कमळेश्वर धानोरा वाळू तस्करी प्रकरणी महसूल विभाग मुग गिळून गप्प

0

प्रतिनिधी । राष्ट्र सह्याद्री

शिरुरकासार  : तालुक्यातील कमळेश्वर धानोरा येथील नदीपात्रात गत सोमवारी मध्यरात्रीच्या दरम्यान बेकायदेशीर वाळू उपसा करणाऱ्या आणि महसूल पथकाला माहिती देणाऱ्या लोकांमध्ये मोठा वाद निर्माण झाला होता.सदरील प्रकार महसूल विभागाचे कर्मचारी आणि पोलिसांसमोर घडल्यानंतर देखील या प्रकाराची कसलीही नोंद झाली नसल्यामुळे या प्रकरणात काही गोलमाल तर नाही ना? असा प्रश्न निर्माण होत आहे.
कमळेश्वर धानोरा आणि पौंडूळ या दोन गावाच्या मध्ये विस्तीर्ण असे नदीपात्र असून या पात्रातून वाळू माफिया रात्री अपरात्री नेहमीच बेकायदेशीर वाळु उपसा करत असतात.सोमवारी मध्यरात्रीच्या दरम्यान एक जेसीबी आणि काही ट्रॅक्टरच्या सहाय्याने असाच उपसा सुरू होता.पौंडूळ येथील एका व्यक्तीने या संदर्भात तहसीलदार यांना माहिती दिली होती.त्यानुसार तहसीलदार यांनी आपल्या पथकाला माहिती देऊन घटनास्थळी जाण्याचे आदेश दिले.सदरील पथक नदीपात्रात गेल्यानंतर वाळू उपसा करणाऱ्या वाळू माफियांनी तेथून पळ काढला.महसूलच्या पथकाला माहिती दिली म्हणून वाळू माफियांनी माहिती देणाऱ्या व्यक्तीला मारहाण केल्याचा प्रकार घडला.या वादाचे पर्यावसन नंतर मोठ्या स्वरूपात झाले आणि दोन गावांत राडा निर्माण झाला.या प्रकरणी पोलिसांनी घटनास्थळी वेळीच धाव घेत हस्तक्षेप केल्यामुळे तणाव निवळला. तालुक्यात गौण खणिजाची मोठ्या प्रमाणावर होत आहे तस्करी तालुक्यात मोठ्या प्रमाणावर गौण खनिज संपत्तीची उघडपणे तस्करी होत असताना महसूल विभागाचे अधिकारी गप्प का राहतात?असा प्रश्न उपस्थित होत असून एरव्ही मुरूम भरून चाललेल्या ट्रॅक्टरवर कारवाईचा बडगा उगारणारे कमळेश्वर नदीपात्रात एवढा मोठा प्रकार घडून देखील गप्प का?अशी चर्चा नागरिक करत आहेत.विषेश म्हणजे गोळीबार केलेल्या आरोपीला पोलिसांनी पकडून गावठी पिस्तूल हस्तगत केल्याची चर्चा आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष घालावे. बेकायदेशीर वाळु उपसा प्रकरणी जिल्हाधिकारी यांनी लक्ष घातले तर बडे मासे गळाला लागण्याची शक्यता नाकारता येत नाही.या पूर्वी सर्व काही सुरळीत चाललेले असताना सोमवारी मध्यरात्री अचानक असे काय घडले?जेणेकरून एवढा मोठा वाद त्या ठिकाणी निर्माण झाला हा प्रश्न अनुत्तरित असून जिल्हाधिकारी यांनी लक्ष घालावे अशी चर्चा नागरिक दबक्या आवाजात करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here