Shrirampur : शेततळ्यातील २५ हजार माशांचा मृत्यू; विषारी पदार्थ टाकून मासे मारल्याचा अंदाज

तालुक्यातील भेर्डापुरातील प्रकार; अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल

प्रतिनिधी | संदीप आसने
श्रीरामपूर तालुक्यातील भेर्डापूर येथील एका शेततळ्यात सुमारे २५ हजार माशांचा मृत्यू झाला आहे. अज्ञात इसमाने जाणून-बुजून विषारी पदार्थ टाकल्यामुळे हा प्रकार घडल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. यामध्ये सुमारे पाच ते सहा लाख रुपयांचे नुकसान झाले असून शेततळ्यामधील अंदाजे सव्वा कोटी लिटर पाणी दूषित झाले आहे. याबाबत श्रीरामपूर तालुका पोलिसात तक्रार नोंदविण्यात आली आहे.

श्रीरामपूर तालुक्यातील भेर्डापूर येथे निलेश पंडित कवडे व पंडित लक्ष्मण कवडे यांचे गट नंबर ९१/अ मध्ये एक एकर क्षेत्रात शेततळे असून त्यात त्यांनी मत्स्य पालन केले आहे. सहा महिन्यापूर्वी त्यांनी सोयापिनस (कोंबडा) जातीचे २५ हजार मासे या शेततळ्यात सोडले होते. त्याची आजमितीस पूर्ण वाढ झाली होती. मात्र चार-पाच दिवसापूर्वी कवडे हे माशांना खाद्य टाकण्यासाठी शेततळ्यावर गेले असता, मासे मृत होऊन गेलेल्या अवस्थेत त्यांना दिसून आले. त्यानंतर दि.५ जून रोजी तळ्यातील पूर्ण मासे मृत झाले होते. त्यामुळे कवडे यांचे पाच ते सहा लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.
मागील आठवड्यात झालेल्या चक्रीवादळाचा फायदा घेऊन अज्ञात इसमाने शेततळ्यात विषारी पदार्थ टाकून मासे मारल्याचा अंदाज कवडे यांनी वर्तवला असून, याबाबत नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी केली आहे. याबाबत कृषी सहाय्यक बोरसे व तलाठी विकास शिंदे यांनी घटनेचा पंचनामा केला आहे.
दरम्यान, शेततळ्यात माशांचा मृत्यू झाल्यानंतर कवडे यांनी राहुरी मुळाडॅम येथील तज्ज्ञांकडून आपल्या शेततळ्यातील पाण्याची तपासणी करून घेतली. मात्र, शेततळ्यातील पाण्यात कुठलाही दोष नसल्याबाबत जालिंदर कवडे यांनी सांगितले. आता यातील मृतमासे नाशिक येथील लॅबमध्ये तपासणीसाठी पाठविण्यात येणार असल्याचे कवडे यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here