Agriculture : बारामतीची भेंडी युरोपात

0

कोल्हापूरः | प्रतिनिधी | आनिल पाटील

अवकाळी पाऊस तसेच कोरोनाच्या संसर्गाचा फटका राज्यातील शेतकऱ्यांना बसला आहे. लहरी हवामान आणि करोनाच्या संकटामुळे शेतकरी हवालदिल झाला असताना बारामतीतील शेतकऱ्यांनी सेंद्रिय पद्धतीने भेंडीची लागवड केली. जागतिक बाजारपेठेत विशेषत: युरोपात सेंद्रिय पद्धतीने केलेल्या शेतीमालाला चांगली मागणी असल्याचे विचारात घेऊन शेतकऱ्यांनी भेंडी लागवड केली आणि बारामतीतील या भेंडीला मागणी वाढली आहे. या भेंडीची नुकतीच युरोपीय देशात निर्यात करण्यात आली. करोनाच्या संसर्गामुळे रडकुंडीला आलेल्या शेतकऱ्यांना यामुळे काहीसा दिलासा मिळाला आहे.

गेल्या दोन महिन्यांपासून वाहतूक व्यवस्था ठप्प होती. त्यामुळे अनेक शेतक ऱ्यांनी लागवड केलेल्या शेतीमालाला अपेक्षाएवढा भाव मिळाला नाही. स्थानिक बाजारपेठेत भाजीपाल्याची विक्री करूनही भाजीपाला शिल्लक राहिला. अशा परिस्थितीत काही शेतकऱ्यांवर शेतीमाल शेतात फेकून देण्याची वेळ आली. शहरी भागात भाजीपाल्याला चांगली मागणी असून वाहतूक व्यवस्था आणि र्निबंधामुळे भाजीपाला शहरी भागात पोहोचविण्यात अडचण आली. अवेळी झालेल्या पावसाचा फटका बसल्याने शेतक ऱ्यांसमोर समस्या निर्माण झाली.

बारामतीतील बारामती फार्मर्स प्रोडय़ुसर कंपनीकडून नुकतीच दीड टन भेंडी युरोपात निर्यात करण्यात आली. स्थानिक बाजारात एक किलो भेंडीला १२ रुपये भाव मिळाला होता. युरोपीय राष्ट्रात निर्यात करण्यात आलेल्या एक किलो भेंडीला २५ रुपये असा भाव मिळाला असून करोनाचे संकट असताना युरोपात भेंडी निर्यात करण्यात आल्याने शेतक ऱ्यांना फायदा झाला. याबाबत बारामती फार्मर्स प्रोडय़ुसर कंपनीचे अध्यक्ष प्रल्हाद वरे म्हणाले, भेंडीची निर्यात करण्यास सुरुवातीला काही अडचणी निर्माण झाल्या होत्या. सेंद्रिय पद्धतीने तयार केलेल्या भेंडीला युरोपीय देशातून चांगली मागणी असून आतापर्यंत दीड टन भेंडी निर्यात करण्यात आली आहे. स्थानिक बाजारपेठेपेक्षा दुप्पट दर निर्यातीसाठी पाठविण्यात आलेल्या भेंडीतून मिळाला.

भेंडी निर्यातीसाठी अ‍ॅग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टचे प्रमुख राजेंद्र पवार, मुख्य कार्यकारी अधिकारी नीलेश नलवडे, कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. सय्यद शाकीरअली यांनी विशेष प्रयत्न केले. भाजीपाला गुणवत्ता केंद्राचे यशवंत जगदाळे, तुषार जाधव, गिरिधर खरात यांनी सहकार्य केले, असे वरे यांनी सांगितले.

बारामती फार्मर्स प्रोडय़ुसर कंपनीचे २७ शेतकरी सभासद आहेत. तालुक्यातील मळद आणि निरावागज येथील शेतक ऱ्यांनी वीस एकर क्षेत्रावर सेंद्रिय पद्धतीने भेंडीची लागवड केली. लागवडीसाठी कोणत्याही रासायनिक पदार्थाचा वापर करण्यात आला नाही. दर्जेदार उत्पादनामुळे युरोपातून बारामतीतील भेंडीला मागणी वाढली असून आतापर्यंत दीड टन भेंडी निर्यात करण्यात आली आहे. करोनाचे संकट उभे असताना स्थानिक बाजारात सेंद्रिय पद्धतीने लागवड केलेल्या भेंडीला १२ रुपये किलो असा भाव मिळाला होता. युरोपात पाठविण्यात आलेल्या भेंडीला दुप्पट भाव मिळाल्याने शेतक ऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here