Editorial : कोरोना विस्फोटाच्या वाटेवर

राष्ट्र सह्याद्री 8 जून

टाळेबंदी उठविल्यानंतर जगात कोरोनाचा विळखा अधिक घट्ट होताना दिसतो आहे. जगात आतापर्यंत ६९ लाख ७३ हजार २४७ जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. या महामारीने चार लाख दोन हजार ६९ जणांचे बळी घेतले आहेत. भारतातही गेल्या काही दिवसांत दररोज नऊ हजारांहून अधिक रुग्ण वाढत होते. शनिवारी दहा हजारांहून अधिक रुग्ण वाढले. कोरोनामुक्त होण्याचे प्रमाण वाढले असले, तरी मृत्यूंची संख्याही कमी होत नाही, ही चिंतेची बाब आहे. मृत्यूचे सरासरी प्रमाण, रुग्णांचे सरासरी प्रमाण सांगून आपण पाठ थोपटून घेत असलो, तरी जागतिक आरोग्य संघटनांसह अन्य संघटनांनी दिलेल्या इशा-याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही.

सर्वाधिक कोरोनाबाधितांच्या यादीत अमेरिका जगात अव्वल स्थानावर असून भारत या यादीत सहाव्या स्थानावर आहे. भारताच्या आधी या यादीत ब्राझील, रशिया, स्पेन आणि यूके या देशांचा समावेश आहे. भारतातील एकूण रुग्णांची संख्या दोन लाख ४६ हजार ६२२ इतकी झाली असून भारत हा आता जगातील सर्वाधिक रुग्णसंख्या असलेल्या क्रमवारीत इटलीला मागे टाकत सहाव्या क्रमांकावर पोहोचला आहे. कोरोनाचे उगमस्थान असलेल्या चीनच्या रुग्णसंख्येपेक्षाही भारतातील रुग्णसंख्या अधिक आहे. त्यातही महाराष्ट्रातील रुग्णसंख्या ८२ हजारांहून अधिक झाली असून तो काही राष्ट्रांना मागे टाकण्याच्या तयारीत आहे. अर्थात ही भूषणावह बाब नाही.

भारतात आतापर्यंत कोरोना संसर्गाचा विस्फोट झाला नसला, तरी तो होण्याची जोखीम कायम आहे. टाळेबंदी पूर्णतः  उठवण्यात आल्यानंतर रुग्णांची संख्या वाढू शकते, असे जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे. कोरोनाचे रुग्ण दुप्पट होण्याचा वेग भारतात आता तीन आठवडे आहे. याचा अर्थ ही वाढ घातांकी नसली, तरी ती कमी झालेली नाही. शिवाय कोरोनामुक्त होण्याचे प्रमाण काहीसे घटले असल्याने चिंता आणखी वाढली आहे. टाळेबंदीच्या पाचव्या टप्प्यामध्ये आजपासून बहुतांश व्यवहार सुरू होत असल्याने कोरोनाच्या रुग्णांत वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. व्यवसायांचा वेग वाढवताना कोरोनाचा वेग मात्र कमी केला पाहिजे. त्यातला सुवर्णमध्य साधता आला पाहिजे.

कोरोना बाधितांची संख्या एक लाखांहून दोन लाखांपर्यंत जाण्यास फार कमी वेळ लागला, हे लक्षात घेतले, तर आणखी पाच-सहा दिवसांत ती तीन लाखांवर जाण्याची शक्यता आहे. मृत्यूंची संख्याही दहा हजारांहून अधिक होईल. पुढच्या दीड महिन्यात कोरोनाचा संसर्ग वाढतच जाईल. टाळेबंदी उठल्यानंतर लोक बाहेर पडल्याने कोरोनाग्रस्तांची संख्या वाढते आहे, हे सांगण्यासाठी कुणा तज्ज्ञांची गरज नाही.

