Karjat : राशीनकरांनी जिंकली कोरोना लढाई, राशीन येथील सर्व कोरोनाबाधीत यशस्वी उपचार घेत घरी परतले

0

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री दि ८

कर्जत : राशीन येथील सर्व कोरोना बाधित व्यक्ती आपले उपचार पूर्ण करीत गावी परतल्याने राशीनकरांना मोठा दिलासा मिळाला आहे. कोरोनावर मात करीत आलेल्या सर्व रुग्णांना अहमदनगर जिल्हा उपरुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ संदीप पुंड यांनी दिली आहे. पुढील काळात कर्जत तालुक्यातील सर्वसामान्य नागरिकांनी सर्व सोशल डिस्टन्सचे नियम पाळून प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन प्रांताधिकारी अर्चना नष्टे यांनी केले आहे.

दि २१ मे रोजी राशीन (ता.कर्जत) येथे आपल्या सुनेकडे आलेल्या मूळच्या मुंबई वाशी येथील ६५ वर्षीय महिलेचा कोरोनाने नगरला उपचारासाठी नेत असताना वाटेतच मृत्यू झाला होता. आणि मागील अनेक दिवसांपासून कोरोनामुक्त असलेला कर्जतमध्ये कोरोनाचा शिरकाव झाला. कोरोनाचा कर्जत तालुक्यात प्रवेश झाल्याने स्थानिक तालुका प्रशासनाने सतर्क होत आपल्या सर्व यंत्रणा कार्यान्वित केल्या. कोरोना बाधित रुग्णाचा असलेला परिसर प्रतिबंधित करत नागरिकांना सहकार्य करण्याचे आवाहन केले. त्या घटनेनंतर राशीनकराच्या मागे कोरोनाने पिच्छाच पुरविला.
मुबंई येथील मृत महिलेचा सहा वर्षाच्या नातीला संपर्क झाल्याने तिचा अहवाल सुद्धा पॉझिटिव्ह निघाला. यानंतर आपल्या पुणे येथील पत्नीला स्थानिक प्रशासनाची कोणतीही पूर्व परवानगी न घेता बेकायदेशीररित्या भेटावयास गेलेल्या ५३ वर्षीय व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह निघाली. याच व्यक्तीच्या संपर्कात असणाऱ्या निकटवर्तीय चार व्यक्तीचा अहवाल सुद्धा अहवाल पॉझिटिव्ह निघाल्याने राशीनकर मोठ्या अडचणीत सापडले. अवघ्या पंधरा दिवसात राशीन येथे तब्बल सात कोरोना बाधित सापडल्याने नागरीक भयभीत झाले होते. सुनेकडे आलेल्या मुंबई येथील वृद्धेचा दुर्दैवी मृत्यू सोडता आज रोजी राशीन येथील सर्व कोरोना बाधित व्यक्ती यांनी कोरोनावर मात करीत आपल्या घरी सुखरूप पोहोचले असल्याने राशीन कोरोनामुक्त झाले आहे.

कोरोना रोगावर मात करीत आलेल्या सर्वाचे कर्जत तालुका आरोग्य विभागाच्या वतीने स्वागत करण्यात येत आहे. मात्र, कोरोनाची लढाई येथेच संपली नसून नागरिकांनी सतर्क राहणे गरजेचे आहे, अशी प्रतिक्रिया तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संदीप पूंड यांनी दिली आहे. सर्वसामान्य जीवन जगत असताना सोशल डिस्टन्स, कायमस्वरूपी मास्क बांधणे यासह प्रशासनाने दिलेले नियम पुरेपूर वापरत नागरिकांनी आपले जीवनावश्यक कार्य पार पाडावे, असे आवाहन डॉ. पुंड यांनी केले आहे.
सध्या परिस्थितीत कर्जत तालुक्यात कोरोनाचा एकही ऍक्टिव्ह रुग्ण नसला तरी कोरोना विरुद्ध लढाई संपली नसून नागरिकांनी मास्क वापरणे ,सोशल डिस्टन्सचे पालन करणे अनिवार्य आहे. अत्यावश्यक कारणाशिवाय घराबाहेर न पडणे यासह सर्व प्रशासनाने ठरवून दिलेल्या सर्व बाबींचे काटेकोर पालन करून आपले व आपल्या आजूबाजूच्या सर्व व्यक्तींच्या आरोग्याची काळजी घेण्यास प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन प्रांताधिकारी अर्चना नष्टे यांनी केले आहे.         

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here