जामखेडच्या दहा नगसेवकांचे राजीनामे; नगराध्यक्षही मंगळवारी राजीनामा देणार

विशेष प्रतिनिधी । राष्ट्र सह्याद्री
नगर : जामखेडच्या दहा नगरसेवकांनी आपल्या पदाचे राजीनामा दिल्याने खळबळ उडाली आहे. दरम्यान, नगराध्यक्षांना राजीनामा देण्यास सांगितल्याने दबावासाठी नगरसेवकांनी राजीनामे दिल्याचे सांगितले जाते.
जामखेड नगरपालिकेत भाजपची सत्ता आहे. नगरपालिकेत सत्ता येताच सव्वा सव्वा वर्षे नगराध्यक्षपद वाटून घेण्याचे ठरले. तत्कालीन मंत्री प्रा. राम शिंदे यांनी तशी तडजोड केली. निखील घायतडक यांची नगराध्यक्षपदी निवड करण्यात आली होती. त्यांची मुदत गेल्या फेब्रुवारीत संपली. प्रा. शिंदे यांचा विधानसभेच्या निवडणुकीत पराभव झाल्यानंतर त्यांचे काही काळ दुर्लक्ष झाले आणि नंतर जामखेडमध्ये कोरोनाचे रुग्ण आढळल्याने घायतडक यांचा राजीनामा मागे पडला. विषय समित्यांच्या निवडणुका लांबणीवर पडल्या.
आता प्रा.शिंदे यांनी घायतडक यांना राजीनामा देण्यास सांगितले आहे. ते मंगळवारी राजीनामा देणार आहेत. त्याअगोदरच दहा नगरसेवकांनी आपल्या पदाचे राजीनामे दिले आहेत. तीन महिन्यांपासून घायतडक यांच्यावर राजकीय दबाव आणला जात आसल्याने त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा देण्याचे जाहीर केले. त्यानंतर नगरसेवकांनी हा निर्णय घेतला. माजी नगराध्यक्षा प्रिती विकास राळेभात, नगरसेवक शामीर सय्यद, संदीप गायकवाड, ऋषिकेश बांबरसे, गुलशन अंधारे, लता संदीप गायकवाड, सुरेखा भाऊराव राळेभात, सुमन अशोक राळेभात, मेहरुनिसा शफी कुरेशी, जाकिया आयुब शेख या दहा नगरसेवकांनी आपले राजीनामे घायतडक यांच्याकडे दिले आहेत. या दबावाची प्रा. शिंदे काय दखल घेतात याकडे लक्ष लागले आहे.

2 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here