लोकांनी खबरदारी घेतली, तर संसर्गाचा धोका कमी होऊ शकतो; परंतु लोकांना कोरोनाचे गांभीर्य अजून लक्षात आलेले नाही. खरेदी करताना सामाजिक अंतर पथ्थ्याचे पालन न करणे, मुखपट्टीचा वापर न करणे, रस्त्यावरच थुंकणे, स्वच्छतेचा अभाव आदी अनेक कारणे त्यासाठी आहेत. वैयक्तिक आणि सार्वजनिक अशा दोन्ही स्वच्छतांकडे भारतीयांचे कमालीचे दुर्लक्ष असल्यने कोरोनाचा प्रसार वेगाने होत आहे. दिल्ली, मुंबईसारख्या शहरांबरोबरच ग्रामीण भागातही आता कोरोनाचा प्रसार होत आहे. कोरोनाचे रुग्ण वेगाने वाढणा-या मोठ्या शहरांमध्ये लोकसंख्येची घनता जास्त आहे.

अर्थव्यवस्था पूर्वपदावर आणण्याच्या प्रयत्नांत कोरोनाच्या वाढीकडे दुर्लक्ष होता कामा नये. केंद्र आणि राज्य सरकारे आपआपल्या परीने प्रयत्नांची पराकाष्ठा करीत असताना त्याला नागरिकांचेही तितकेच सहकार्य अपेक्षित आहे. संसर्गजन्य रोगांच्या बाबतीत काळजी घेतली नाही, तर त्याचा इतरांना प्रादुर्भाव होत असतो, याचे किमान भान बाळगणे आवश्यक आहे. टाळेबंदी हटविल्यानंतर दाट लोकवस्तीच्या भागात कोरोनांचे प्रमाण वाढल्याचे दिसते. ग्रामीण भागत ते असले, तरी त्या तुलनेत शहरी भागांत ते चिंताजनक आहे. एकट्या मुंबईचा रुग्णसंख्येतील वाटा वीस टक्कयांहून अधिक आहे. निर्बंध उठविल्यानंतर दाट लोकवस्ती असलेल्या भागात संक्रमणाचा धोका आणखी वाढू शकतो. अशा भागात अनियोजित विकासामुळे अस्वच्छता, घाणीचे प्रमाण जास्त आहे. आपली सर्व मोठी शहरे दाट वस्तीत आहेत.

अशा शहरांमध्ये संसर्गजन्य रोगाचा प्रादुर्भाव होण्याचा धोका जास्त असतो. टाळेबंदीच्या पहिल्या दोन टप्प्यांत स्थलांतरितांना घरी जाण्याची परवानगी दिली असती, तर रुग्णसंख्या एवढी वाढली नसती. साथरोगतज्ज्ञांनीच हा अहवाल सरकारला दिला आहे. रुग्णसंख्या वाढल्याच्या तिस-या आणि चाैथ्या टप्प्यांत स्थलांतरितांचा धीर सुटल्याने ते बाहेर पडले. त्यांच्या संतापामुळे सरकारलाही त्यांच्या घरी जाण्याची व्यवस्था करावी लागली. लोक जसजसे बाहेर पडण्याचे प्रमाण वाढले, तसे कोरोनाबाधितांची संख्या वाढत गेली. शिवाय सुरुवातीच्या टप्प्यात चाचण्या करणा-या प्रयोगशाळांची संख्या कमी होती. चाचण्याही कमी होत्या. आता चाचण्या वाढल्यामुळे रुग्णसंख्या वाढत असल्याचे दिसते. कोरोनाचे वाढते रुग्ण चिंताजनक आहेत; परंतु अनपेक्षित नाहीत. इतर देशांमध्येही असेच झाले आहे. कोरोना संसर्गाच्या भीतीने जगणे सोडता येत नाही. तसेच घरात बसून चूलही पेटणार नाही. इतर देशांच्या तुलनेत दारिद्र्यरेषेखालील नागरिकांचे प्रमाण जास्त आहे. त्यामुळे त्यांच्या घरात चूल पेटली नाही, तर त्यांच्या हाता-तोंडाची गाठ पडणार नाही.

