‘हिंदवी स्वराज्य ते हिंदु राष्ट्र’: ऑनलाईन परिसंवादाने शिवराज्याभिषेक दिन साजरा!

0

Rashtra Sahyadri Updates…

छत्रपती शिवाजी महाराज हे खरे ‘चक्रवर्ती सम्राट’च ! – उदय माहुरकर, इतिहास अभ्यासक


मोगलांना ‘सम्राट’, ‘बादशहा’ म्हटले जाते, तर शिवछत्रपतींना महाराष्ट्रापुरते मर्यादित केले जाते, हे दुर्दैवी आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनाचा अभ्यास केल्यास ते 1 हजार वर्षांच्या कालखंडातील एक महान भारतीय व्यक्ती होते, हे लक्षात येते. त्यामुळे शिवाजी महाराज हे केवळ छत्रपती नव्हते, तर खर्‍या अर्थाने ‘चक्रवर्ती सम्राट’च होते, असे गौरवोद्गार माहुरकर राजघराण्याचे वंशज तथा इतिहास अभ्यासक व लेखक श्री. उदय माहुरकर यांनी काढले.

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने 4 जूनला तिथीनुसार झालेल्या ‘शिवराज्याभिषेक दिना’निमित्ताने आयोजित ‘हिंदवी स्वराज्य ते हिंदु राष्ट्र’ या विषयावर ‘ऑनलाईन’ विशेष संवादात ते बोलत होते. या संवादामध्ये प्रसिद्ध लेखक अन् व्याख्याते डॉ. सच्चिदानंद शेवडे यांनी ‘हिंदवी स्वराज्य’ या विषयावर, तर हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. रमेश शिंदे यांनी ‘छत्रपती शिवरायांच्या दृष्टीने हिंदु राष्ट्र’ या विषयावर मार्गदर्शन केले. सनातन संस्थेचे धर्मप्रचारक सद्गुरु नंदकुमार जाधव यांनी प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीला पुष्पहार अर्पण केला. श्री. सुमीत सागवेकर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. ‘फेसबूक’ आणि ‘यू-ट्यूब’ यांच्या माध्यमांतून थेट प्रक्षेपित करण्यात आलेला हा कार्यक्रम 60 हजार लोकांनी प्रत्यक्ष पाहिला, तर 65 हजार लोकांपर्यंत हा कार्यक्रम पोहोचला.

छत्रपती शिवाजी महाराजांचे स्वराज्य सर्वधर्मसमभावी नव्हे, तर ‘हिंदवी’ ! – डॉ. सच्चिदानंद शेवडे

मोगलांच्या अत्याचारांनी पीडित जनतेमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी धर्माभिमान निर्माण केला. धर्माचे रक्षण केले. ‘हिंदवी’ स्वराज्य निर्माण करतांना हिंदु धर्माच्या प्रसारासाठी कोणावर तलवारीने आक्रमण केले नाही. त्यामुळे हिंदूंचे राज्य हे सर्वसमावेशकच असणार; म्हणून त्याला सर्वधर्मसमभावाचे ‘लेबल’ का लावले जात आहे ? छत्रपती शिवाजी महाराजांनी संस्कृतमध्ये राजमुद्रा निर्माण केली. वैदिक पद्धतीने त्यांचा राज्याभिषेक करून घेतला; पण आज सर्वधर्मसमभाववाल्या हिंदूंकडून ‘हिंदवी स्वराज्य’ ही ओळख पुसण्याचा प्रयत्न होत आहे, ते दुर्दैवी आहे, असे प्रतिपादन हिंदुत्वनिष्ठ लेखक अन् व्याख्याते डॉ. सच्चिदानंद शेवडे यांनी केले.

छत्रपती शिवाजी महाराजांचे हिंदवी स्वराज्य हे ‘हिंदु राष्ट्र’च ! – रमेश शिंदे

सीमा असलेल्या भूभागाला ‘देश’ असे म्हटले जाते, तर ‘राष्ट्र’ या संकल्पनेमध्ये त्या प्रदेशाचा इतिहास, भाषा, संस्कृती, कालगणना आदींचाही समावेश होतो. त्या अर्थाने छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केलेले ‘हिंदवी स्वराज्य’ हे ‘हिंदु राष्ट्र’च होते. छत्रपती शिवाजी महाराजांनी संस्कृतमध्ये राजमुद्रा बनवली. राजव्यवहारकोष सिद्ध करून परकीय फारसी शब्दांना हटवले. धर्मांतरितांचे शुद्धीकरण करून त्यांना हिंदु धर्मात परत आणले. मंदिरांची उभारणी करण्याचे आदेश दिले. छत्रपती संभाजीराजे यांच्या काळातील पत्रव्यवहारांचा ‘पत्रसार संग्रह’ प्रसिद्ध आहे. त्यामध्येही ‘हिंदु राज्य’ असा उल्लेख आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संसदेत केलेल्या भाषणामध्ये ‘शिवाजी महाराज त्या काळात हिंदूंच्या स्वातंत्र्यासाठी लढले’, असे म्हटले आहे. असे असतांना 19 व्या शतकातील सेक्युलरवाद 17 व्या शतकातील छत्रपती शिवाजी महाराजांना चिकटवण्याचा अट्टाहास का केला जात आहे ?, असा प्रश्‍नही श्री. शिंदे यांनी विचारला. शेवटी श्री. शिंदे यांनी हिंदूंनी स्वाभिमान जागृत करून हिंदु राष्ट्रासाठी प्रतिदिन किमान 1 घंटा द्यावा, असे आवाहन केले.

6 जूनला ‘हिंदी भाषे’तून ‘छत्रपती शिवाजी महाराजांचे हिंदु राष्ट्र’ या विषयावर ऑनलाईन संवाद !

शिवराज्याभिषेक दिनानिमित्त 4 जून 2020 या दिवशी मराठी भाषेत झालेल्या कार्यक्रमाला चांगला प्रतिसाद मिळाल्यानंतर सदर विषयावर हिंदी भाषेतून कार्यक्रम घेण्याची मागणी शिवप्रेमी आणि राष्ट्रप्रेमी यांच्याकडून करण्यात आली आहे. त्यानुसार पुन्हा 6 जून 2020 या दिवशी सायंकाळी 7 ते 8.30 या वेळेत ‘छत्रपती शिवाजी महाराजांचे हिंदु राष्ट्र’ या विषयावर हिंदी भाषेतील ‘विशेष संवाद’चा ऑनलाईन कार्यक्रम ठेवण्यात आला आहे. या कार्यक्रमाचे प्रक्षेपण फेसबूक लाईव्ह आणि यू-ट्यूब लाईव्ह यांच्या माध्यमांतून होणार आहे. यात मान्यवर वक्ते म्हणून ‘सुदर्शन न्यज’चे अध्यक्ष आणि मुख्य संपादक श्री. सुरेश चव्हाणके, श्रीराम सेनेचे संस्थापक अध्यक्ष श्री. प्रमोद मुतालिक, हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे आणि हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. रमेश शिंदे हे मार्गदर्शन करणार आहेत. तरी लोकांनी या कार्यक्रमाचा अधिकाधिक लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here