बेलापूर गुटखा प्रकरणी बनावट छापा

0

अन्न व औषध प्रशासन, गावपुढार्‍यांचे हात ओले

प्रतिनिधी । राष्ट्र सह्याद्री
बेलापूर : अन्न व औषध प्रशासनाने गावात टाकलेल्या छापा प्रकरणी साडे चार लाख रुपयांचा गुटखा जप्त करण्यात आला आहे. याबाबत आरोपी विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बेलापूर हे गुटख्याचे प्रमुख केंद्र बनले असल्याचे यातून उघड झाले आहे. सिने स्टाइल पद्धतीने हा छापा दाखऊन अन्न व औषध प्रशासन पोलिस आणि एका गाव पुढार्याने आपले हात ओले करून घेतले आहे.
दरम्यान या प्रकरणाबाबत अन्न व औषध प्रशासन, पोलिस तसेच गाव पुढारी अशा सर्वांचीच नार्को टेस्ट करण्याची मागणी गावकर्यांबरोबरच एका सत्ताधारी पक्षाच्या जिल्हाध्यक्षाने केली आहे. यामुळे अन्न व औषध प्रशासन अधिकारी आणि पोलिस तसेच गाव पुढारी यांच्याविरूद्ध गावकर्यांमध्ये तीव्र असंतोष धगधगत असून यापुढे तो अधिक उफाळून येण्याची चिन्हे आहेत.
या घटने बाबत अन्न व औषध प्रशासन विभागाचे सुरक्षा अधिकारी साहेबराव विष्णू मुळे यांनी हाकेच्या अंतरावरील बेलापुर पोलिस ठाणे सोडून थेट श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनला फिर्याद दिल्याने यातील गूढता वाढली आहे. श्री.मुळे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, आम्हास मिळालेल्या गुप्त माहीती नुसार फिर्यादी म्हणून मी आणि पंच म्हणून शकुर जब्बार शेख, तसेच अन्न व औषध विभागाचे सहाय्यक आयुक्त के. जी. गोरे, नमुना सहाय्यक प्रसाद कसबेकर यांच्यासह बेलापूरातील पढेगाव रोड येथे दाखल झाले.
त्यावेळी महींद्रा बोलेरो पिकअप एम एच 18ए ए 6450 ही आरोपी असलेला मदन विजय कणगरे घेवुन जात असताना ती अडवुन चौकशी केली मात्र त्यांना उडवा उडवीची उत्तरे मिळाली. अन्न व औषध विभागाच्या अधिकार्‍यांनी तपासणी केली असता त्यात 60 हजार रुपयांचा हिरा पान मसाला व 90 हजार रुपयांचा राँयल तंबाखू व टेम्पो असा 4 लाख 50 हजार रुपयांचा मुद्देमाल मिळून आला पोलीसांनी मुद्देमाल आणि वाहन जप्त केले आहे.
शासनाने गुटखा बंदी केली असतांनाही बेलापूर गावात हा धंदा जोरात चालु आहे. अनेक सुशिक्षित बेरोजगार तरुण गुटख्याच्या अहारी गेले आहेत. दरम्यान, काही महीन्यापूर्वीही दुसर्या एका गोडावुन मधुन गुटख्याची चोरी झाल्याचा बनाव रचण्यात येऊन काही जणांनी आपले हात ओले करत त्या प्रकरणाबाबत कमालीची गुप्तता पाळली होती. या प्रकरणात वाटा दिला नाही म्हणून एका पोलिसाला वरीष्ठांच्या रोशास सामोरे जाताना पोलिस ठाणे सोडावे लागले आहे.
गेल्या काही दिवसापासून गावात खुलेआम विकल्या जाणा-या गुटख्याची माहिती अन्न व औषध प्रशासन अधिकार्यांना अचानक लागली. रात्री 1 वाजता या छाप्यासाठी गावात आलेले अन्न व औषध प्रशासन अधिकार्यांचे पथक पहाटे 4 वाजेपर्यंत कारवाई स्थळी थांबले होते. अशी चर्चा आहे. अतिशय हातचलाखीने ही कारवाई करण्यात आली आहे. कारवाईत केवळ टेम्पो चालक आरोपी करण्यात आला आहे. दरम्यान, या सर्व त्या प्रकरणातील सत्य बाहेर येण्यासाठी सर्वांचीच नार्को टेस्ट करावी अशी मागणी करत त्यासाठी आपण थेट मंत्रिमंडळात सामील असलेल्या मंत्र्याची लवकरच भेट घेणार आहोत, अशी माहिती आताच नाव न छापण्याच्या अटीवर एका सत्ताधारी पक्षाच्या जिल्हाध्यक्षाने सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here