Kopargaon : होंडा शोरूमला आग; लाखोंचे नुकसान

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री 

कोपरगाव – शहरातील गोदावरी पेट्रोल पंपाशेजारी असलेल्या नामवंत समजल्या जाणाऱ्या “श्रद्धा होंडा” या सरोदे मामा यांच्या मालकीच्या शो-रूमला अचानक आज (रविवार दि.7) सकाळी आठच्या सुमारास आग लागली. आगीत अनेक होंडा गाड्या, सौर प्रकल्पासह दुचाकी वाहनाचे सुटे भाग आदिसंह लाखो रुपयांचा माल जळून खाक झाला. दरम्यान, कोपरगाव नगरपरिषद व संजीवनी सहकारी साखर कारखान्याचे अग्निशामक बंब यांनी एक तासात आग नियंत्रणात आणली. सुदैवाने यात कुठलीही जीवित हानी झाली नाही. आग लागण्याचे कारण अद्याप स्पष्ट नाही.

कोपरगाव शहरात येवला रस्त्यावर गोदावरी पेट्रोल पंपाशेजारी होंडा कंपनीचे शो-रुम आहे. कोपरगावात नगरपरिषद व तालुका प्रशासनाने टाळेबंदी घोषित केल्याने काल शनिवारी सर्वत्र दुकाने व व्यापाऱ्यांची संस्थाने बंद होती. आज रविवारचा दिवस असल्याने मालक सरोदे यांनी आपले शोरूम शुक्रवारीच सायंकाळी बंद करून ठेवलेले होते. आज सकाळी मामा सरोदे यांना काही नागरिकांचे भ्रमणध्वनी आले व त्यांनी आपल्या वर्कशॉपला मागील बाजूने धूर निघत असल्याचे कळाले. त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली असता त्यांना वर्क शॉपच्या मागील बाजूने दागिने रौद्र रूप धारण केलेले आढळले. त्यांनी ताबडतोब कोपरगाव नगरपरिषदेला संपर्क करून या दुर्घटनेची खबर देऊन आग नियंत्रक पथकाला पाचारण केले. अग्निशामक दलाने ताबडतोब घटनास्थळी धाव घेत तासाभरात आगीवर नियंत्रण मिळवले. या कामात संजीवनीच्या पथकानेही सहभाग नोंदवला.

दरम्यान, आग नेमकी कशामुळे लागली याबाबत आमच्या प्रतिनिधीने या शोरूमचे मालक सरोदे मामा यांना विचारणा केली असता त्यांनी आगीचे नेमके कारण सांगता येणार नाही. मात्र विद्युत शॉर्टसर्किटने आग लागली असावी असा कयास व्यक्त केला आहे. या आगीत नेमके किती नुकसान झाले असावे या बाबतही त्यांनी आताच काही सांगता येणार नसल्याचे सांगितले आहे. या शोरूम मध्ये मात्र अनेक गाड्या दुरुस्तीसाठी नेहमीच जास्त संख्येने आलेल्या असतात. त्यामुळे हे नुकसान काही लाखात असेल, असा कयास व्यक्त होत आहे.

4 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here