मुंबई : महाराष्ट्रात यापूर्वी 15 जून पासून शाळा सुरू करण्यावर विचार सुरू होता; परंतु आता शाळा सुरू करण्याऐवजी केवळ अभ्यासक्रम सुरू केला जाणार आहे. दरम्यान, ऑगस्ट महिन्यापासून वर्ग सुरू होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. महाराष्ट्रात 15 जून आणि 26 जून रोजी (विदर्भ क्षेत्रासाठी) तसेच हरित क्षेत्रामध्येही शाळा सुरू होणार नसल्याची माहिती शिक्षण विभागातील एका अधिकार्याने दिली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ऑफलाइन आणि ऑनलाइन पद्धतीने शाळा जून महिन्यापासून सुरू होणार असल्याचे म्हटले होते. तसेच राज्यातील ऑनलाइन शिक्षण पद्धतीवरही भर देण्याची गरज असल्याचे मंत्र्यांनीदेखील सांगितले होते. सध्या गुगल क्लासरूम वापरली जाऊ शकते. तसेच येत्या काळात स्वतंत्र संगणकाधारित प्रणाली विकसित केली जावी, असेही ते म्हणाले. शालेय शिक्षण विभागाला विनामूल्य ऑनलाइन वर्गांची सेवा उपलब्ध करून देण्यासाठी गुगल तयार आहे.
