!!भास्करायण १८!!
केला तुका,झाला माका,पुन्हा टक्का!


Rashtra Sahyadri Article


स्व.राजीवगांधी पंतप्रधान असताना त्यांनी “सरकारने एक रुपया विकासासाठी दिला तर त्यातले दहाच पैसे गावापर्यन्त पोहचतात.उर्वरित पैसे मधल्यामध्ये हडपले जातात,”असे जाहिर विधान केले. यावर उपाययोजना म्हणून त्यांनी गावाला थेट निधी देण्याचा अत्यंत क्रांतीकारी आणि स्तुत्य निर्णय घेतला. राजीव गांधी यांच्यामुळे गावाला थेट पैसा मिळू लागला. यात अट अशी की, गावात जी कामे करावयाची त्यास ग्रामसभेची मान्यता आवश्यक असेल. याचप्रमाणे शासकीय योजनांचे लाभार्थी देखिल ग्रामसभेत निश्चित करण्यात यावे.


यामागे गैरप्रकार व भ्रष्टाचाराला आळा बसावा. ग्रामपंचायतीचा कारभार हा पारदर्शक व्हावा.तसेच ग्रामविकास कामात आधिकारी जो अडसर आणून भ्रष्टाचार करतात त्यास प्रतिबंध व्हावा. शंभर टक्के पैसा ग्रामपंचायतींना मिळून गावाचा विकास व्हावा.
असा उदात्त हेतू होता.


पूर्वी केंद्राकडून सुटलेल्या निधीला मध्येच पाय फुटायचे आणि गावापर्यन्त कवडीरेवडी पोचायची. या उरल्या सुरल्या माते-यावर काय असतील, ती थातुरमातूर कामे व्हायची. गाव कारभा-यांकडे आधिकार नसल्याने उघड्या डोळ्यांनी हे कारस्थान बघावे लागायचे. गावाच्या सरपंचाला ग्रामसेवक ‘भाऊसाहेबां’मार्फत हाताशी धरायचे. सगळा व्यवहार कवाड आणि कपाटबंद! सरपंच मॕनेज्ड असल्याने तेरी भी चूप मेरी भी चूप! आसला सगळा प्रकार होता. हे घडू नये याकरिता राजीव गांधी यांनी गावाला थेट निधी देण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार ग्रामपंचायतींना शासनाकडून विना अडथळा लोकसंख्येच्या प्रमाणात निधी येवू लागला.
तेव्हा वाटले होते की, आता मधल्यामध्ये भ्रष्टाचाराचं पाणी मुरणार नाही. सगळा पैसा थेट गावाला मिळेल आणि गावकरी ग्रामसभेत कामे मंजूर करतील. राव न करी ते गाव करी यानुसार गावात विकास कामे होतील. या विकासकामांमुळे ग्रामोध्दार होईल. गावांचा कायापालट होईल. अशा आशेवर गाव आणि गावकरी होते. प्रत्यक्षात असे काही झाले नाही. भलतेच लफडे आणि गफले होवू लागले. गावाचे स्वप्न भग्न पावले!
केन्द्र शासनाकडून वित्त आयोगाचा काही गावांना लाखो, तर मोठ्या गावांना कोटीचा निधी येवू लागला. जे नको ते झालं! हा पैसा पाहून गाव कारभा-यांच्याच तोंडाला पाणी सुटू लागले! या निधीतून मलिदा कसा हडपता येईल, यासाठी वेगवेगळ्या वाटा गाव कारभारी शोधू लागले. कामे स्वतःच सुचवायची. ती हस्तंकामार्फत ग्रामसभेत मांडायची आणि ग्रामसभेची मंजुरी मिळाल्याचे दाखवायचे! हे ज्या गावात शक्य नसेल, जिथे विरोधक व ग्रामस्थ जागरुक आसतील तिथे, ग्रामसभेत आपल्या पित्यांना पुढे करुन ग्रामसभाच उधळून लावायची!

