27 हजार विद्यार्थी गिरवणार डिजिटल धडे!

आ. रोहित पवार यांचा उपक्रम; खासगी कंपन्यांची मदत

विशेष प्रतिनिधी । राष्ट्र सह्याद्री
नगर : राज्यात खासगी शाळांनी ऑनलाईन अभ्यासक्रम सुरू केला असतानाच सरकारी शाळांसाठी काय, हा प्रश्न विचारला जात आहे. कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीवर मात करण्यासाठी राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी खासगी कंपन्यांच्या मदतीने आपल्या मतदार संघात नवा उपक्रम सुरू केला आहे. त्याचा 458 शाळांना आणि त्यात शिक्षण घेणार्‍या 27 हजार विद्यार्थ्यांना फायदा होणार आहे. पवार यांच्या पुढाकारातून व झोहो कार्पोरेशनच्या माध्यमातून कर्जत-जामखेड या दोन तालुक्यातील पहिली ते सातवीपर्यंतच्या 27 हजार विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाचे नवे पर्व सुरू झाले आहे.

विद्यार्थी हितासाठी झोहो वर्गाची निर्मिती
या दोन तालुक्यातील मुले मागे राहणार नाहीत व पायाभूत शिक्षणाबाबत नेहमी अग्रेसर राहतील, याच दृष्टीने झोहो वर्गाची निर्मिती झाली आहे. ग्रामीण भागात मोबाईल व नेटवर्कच्या अडचणी असतील; मात्र त्यातूनही मार्ग काढावा लागेल. येत्या काळात त्यावरही पर्याय शोधण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
– आ. रोहित पवार

आता जामखेड व कर्जत तालुक्यातील विद्यार्थी डिजिटल अभ्यासक्रम शिकणार आहेत. खासगी शाळांप्रमाणेच अधुनिक पद्धतीने येथील शिक्षक मोबाईलवर वर्ग चालवतील अन् मुलांच्या हजेरीपासून धडा गिरविण्यापर्यंत व गृहपाठापासून ते अगदी परीक्षेपर्यंत सारे काही शाळेसारखेच घडेल, असा हा उपक्रम आहे. पवार यांच्या संकल्पनेतून कर्जत-जामखेडमध्ये सुरू केलेल्या डिजिटल शाळांचे ऑनलाईन उद्घाटन शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी केले. त्यांनी हा उपक्रम राज्यात राबविण्यासारखा असल्याचे सांगून कौतुक केले.
या वेळी झालेल्या वेबिनारमध्ये आमदार पवार यांच्यासह रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ.अनिल पाटील, शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी, झोहो कार्पोरेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीधर वेंबू, संचालक देव आनंद, नगरचे जिल्हा परीषद अध्यक्ष, उपाघ्यक्ष व पदाधिकारी यांच्यासह कर्जत-जामखेड तालुक्यातील निवडक शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक, विद्यार्थी व पालक सहभागी झाले होते. पालकांच्या मोबाईलची शाळेतील संबंधित वर्गाच्या शिक्षकांकडे नोंदणी करून त्या मुलाचा वर्ग सुरू होईल. शिक्षक त्या वर्गाचे म्हणजे ग्रुपचे अ‍ॅडमिन असतील आणि हे शिक्षक त्या वर्गातील मुलांना दररोज सकाळी अभ्यासक्रम पाठवतील. त्या अभ्यासक्रमानंतर दिलेला गृहपाठ दुसर्‍या दिवशी तपासतील. ठरलेल्या दिवशी त्याची परीक्षादेखील घेऊ शकतील अशा प्रकारची ही नवी संकल्पना आहे. राज्यातला हा पहिलाच उपक्रम असून तो इतरत्र राबवण्याची मागणी आहे.

2 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here