायब तहसिलदार किशोर सानप यांच्या पथकाला सदरील तरुणांनीच माहिती दिली असल्याचा संशय व्यक्त करत त्यांना मारहाण केली. पौंडूळ येथील लोकांना हा प्रकार समजल्यानंतर ते देखील घटनास्थळी आले आणि त्या ठिकाणी मोठा वाद निर्माण झाला. यावेळी गोळीबार झाल्याची चर्चा आहे.

सदरील प्रकार नायब तहसीलदार किशोर सानप यांनी सहपोलीस निरीक्षक सुरेश खाडे यांना मोबाईलवरून सांगितला. त्यानंतर पोलीस उपनिरीक्षक मनोज बरुरे हे फौजफाट्यासह घटनास्थळी गेले. त्यानंतर तेथील तणाव निवळला असून या प्रकरणी अद्यापपर्यंत कसलाही गुन्हा किंवा नोंद करण्यात आली नव्हती.

वाळू माफियांमध्ये स्पर्धा

कमळेश्वर धानोरा भागातील नदीपात्रात सतत बेकायदेशीर वाळू उपसा होत असून या प्रकाराकडे प्रशासकीय यंत्रणेचे लक्ष नसल्याचे सोमवारी घडलेल्या प्रकारावरून दिसून येते. शिवाय वाळू माफियांमध्ये उपसा करण्याच्या कारणावरून मोठ्या प्रमाणावर स्पर्धा सुरू असून पौंडूळ आणि कमळेश्वर धानोरा ही गावे जवळची असल्याने त्यांच्यामध्ये एकच नदीपात्र आहे.

तहसीलदार श्रीराम बेंडे यांच्या आदेशानुसार कमळेश्वर धानोरा नदीपात्रात कारवाई करण्याच्या उद्देशाने पथकासमवेत गेलो होतो. चौकशी करत असताना जवळ उभ्या असलेल्या तरुणांना आम्हाला माहिती दिल्याच्या संशयावरून वाद सुरू झाला. सदरील घटनेची माहिती मोबाईलवरून सहपोलीस निरीक्षक सुरेश खाडे यांना दिली. त्यानंतर पोलीस उपनिरीक्षक मनोज बरुरे हे फौजफाट्यासह घटनास्थळी हजर झाले.
किशोर सानप -नायब तहसीलदार,शिरुर-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here