ग्रामसभा उधळलली तरी ती ग्रामपंचायत दप्तरी माञ ग्रामसभा शांततेत व खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न होते. त्यात खालिल विषय चर्चेआंती एकमताने मंजूर झाले. सूचक पित्तू क्र.१ अनुमोदक पित्तू क्र.२!झाली ग्रामसभा! मिळाली गावक-यांनी सूचविलेल्या कामांना मंजुरी. प्रोसिडींग भाऊसाहेबांच्या कपाटात बंद ! जे काय ते गावकारभारी आणि भाऊसाहेबांनाच ठाऊक!


यानंतर कामाचे टेंडर काढायची प्रक्रिया तर फारच गमतीशीर. पं.समिती ही ग्रामपंचायतीची तांञिक यंञणा.मग काय रावसाहेबांना टक्का द्यायचा आणि वाटेल तसे टेंडर बनवायचे. सदर टेंडरला मग ई.टेंडरिंग पध्दतीने मंजुरी घ्यावी लागते. पूर्वी ठेकेदार व ग्रामपंचायत प्रशासन यांच्या संगनमताने कामाचा ठेका ठरायचा. आता सरपंच, उपसरपंच आणि सदस्यच ठेकेदार बनलेत. युती फक्त रावसाहेब आणि भाऊसाहेब यांचेशी. कारण त्यांच्या सहीशिवाय बिले निघत नाही. अशी नवी व्यवस्था आस्तित्वात आली.
गाव कारभारीच ठेकेदार बनल्याने वेगळेच प्रकार घडू लागले. कामावर कोणाचेच नियंत्रण राहिले नाही. गाव कारभारीच कामे करणार नाव फक्त दुस-याचं किंवा पित्याच्या मजूर सोसायटीचं इतकचं. असं असल्यावर सामान्य माणूस काय तक्रार करणार?केलिच तर सगळे मॕनेज्ड त्यामुळे तक्रारीत तथ्य नसल्याचे प्रमाणपञ मिळणार! काहितरी खालीवर करायचे वर डांबर पसरायचे की झाला रस्ता! आत पोटात खडी आहे की नाही हे फक्त गावकारभारी, रावसाहेब व भाऊसाहेबांनाच माहित!
असा गावोगाव हा प्रकार रुढ झालाय.थोडीफार चांगली गावे याला अपवाद असतीलही. या प्रकाराने धनवान झालेले गाव कारभारी आता गावोगाव दांडगाई करु लागले आहेत. काही ठिकाणी जिथे आरक्षणे आहेत तिथे सूत्रधारच्या इशा-यावर कारभार चालतो.

पैसा आणि टक्केवारीच्या खेळाने गावाचे गावपण खाऊन टाकलंय. गावाच्या विकासासाठी आलेल्या पैशावर ताव मारुन गावाचे राव बनायचे.याच पैशावर पित्ते पोसून त्यांचेकरवी दहशत निर्माण करायची.या पित्यांना हाॕटेलात, ढाब्यावर वळती घालून आणले की, हे निवडणूकीत उधळतात. पैसे वाटपापासून ते मतदार पळवापळवीची कामे ईमानदारीने करतात. शिवाय आपला नेता निवडून आला की गोणीने गुलाल उधळतात!


तर हे असे आहे. ज्या हेतूने गावाला थेट निधी दिला जातो, तो हेतू गावाच्या वेशिला टांगला गेला आहे. पूर्वी अधिकारी आणि ठेकेदार मलिदा खायचे. असे नको म्हणून मधली मुंगेरे बुजवून थेट गावाला निधी मिळू लागला. यामागे टक्केवारी हद्दपार होईल व भ्रष्टाचाराला आळा बसेल. गाव कारभा-यांकडे अधिकार दिल्याने दलाल व्यवस्था मोडीत निघून दर्जेदार कामे होतील. गावाचा विकास होईल. पण झालं भलतंचं! ‘केला तुका अन् झाला माका आणि पुन्हा टक्का…!!!
भास्कर खंडागळे ,बेलापूर
(९८९०८४५५५१ )

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here