अप्पर पोलीस अधीक्षकांच्या मदतीने गरोदर महिलेस माहेरची उब

प्रतिनिधी । राष्ट्र सह्याद्री

नेवासा फाटा : पोट भरण्यासाठी घरापासून शेकडो किलोमीटर दूर भागात लॉकडाऊन मध्ये फसलेल्या गरीब मजुरासमोर गरोदर पत्नीच्या देखभालीचा उभा राहिलेला यक्ष प्रश्न अप्पर पोलिस अधीक्षक दीपाली काळे यांनी आईच्या मायेने सोडविल्याने या महिलेस माहेरची उब मिळाली आहे. राहाता तालुक्यातील श्रीरामनगर येथे मोलमजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालविणार्‍या धीरज गहिनीनाथ भुते यांनी लॉकडाऊन काळात उपविभागीय पोलीस अधिकार्‍यांकडे एक लेखी विनंती अर्ज केला होता. त्यात त्यांनी त्यांच्या गर्भवती पत्नीचे दिवस भरत आल्याचे नमूद करून तिची या नाजूक काळात योग्य ती काळजी, शुश्रूषा करण्यास घरात दुसरे कोणी नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. पत्नीचे माहेर अमरावती जिल्ह्यात असल्याने तिला तेथे पोहोच केल्यास तिची व्यवस्था राहील असे नमूद करून तिला माहेरी पोहचविण्याची परवानगी मिळण्याचे आर्जव केले होते. ही बाब अहमदनगरच्या कर्तव्यदक्ष समजल्या जाणार्‍या अप्पर पोलीस अधिक्षक दीपाली काळे यांच्या निदर्शनास आली. स्वतः महिला असल्याने त्यांनी दुसर्‍या अडलेल्या महिलेची व्यथा अंतःकरणापासून जाणली. काळे मॅडम यांनी राहत्याचे पोलीस निरीक्षक, तहसील दार, उपविभागीय पोलीस अधिकारी, पोलिस अधीक्षक, जिल्हाधिकारी यांना व्यक्तिशः फोन करून भुते यांना पास मिळवून देण्यासाठी धडपड केली. तसेच जर पास नाही मिळाला तर त्या गरोदर महिलेसोबत एक बाई ठेवा तिचा पगार मी देते, तुम्ही काळजी करू नका असे म्हणत भुते यांना हिम्मत दिली. परतु त्यांच्या प्रयत्नांना यश आले आणि ती महिला सुखरूप आपल्या माहेरी पोहोच झाली तिला एक सुंदर मुलगी झाली असून ती सुखरुप आहे.अप्पर पोलीस अधिक्षक दीपाली काळे मॅडम यांनी आम्हाला खूप सहकार्य केले. ते आम्ही मरेपर्यंत विसरू शकत नाही. त्या आमच्या साठी देव आहेत. जर आम्हाला मदत झाली नसती तर माझ्या पत्नीची देखभाल कोणी केली असती, दीड महिना तिला वेळेवर जेवण कोणी बनवले असते, बाळाला आंघोळ कोणी घातली असती? अशा असंख्य प्रश्नांनी मन ग्रासून गेले होते. पण अप्पर पोलीस अधीक्षक दिपाली काळे मॅडम मुळे आम्हाला खूप मदत झाली. त्या आमच्यासाठी देव माणूस आहेत. धीरज गहिनीनाथ भुते, राहाता

2 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here