कोरोनाचे संकट इतक्यात संपणारे नाही. कुणी कितीही दावे करीत असले, तरी तज्ज्ञांनी सांगितल्याप्रमाणे आपल्याला कोरोनासोबत जगावे लागणार आहे. त्यामुळे स्वतःची काळजी घेण्याबरोबरच इतरांना आपल्यामुळे संसर्ग होणार नाही, एवढे पाहिले, तरी कोरोनाला आपण हरवू शकतो. रुग्णांच्या वाढत्या संख्येची भीती बाळगून उपयोग नाही, तर ती पुढे आणखी वाढणार कशी नाही, यावर भर देण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी चाचण्यांची संख्या वाढविणे, तातडीने उपचार करणे, विलगीकरणाचे नियम काटेकोरपणे पाळणे आवश्यक आहे.

अमेरिकेत स्क्रीनिंगची संख्या सर्वाधिक असल्याने तिथल्या रूग्णांची संख्याही जास्त आहे. आपल्यालाही स्क्रीनिंगची संख्या वाढवावी लागेल. भारतासारख्या मोठ्या लोकसंख्येच्या आणि आरोग्याच्या पायाभूत सुविधा कमी असलेल्या देशात ज्यांना संसर्ग होण्याची चिन्हे आहेत किंवा ज्यांना संसर्ग झाल्याचा संशय आहे, अशा लोकांचीच तपासणी केली जाऊ शकते. काही आरोग्यतज्ज्ञांनी असा निष्कर्ष काढला आहे, की कोरोना संसर्ग समुदाय पातळीवर पोहोचला आहे. अशा काळात देश आणि राज्ये टाळेबंदीचे नियम शिथिल करायला लागली आहेत. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग वाढण्याचा धोका आहे. दुसरीकडे काही राज्ये इतर राज्यांतील नागरिकांच्या येण्याजाण्यावर बंदी घालत आहेत. त्याचा परिणाम उद्योगक्षेत्रावर आणि व्यापार, उदीमावर होत आहे. दिल्ली-एनसीआरमधील लोकांच्या हालचालींवर मर्यादा आल्या आहेत.

दिल्ली सरकार कधी आंदोलनावर नियंत्रण ठेवते, तर कधी उत्तर प्रदेश तर कधी हरयाणा सरकार. त्यामुळे अनागोंदीचे वातावरण निर्माण झाले. सर्वोच्च न्यायालयाने तीन राज्यांना चळवळीच्या बाबतीत एकसमान धोरण ठरविण्याचे निर्देश दिले आणि तसेच तेथील रहिवाशांनाही समान पास देण्यात यावा, असे सांगितले. कोणत्याही राज्याला इतर राज्यांतील लोकांच्या हालचालींवर बंदी घालण्याचा किंवा ते कुठले रहिवासी आहेत, यावर त्यांची चौकशी करण्याचा अधिकार असू नये, असा एक मतप्रवाह आहे. कुठल्याही रुग्णालयाने तो रुग्ण कोणत्या राज्यातला आहे, हे न पाहता त्याच्यावर उपचार करण्याची आवश्यकता आहे. कोरोनाने एकूणच देशाच्या आरोग्यव्यवस्थेची लक्तरे वेशीवर टांगली गेली. देशाच्या सकल उत्पन्नाच्या चार टक्के रक्कम आरोग्यसेवेवर खर्च केली पाहिजे; परंतु तसे होत नाही. गरीबांसाठी दर्जेदार आरोग्यसेवा असली पाहिजे, हे कोरोनाच्या संकटातून ध्यानात घेऊन आरोग्य सेवेत मूलभूत आणि पायाभूत सुविधा निर्माण केल्या पाहिजेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here