Parali : दोघी बहिणींसह चुलत भावाचा खदानीत बुडून मृत्यू

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री 

परळी – येथील औष्णिक विद्यूत केंद्राच्या बाजूला असलेल्या खदानीत बुडून दोन बहिणींसह एका लहान मुलाचा मृत्यू झाला. आज सोमवारी (दि.8) सकाळी ही घटना घडली.

सुरेखा राजाराम दांडेकर (वय 15), रेखा राजाराम दांडेकर (वय 13) रोहित नारायण दांडेकर (वय 08), अशी या मयत झालेल्या भावंडांची नावे आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, परळी येथील औष्णिक विद्यूत केंद्राच्या बाजूला खदान आहे. यामध्ये मोठ्या प्रमाणात खोलवर पाणी आहे. या खदानी जवळ सकाळी सुरेखा व रेखा या दोघी बहिणी खेळत होत्या. यावेळी त्यांना एक लहान मुलगा पाण्यात बुडत असल्याचे दिसला.

दोघी बहिणी तात्काळ त्याला वाचवण्यासाठी पुढे सरसावल्या. मात्र त्याला वाचविताना दोघींचाही तोल जाऊन मुलासह पाण्यात बुडून मृत्यू झाला. ही बातमी तेथील स्थानिकांना समजल्यानंतर तिघांचे मृतदेह पाण्याबाहेर काढण्यात आले. त्यावेळी पाण्यात बुडत असलेला मुलगा या रेखा व सुरेखा यांचा चुलत भाऊ असल्याचे समोर आले.

दांडेकर कुटुंब मूळचे नांदेडचे असून आपली उपजीविका भागविण्यासाठी नांदेड येथून परळीला आल्याची माहिती समजते. दरम्यान, तीन्ही भावंडाचा असा एकत्रित मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. स्थानिक पोलीस घटनेचा अधिक तपास करीत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here