Shrigonda : अशोक खेंडके देणार ‘उपनगराध्यक्ष’ पदाचा राजीनामा

0

बबनदादांचा आपल्यावर विश्वास हेच आयुष्यातील सर्वोच्च पद; खेंडकेंनी प्रसिद्धी पत्राद्वारे जाहीर केली भूमिका 

श्रीगोंदा – शहराचे हृदय समजल्या जाणाऱ्या प्रभाग ६ ने सलग दोन वेळा विजयाचा गुलाल कपाळाला लावला. आमदार बबनराव पाचपुते व सदाशिव पाचपुते यांच्या आशीर्वादाने आपणास अल्पावधीतच उपनगराध्यक्ष पदाची संधी मिळाली. ठरवून दिलेल्या वेळेत आपण स्वतःहून राजीनामा देऊ हा श्रेष्ठींना माझ्यावर विश्वास होता. बबनराव पाचपुते यांचा माझ्यावर असणारा विश्वास हेच माझ्या आयुष्यातील सर्वोच्च पद असल्याचे सांगत आपण उपनगराध्यक्ष पदाचा मंगळवारी (दि.९) राजीनामा देणार असल्याचे अशोक खेंडके यांनी जाहीर केले. 
या संदर्भात जारी केलेल्या प्रसिद्ध पत्रकाद्वारे खेंडके यांनी म्हटले आहे की, “२०१६ च्या पोटनिवडणुकीत व २०१९ च्या पंचवार्षिक निवडणुकीत जनतेचे सहकार्य व नेत्यांचे आशीर्वाद लाभल्याने आपण नगरसेवक झालो. दुसऱ्या टर्म ला विजयी होताच श्रेष्ठींनी आपल्यावर उपनगराध्यक्ष पदाची जबाबदारी टाकली. सामूहिक नेतृत्व घडविण्यासाठी माझ्या सहकाऱ्यांना ही संधी मिळाली पाहिजे. आपल्या भूमिकेमुळे नेत्यांना अडचण होऊ नये. या प्रामाणिक उद्देशाने आपण नियोजित वेळेत राजीनामा देत आहोत. आजपर्यंतच्या सामाजिक व राजकिय जीवनात बबनराव पाचपुते व सदाशिव पाचपुते यांचा शब्द प्रमाण मानणारा मी कार्यकर्ता आहे. राजीनाम्याचा विषय आपण स्वतः काढला. नेत्यांनी या बाबत नगरसेवकांची बैठक घेतली. त्यात आपण हा निर्णय जाहीर केला.”
दीड वर्षे शहराचे द्वितीय नागरिक म्हणून काम करण्याची संधी मिळाली. अनेक किचकट विषय यशस्वी रित्या हाताळत सामान्य नागरिकांच्या प्रश्नांना या पदाच्या माध्यमातून आपण न्याय देऊ शकलो याचे समाधान आहे. आगामी काळात बबनराव पाचपुते व सदाशिव पाचपुते यांच्या मार्गदर्शनाखाली शहराच्या विकासात्मक कार्यात हिरीरीने सहभागी राहणार आहे. या कार्यकाळात विकासात्मक कामे करत असताना, नगराध्यक्ष, गटनेते व सर्व नगरसेवक यांचे मोलाचे सहकार्य लाभल्याचे खेंडके यांनी म्हटले आहे.
कार्यकर्त्यांचा नेता पाचपुतेच घडवू शकतात..
श्रीगोंदा तालुक्यात व विशेष करून शहरात सामान्य कार्यकर्त्यांंना नेता करण्याची ताकद ही केवळ बबनराव पाचपुते यांच्याकडेच आहे हे त्यानी वेळोवेळी दाखवून दिले. अनेकांना प्रशासनातील मोठ्या पदावर त्यांनी बसवले. यातून काही वाईट अनुभव देखील आले. आपणास ज्यावेळी उपनगराध्यक्ष पद मिळाले त्याच वेळी नेत्यांना अडचण होईल, असं कृत्य करायचं नाही ही हे ठरवले होते. माझ्यावर श्रेष्ठींचा जो विश्वास होता त्यास तडा जाऊन दिला नाही.
– अशोक खेंडके (उपनगराध्यक्ष श्रीगोंदा नगरपरिषद) 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here