जलसंधारणाच्या कामासाठी मनरेगाचा उपयोग करा

3

कृषी व मृद विभागाचे सचिव डवले यांचे आवाहन

लवकरच आदेश काढू…
जलसाक्षरतेचे काम करणार्‍या जलप्रेमी, जलदूत,जलसेवक यांना तालुका आणि ग्रामपंचायत स्थानिक स्तरावर प्रशासकीय यंत्रणेचे सहकार्य लाभावे यासाठी त्यांना वेगवेगळ्या बैठकांना बोलावणे व सहभागी करून घ्यावे या बाबत मी लवकरच आदेश काढेन.
-एकनाथ डवले
सचिव,कृषि व जलसंधारण विभाग

प्रतिनिधी । राष्ट्र सह्याद्री
नेवासा : कोरोनामुळे शहरीभागातून ग्रामीण भागाकडे मोठे स्थलांतर झालेले आहे.स्थलांतरित लोकांच्या रोजगाराचा मोठा प्रश्न निर्माण झाला होता.परंतु आपल्या यंत्रणेने चांगले काम करून दरदिवशी साडे सात लाख लोकांना रोजगार हमी योजनेतुन कामे उपलब्ध करून दिली.रोजगार हमीतून जलसंधारणाची जास्तीत जास्त कामे व्हावीत असे नियोजन असणार आहे. गाव पातळीवर जलसंधारणाच्या शाश्वत कामासाठी मनरेगाचा जास्तीत जास्त उपयोग करून घ्यावा असे आवाहन राज्याचे कृषी व मृद-जलसंधारण विभागाचे सचिव एकनाथ डवले यांनी केले.
महाराष्ट्र शासन जलसंपदा विभाग व जलसाक्षरता केंद्र यशदा,पुणे यांचे संयुक्त विद्यमाने आयोजित जलसाक्षरतेच्या माध्यमातून शाश्वत ग्राम विकास-महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजना व आपला गाव आपला विकास या विषयावर दि.7 व 8 जून या दोन दिवसीय ऑनलाइन वेबिनार ई-कार्यशाळेचे शुभारंभ प्रसंगी सहभागी प्रशिक्षणार्थींना मार्गदर्शन करतांना श्री.डवले बोलत होते. डवले पुढे म्हणाले, जलसाक्षरता केंद्राचे जलनायक, जलयोद्धा, जलप्रेमी, जलदूत, जलसेवक हे गावपातळीवर कोणताही मोबदला न घेता स्वयंस्फूर्तीने काम करत आहेत. गावामध्ये पाण्याचा ताळेबंद मांडताना गावात किती पाऊस पडला,किती पाणी उपलब्ध आहे, किती पाणी वापरले जाते आणि किती पाण्याची आपल्याला गरज आहे याची वस्तुस्थिती मांडून त्यानुसार पुढचे धोरण ठरवावे. गावाच्या शिवारात पुरेसे पाणी उपलब्ध नसेल आणि वेगवेगळी पिके घेतली तर मोठी अडचण निर्माण होते. जलयुक्त शिवार किंवा पाणलोट क्षेत्र विकासाच्या माध्यमातून पाणी उपलब्ध केले तरी प्रचलीत पिकांच्या अनुषंगाने लागणार पाणी आपण गावातच उपलब्ध करू शकतो का ? पिकांची पाण्याची गरज भागवू शकतो का? हा खरा प्रश्न आहे.जलसंधारण कामात आतापर्यंत आपण पुरवठा या बाजूकडेच लक्ष देत होतो.आता मागणीच्या बाजूकडे लक्ष देण्याची गरज आहे. मागणी आणि पुरवठा याची सांगड घालून जलसंधारणाची कामे व पाण्याचा ताळेबंद करणार आहोत. मग तो पाण्याचा ताळेबंद ग्रामसभेत मांडल्यास सर्व मान्य होईल. लोकांनी काम मागितल्यावर काम देण्यापेक्षा लोकांनी न मागताच कामे काढली पाहिजेत.जलसंधारणाची कामे,सार्वजनिक पाणलोट विकासाची कामे व वैयक्तिक शेतीची कामे या साठी रोजगार हमीतून मागेल त्याला काम दिले जाईल.ग्रामीण भागात रोजगार हमी योजनेच्या माध्यमातूनच सकारात्मक बदल घडविला जाऊ शकतो असा आशावाद ही श्री.डवले यांनी व्यक्त केला.
प्रारंभी जलसाक्षरता केंद्राचे कार्यकारी संचालक डॉ.सुमंत पांडे यांनी जलसाक्षरता केंद्राचे आज पर्यंतच्या कामकाजाचा आढावा सादर करून या कार्यशाळेचा उद्देश विषद केला.
जलसाक्षरता केंद्राचे संचालक आंनद पुसावळे यांनी जलक्षेत्रातील आव्हाने आणि जलसाक्षरता या विषयावर, भूगर्भ विज्ञान शास्रज्ञ डॉ.श्रीनिवास वडगबाळकर यांनी ग्रामपाणलोटाचा पाण्याचा ताळेबंद कसा काढावा याविषयावर तर सौ.आश्विनी कुलकर्णी व संगीता जाधव यांनी महात्मा गांधी रोजगार हमी योजना-अंमलबजावणी, नियोजन व अडचणींवर उपाय योजना या विषयावर मार्गदर्शन केले. या ई-कार्यशाळेत राज्यभरातून 850 हुन अधिक लोकांनी सहभाग घेतला.

3 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here