Natural Disaster: कोल्हापूरकर धावले काेकणवासियांच्या मदतीला..!

0

सुतार, प्लंबर, फॅब्रिकेटर्स, गवंडी यासह सुमारे शंभर व्यक्तींची टीम काेकणात रवाना

अनिल पाटील । राष्ट्र सह्याद्री

कोल्हापूरः

निसर्ग वादळामुळे अलिबागसह कोकण किनाऱ्याला बसलेल्या तडाख्यातून तेथील नागरिकांना सावरण्यासाठी कणेरीमठावरील टीम आज रवाना झाली आहे. सुतार, प्लंबर, फॅब्रिकेटर्स, गवंडी यासह सुमारे शंभर व्यक्तींची टीम रवाना झाली आहे. हॉटेलमालक संघाचे अध्यक्ष उज्ज्वल नागेशकर या सर्वांचे नेतृत्व करीत आहेत.
निसर्ग वादळामुळे कोकण किनारपट्टीला मोठा फटका बसला. तेथील अनेक घरांचे पत्रे उडून गेले आहेत. अनेक घरांची पडझड झाली आहे. काहींना स्थलांतरित केले आहे, तर काहींना उभारण्यासाठी मदतीची आवश्‍यकता आहे. नेमकी हीच स्थिती ओळखून कणेरी मठावरील सिद्धगिरी स्वामींनी आवाहन केले होते.त्यानुसार दापोली, खेड, मसळा, श्रीवर्धन, दिवेघर या भागातील नागरिकांच्या मदतीला व्यक्ती, सिमेंटचा ट्रक, पत्र्यांच्या शीटचा ट्रक, एक ट्रक लोखंडी ॲन्गल आणि काही इतर संसारोपयोगी साहित्यही पाठविले आहे.
केवळ साहित्य पाठवून नव्हे तर घराचे छप्पर दुरुस्त करण्यासाठी १० वेल्डर, दहा सुतार, काही गवंडी, यांच्या मदतीला सुमारे शंभर जणांची टीम पाठवली आहे. याचबरोबर स्थानिक रोज शंभर व्यक्ती या टीमच्या मदतीला येणार आहेत, असे नियोजन केले आहे. उज्ज्वल नागेशकर यांच्या पुढाकारातून दोन टीमद्वारे हे सर्व साहित्य दापोलीत पोचविले जात आहे. सध्या त्या परिसरात दापोली, खेड, चिपळूण येथील नागरिकांना पत्रे, सिमेंटसुद्धा मिळत नाही. तेथील वीजपुरवठा खंडित आहे. त्यासाठी मेनबत्तीसुद्धा नाही. सुमारे चाळीस हजार व्यक्ती अंधारात आहेत. किमान सहा-सात तेथे वीजपुरवठा होणार नाही. त्यामुळे मेणबत्त्यांसह इतर साहित्य पुरविले जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here